हिवाळ्यात बाजारात अगदी सहज उपलब्ध होणारे कंदमूळ म्हणजे गाजर. अनेक पोषक घटकांसह परिपूर्ण असणारे हे गाजर थंडीच्या दिवसांमध्ये नक्की खावे. काही जणांना गाजराचा हलवा, कोशिंबीर किंवा कच्चे गाजर खायला खूप आवडते. तर आज आम्ही तुम्हाला थंडीच्या दिवसांत गाजराचे गरमागरम सूप कसे बनवायचे ते सांगणार आहोत. हे सूप लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरेल. चला तर पाहू गाजर सूपची रेसिपी…
साहित्य :
- गाजर – २
- टोमॅटो – ४
- कांदा – १
- बीट – १/४
- बटर
- ब्लॅक पेपर
- दालचिनी
- आले-लसूण चिरून घ्यावे
- रॉक सॉल्ट
- साखर
- तमालपत्र
- मक्याचे पीठ
कृती :
- सर्वप्रथम टोमॅटो, बीट, गाजर व कांदा हे सर्व चिरून घ्या. नंतर कुकरमध्ये एक चमचा तेल घाला. मग त्यात कांदा घालून, सर्व चिरलेले साहित्य घाला आणि नंतर त्यात पाणी टाकून सात ते १० मिनिटे मध्यम आचेवर ठेवा.
- सात ते १० मिनिटांनंतर सर्व भाज्या शिजतील आणि थंड झाल्यावर या भाज्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
- त्यानंतर बारीक करून घेतलेले मिश्रण गाळून घ्या. नंतर दुसरे भांडे घ्या त्यात लोणी किंवा तूप घाला. मग त्यात तमालपत्र, दालचिनी टाका.
- नंतर चिरलेले लसणाचे तुकडे, कांदा घाला आणि काही वेळ ढवळा. मग त्यात तयार झालेले मिश्रण टाका आणि त्यामध्ये मक्याचे पीठ घालून, ते मिक्स करा.
- आता त्यात साखर, मीठ व काळी मिरी टाकून २-३ मिनिटे मंद आचेवर ठेवा. जेव्हा सूप तयार होईल तेव्हा गॅस बंद करा. अशा प्रकारे तुमचे टोमॅटो, गाजराचे सूप तयार झाले आहे.
