अनेकदा घरामध्ये भाजीला पर्याय म्हणून पातळ भाजी किंवा उसळ बनवली जाते. मात्र असे पदार्थ शाळा, कॉलेज किंवा ऑफिसच्या डब्यांमध्ये नेण्यास फारसे सोयीचे नसते. पातळ भाजी किंवा उसळीसारखे पदार्थ घट्ट झाकण असलेल्या डब्यातुनही बरेचदा बॅगेत किंवा डब्याच्या पिशवीत सांडतात. मात्र काही कडधान्यांची केवळ उसळ नाही तर कोरडी भाजी देखील बनावता येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चला तर मग आज आपण चवळीच्या उसळीऐवजी, चवळी मसाला कसा करायचा ते पाहूया. चवळी मसाला हा पदार्थ डब्यात घेऊन जाण्यासाठी खूपच सोयीचा आहे. या पदार्थाची रेसिपी इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील iampurvishah नावाच्या अकाउंटने तिच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केली आहे. काय आहे या चवळी मसाल्याची कृती पाहू.

चवळी मसाला रेसिपी :

साहित्य

चवळी
पाणी
तेल
जिरे
हिंग
हळद
तिखट
गरम मसाला
धणे पावडर
मीठ
कढीपत्ता
कांदा
टोमॅटो
आले
लसूण
लिंबाचा रस
कोथिंबीर

कृती

पूर्वतयारी :

सर्वप्रथम चवळी स्वच्छ धुवून तिला ४ तास पाण्यामध्ये भिजवून ठेवावी. भिजवलेल्या चवळीला कुकरमध्ये घालून कुकरच्या ३ शिट्या करून घ्या.
आता कांदा आणि टोमॅटो मध्यम बारीक चिरून घ्या. तसेच कोथिंबीरदेखील चांगली बारीक चिरून घ्यावी.

  • पूर्वतयारी करून झाल्यावर, गॅसवर एक कढई किंवा पातेले ठेवा आणि त्यामध्ये फोडणीसाठी तेल तापत ठेवा.
  • तेल तापल्यावर त्यामध्ये जिरे घालून ते तडतडू द्यावे.
  • जिरे तडतडल्यावर त्यामध्ये हळद आणि कढीपत्ता घालून घ्या.
  • आता यामध्ये चिरलेला कांदा घालून चिरलेले किंवा ठेचलेले आले आणि लसूण घालून परतून घ्या आणि लगेचच बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यावा.
  • भाज्या एकदा ढवळून त्यामध्ये हिंग, लाल तिखट, धणे पावडर आणि गरम मसाला घालून घ्या.
  • कढईतील सर्व पदार्थ व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.
  • चवीनुसार मीठ घालून साधारण अर्धी वाटी पाणी घालून मसाला परतून घ्यावा.
  • कांदा-टोमॅटोचा मसाला नीट शिजल्यानंतर त्यामध्ये चवळी घालून घ्यावी.
  • चवळीच्या तयार मसाल्यामध्ये चांगले परतून घ्या आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्या.
  • तयार आहे स्वादिष्ट चवळी मसाला. पोळी किंवा भाकरीसह खाण्यास घेताना वरून लिंबू पिळून घ्यावे. याने चवळी मसाल्याची चव अधिक वाढेल.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @iampurvishah नावाच्या अकाउंटवरून या चवळी मसाल्याची रेसिपी शेअर झाली आहे. तसेच या रेसिपी व्हिडीओला आत्तापर्यंत ४९४K व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make chawli masala at home tiffin friendly food try this simple recipe in marathi follow this steps dha