जिल्ह्यातील २७ अनधिकृत शाळांची मान्यता काढली ; बेकायदा शाळांमधील विद्यार्थ्यांना अन्य शाळेत प्रवेश

या शाळांमधील विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून बुधवारी जाहीर करण्यात आले.

प्रतिनिधिक छायाचित्र

पुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची परवानगी न घेता बेकायदा २७ शाळा जिल्ह्यात सुरू असल्याचे उघडकीस आले आहे, असे जिल्हा परिषदेच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. संबंधित शाळांवर कारवाई करण्यात आली असून त्या शाळांची मान्यता काढण्यात आली आहे. तसेच या शाळांमधील विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून बुधवारी जाहीर करण्यात आले.

जिल्ह्यात शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षण विभागाची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, जिल्ह्यातील अनेक शाळांनी परवानगी न घेता शाळा सुरू ठेवल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अडचणीत आले असून पालक घाबरले आहेत.

या बाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी तथा प्रशासक आयुष प्रसाद म्हणाले, ‘जिल्ह्यात कोणत्याही शिक्षण विभागाची परवानगी न घेता २७ शाळा गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत होत्या. त्या शिक्षण संस्थांबाबत काही माहिती अधिकाऱ्यांमार्फत प्राप्त झाली. त्या माहितीच्या आधारे गटविकास अधिकाऱ्यांनी शाळांमध्ये जाऊन पाहणी केली. त्यानंतर या २७ शाळा अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या शाळांवर कारवाई केली असून मान्यता काढून घेतली आहे. या अनधिकृत शाळांमध्ये हवेली, पुरंदर, इंदापूर, खेड, मावळ, मुळशी, शिरुर या तालुक्यातील शाळांचा समावेश आहे. सर्वाधिक अनधिकृत शाळा हवेली तालुक्यातील आहेत.’

जिल्ह्यातील २७ शाळांबाबत गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यानुसार कारवाईचा भाग म्हणून संबंधित शाळांना आम्ही नोटिसा दिल्या आहेत. त्याला अनेक शाळांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्या शाळा अनधिकृत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, असे शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात २७ अनधिकृत शाळा होत्या. त्यात प्रवेश सुरू होते. त्यामुळे पालकांनी त्यांच्या मुलांना या शाळांमध्ये प्रवेश घेतले होते. मात्र आता या शाळा अनधिकृत असल्याने त्या शाळांवर कारवाई करून त्यांची मान्यता काढण्यात आली आहे. त्या शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी घाबरू नये. विद्यार्थ्यांना अन्य शाळेत प्रवेश देण्याची प्रक्रिया करण्यात येईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या घराच्या जवळच्या शाळेत प्रवेश दिले जातील. आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्ह्यातील अनधिकृत शाळा

हवेली – सुलोचनाताई झेंडे बालविकास मंदिर व प्राथमिक विद्यालय कुंजीरवाडी, बी. बी. एस. इंटरनॅशनल स्कूल वाघोली, रिव्हर स्टोन इंग्लिश मीडियम स्कूल पेरणेफाटा, व्ही. टी. एल. ई-लर्निंग स्कूल भेकराईनगर, किडस् वर्ड इंग्लिश मीडियम स्कूल पापडेवस्ती फुरसुंगी, संस्कृती पब्लिक स्कूल (माध्यमिक) उत्तमनगर, न्यूटन इंग्लिश मीडियम स्कूल मांगडेवाडी, शिवसमर्थ इंग्लिश मीडियम स्कूल मांगडेवाडी, ऑरचिड इंटरनॅशनल स्कूल आंबेगाव बु., संस्कृती नॅशनल स्कूल लिपाणे वस्ती जांभूळवाडी रस्ता, संत सावतामाळी प्राथमिक विद्यालय माळीमळा लोणीकाळभोर, पुणे इंटरनॅशनल स्कूल अष्टापुरेमळा लोणीकाळभोर, द टायग्रेश स्कूल कदमवाकवस्ती, ईमॅन्युअल इंग्लिश स्कूल खांदवेनगर.

इंदापूर – लिटिल हार्ट इंग्लिश मीडियम स्कूल काळेवस्ती, महात्मा फुले विद्यालय निमगावकेतकी, गौतमेश्वर प्राथमिक विद्यालय दत्तनगर, शंभू महादेव विद्यालय दगडवाडी, ईरा पब्लिक स्कूल इंदापूर आणि विठ्ठलराव शिंदे विद्यालय इंदापूर

खेड – जयहिंद पब्लिक स्कूल भोसे

मावळ – सह्याद्री माध्यमिक विद्यालय मेटलवाडी मु. मेटलवाडी, पो. खांडी, डिवाईन विस्डम प्रायमरी स्कूल वाकसाई

मुळशी – सरस्वती प्री-प्रायमरी वैद्य मंदिर / अल्फा एज्युकेशन हायस्कूल पिरंगुट

पुरंदर – नवीन प्राथमिक शाळा जेजुरी, शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल राख

शिरूर – आकांशा स्पेशल चाईल्ड स्कूल रामलिंग रस्ता, शिक्षक कॉलनी शिरूर ग्रामीण

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Zilla parishad administration cancel registration of 27 unauthorized schools pune print news zws

Next Story
पीएमआरडीएकडून कुसगावमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई
फोटो गॅलरी