पुणे : कार्ला येथील एकविरा देवी मंदिराकडे जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) तयार करण्यात येणाऱ्या रज्जू मार्गाचे काम आता लवकरच सुरू होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे प्रलंबित असलेली निविदा प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण केली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कार्ला येथील एकविरा देवी मंदिराच्या विकास आराखड्याला राज्य शासनाने २१ कोटी रुपयांची मंजुरी दिली होती. तसेच गडावर जाण्यासाठी रज्जू मार्ग (रोप-वे) आणि कार्ला फाट्यावर उड्डाणपुलासाठी ४५ कोटी रुपयांचा आराखडा मान्य करण्यात आला आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया रखडल्या होत्या. आचारसंहिता संपुष्टात आल्याने ‘एमएसआरडीसी’कडून स्थापन करण्यात आलेल्या विशेष समितीकडून हालचाली सुरू केल्या आहेत. लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> पोलीस दलातील लाडक्या ‘लिओ’चा मृत्यू

एकविरा देवीचे मंदिर डोंगरावर आहे. सह्याद्री पर्वताच्या कुशीतील कार्ला येथील डोंगरावर हे मंदिर आहे. त्यामुळे पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी काही पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिराचा गाभारा खूप लहान आहे. येथे नेहमीच भाविक आणि पर्यटकांची गर्दी असते. या ठिकाणापासून जवळच लोणावळा आणि खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे असल्याने या ठिकाणी पर्यटक गर्दी करतात. भाजे लेणी, लोहगडासह अन्य शिवकालीन ऐतिहासिक किल्ले आहेत. त्यामुळे देवदर्शनाबरोबरच पर्यटनासाठीही अनेक जण या भागात येतात. गडावर जाण्यासाठी रज्जू मार्ग करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> पेट्रोलऐवजी बायोइथेनॉलवर वाहने धावणार! देशात पुढील ६ महिन्यांत होणाऱ्या मोठ्या बदलाची गडकरींची माहिती 

एमएसआरडीसीने प्रस्तावित रज्जू मार्गाचा आराखडा तयार केला होता. या आराखड्याला तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. ४५ कोटी रुपयांचा हा आराखडा आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया रखडली होती. आचारसंहिता संपल्याने येत्या आठवडाभरात निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी दिली.

एकविरा देवी तीर्थक्षेत्र असल्याने आणि जवळ कार्ला लेणी पर्यटन स्थळ असल्यामुळे या ठिकाणी सात ते आठ लाख भाविक आणि पर्यटक येत असतात. रज्जू मार्गामुळे एकविरा मंदिरात भाविकांना सहज पोहोचता येईल, त्याचबरोबर पर्यटनाला देखील चालना मिळेल.  – राहुल वसईकर, अधीक्षक अभियंता, एमएसआरडीसी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Work of ropeway construct by msrdc to reach ekvira devi temple in karla will start soon pune print news vvp 08 zws