फक्त फणसाची भाजी चविष्ट लागते असे नाही तर फणसाच्या बियांची भाजीही चवीला अगदी छान असते.फण्साच्या बियांना आठळ्या असे म्हटले जाते. फणस खाऊन झाल्यावर फणसाच्या बिया उकडून खाल्या जातात. चवीला छान लागतात. तसेच चुलीत घालून भाजायच्या आणि मग खायच्या तशाही छान लागतात. आठळ्यांची भाजी करायला अगदी सोपी आहे. कोकणात ही भाजी केली जाते. तसेच इतरही ठिकाणी केली जाते. फणसाच्या बियांची भाजी करण्याच्या विविध पद्धती आहेत. त्यापैकी एक पद्धती ही आहे. पाहा साधी सोपी रेसिपी.

फणस बी भाजी साहित्य

  • १ वाटी हिरवे वाटाणे
  • १ वाटी फणस बी
  • १ मोठा कांदा
  • २ हिरव्या मिरची
  • २ चमचा मसाला
  • १ चमचा हळद
  • १ चमचा धणे जिरं पावडर
  • २ पळी तेल
  • १ चमचा मीठ
  • १ चमचा साखर

फणस बी भाजी कृती

फणसाच्या आठळ्या स्वच्छ धुऊन प्रेशर कूकरमध्ये २-३ शिट्ट्या होईपर्यंत उकडून घ्या. आठळ्या शिजायला जरा जास्त वेळ लागतो. त्यानुसार शिट्या काढायच्या. उकडलेल्या बिया गार करायच्या. थंड झाल्यावर सोलून आतली फक्त बी काढायची. बीचे दोन तुकडे करून घ्यायचे

एका कढईत तेल घ्यायचे. तेल जरा तापले की त्यात जिरे घालायचे. जिरे जरा छान फुलल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा मस्त गुलाबी परतून घ्यायचा. कांदा परतल्यावर त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. नंतर उकडून ठेवलेल्या आठळ्यांचे तुकडे घालायचे. जरा वाफ काढून घ्यायची.

तुकडे छान परतले गेले पाहिजेत. त्यात थोडे मीठ घालायचे. चमचाभर हळद घालायची. चमचाभर लाल तिखट घालायचे. भाजी छान ढवळून घ्यायची.

त्यात थोडा गूळ घालायचा. गूळ किसून घ्यायचा आणि मगच घालायचा. गूळ जरा विरगळला की त्यात थोडा ताजा नारळ घालायचा. नारळ परतायचा. मग त्यात दाण्याचे कुट घालायचे.

दाण्याचे कुट जरा परतायचे. त्यात चमचाभर गरम मसाला घालायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. सगळं छान परतून घ्यायचे. मग त्यात थोडं पाणी घालायचं. भाजी शिजल्यावर पाणी जाऊ द्यायचं.

पाणी कमी झाल्यावर भाजी एकदम घट्ट होते.अशाप्रकारे आपली पारंपारिक भाजी तयार आहे.