– अभय टिळक agtilak@gmail.com
‘विद्’ हा ‘वेद’ या शब्दाचा मूळ धातू. ‘विद्’ या धातूच्या अर्थच्छटा ‘मिळवणे’, ‘पाहणे’, ‘ज्ञान करून घेणे’ अशा आहेत. या धातूपासूनच ‘ज्ञान’, ‘ज्ञानाचा विषय’ अथवा ‘ज्ञानाचे साधन’ असे अर्थाचे पदर लाभलेला ‘वेद’ हा शब्द निपजलेला आहे. परतत्त्वाचे ज्ञान घडून येण्यासाठी नामचिंतनासारखे अमोघ साधन प्रस्थापित करणे, ही नामदेवरायांची एका अर्थाने मोठी देणगीच म्हणायची साधकवर्गाला. ‘देणगी’ हा शब्ददेखील ठरावा अपुराच. हे उपकारच होत अनन्य नामदेवरायांचे. ज्ञानप्राप्ती ही वास्तवात विलक्षण कठीण बाब. त्यासाठी हवी भक्कम पूर्वतयारी आणि पात्रताही. भगवत्स्वरूपाचे सूक्ष्मतम ज्ञान करून घेण्यास आणि ते पचविण्यास अधिकारही तसाच बळकट हवा . सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचीच ही गोष्ट. मात्र, नामाचे साधन एकदा का अंगवळणी पडले, नामाशी घट्ट मैत्र जोडले गेले की ज्ञानाच्या गावाला जाण्याचा राजरस्ता सताड खुला झालाच म्हणून समजावे! ज्ञान व्हावें आधीं ओळखावें नांवा । मग  जावें गांवा तयाचिया हे नामदेवरायांचे वचन म्हणजे त्या वास्तवाचे रोकडे सूचनच. नामचिंतनाच्या राजपथावर पथकर नाही लागत द्यावा कोणालाही. राजरस्त्यावरू न चालण्याचा हक्क सगळ्यांनाच असतो. मोडूनियां वाटा सूक्षम सगर । केला राज्यभार चाले ऐसा हे तुकोबांचे शब्द म्हणजे नामदेवरायांच्या असाधारण कर्तृत्वाला मानवंदनाच जणू. नामचिंतनरूपी साधनाच्या ठायी वसणाऱ्या सर्वसमावेशकतेचा हा ठोस पुरावा. पात्रापात्रतेचा विचार अप्रस्तुतच ठरतो या साधनाच्या संदर्भात. ब्रााह्मण व शूद्र वैश्य नारीनर । सर्वासी आधार नाम सत्य असे उच्चरवाने गर्जून सांगतात नामदेवराय ते काय उगीच! भक्तीच्या प्रांतात समतेचा घोष घुमविणारे अस्त्र, हे नामाचे वैशिष्टय़ इथे अधोरेखित होते ते असे. वेदाभ्यासाद्वारे आत्मोन्नतीचा पर्याय नाकारलेल्या तत्कालीन व्यवस्थेतील संबंधित घटकांना आंतरिक उन्नयनाचा मार्ग! भागवत धर्माने प्रवर्तित केलेल्या नवविधा भक्तीपैकी नामस्मरणरूपी तिसऱ्या भक्तिप्रकाराने अशा प्रकारे प्रशस्त बनवत ऐहिक जगण्याला आवश्यक असणारी आत्मखूण सिद्ध केली. किंबहुना, नामा म्हणे समर्थ वेद तो आमुचा । सांगे नित्य जपा रामकृष्णा अशा शब्दांत नामजपाचे अतुल्य स्थान घोषित करत वेदाभ्यासाची अप्रस्तुतताच जणू निर्देशित केली नामदेवरायांनी. वेदाभ्यासाचे राहू द्या एकवेळ; यज्ञ, दान, तपाचरण ही परमेश्वरप्राप्तीची अन्य साधने तरी जनसामान्यांच्या लेखी आचरणसुलभ ठरतात का? केवळ भावबळ पुरेसे ठरत नाही या साधनांच्या संदर्भात. तिथे निकड असते बख्खळ द्रव्यबळाची देखील. मुबलक धनसत्ता पदरी नसलेल्या मुमुक्षूंनी मग काय करावे? नामचिंतनरूपी साधनाची सुलभता आणि त्याचे सामर्थ्य, त्यांसाठीच, यज्ञ दान तप नामें आलीं हातां । नामें सर्व सत्ता प्राप्त होय अशा आत्मविभासभारित शब्दकळेद्वारे प्रतिपादन करतात नामदेवराय. अखंड नामजपरूपी यज्ञासाठी मुखरूपी वेदी प्रक्षाळून शुद्ध केली की अव्यक्त परतत्त्वाच्या तिथे साकारण्याद्वारे त्या नामयज्ञाची फलश्रुती यथासांग पार पडते, असे आश्वासनच आकारला देव नामारूपा आला। ह्मणोनि स्थापिला नामवेदीं अशा निरपवाद शब्दांत देतात नामदेवराय. नामरूपी वेदीवरील नामयज्ञामध्ये नामवेदाची संथा घेण्याद्वारे हस्तगत होणाऱ्या ऐहिक व पारलौकिक श्रेयसाची हमी देत भागवत धर्मप्रणीत भक्ती आणि शैवागमप्रणीत अद्वयदर्शन यांचा समन्वय साकारणे हा ठरतो चरमबिंदू नामदेवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा.