अभय टिळक agtilak@gmail.com
केवळ सृष्टीलाच नव्हे तर व्रतवैकल्यांनाही बहर चढतो श्रावणात. ‘व्रतमास’ असे पर्यायी नाव जरी या श्रावणमासास बहाल केले तरी ते शोभूनच दिसावे. श्रावणातील दर दिवशी काही ना काही धर्मकृत्ये परंपरेने सांगितलेली आहेतच. काही विशिष्ट हेतूने अंगीकारलेला काही एक विशिष्ट नेमधर्म हाच मुळात ‘व्रत’ या संज्ञेचा अर्थ. तर, चित्तशुद्धीचे साधन म्हणूनच व्रतवैकल्यांचा महिमा प्राचीन काळापासून गाजत—गर्जत राहिलेला आहे. ‘नेम’ हे झाले ‘नियम’ या शब्दाचे लौकिक, बोली भाषेतील रूप. तसे बघायला गेले तर ‘नियम’ हे ठरते अष्टांगयोगातील दुसरे अंग. शौच, तप, संतोष, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान या पाचांचा अंतर्भाव होतो अष्टांगयोगातील या दुसऱ्या अंगामध्ये. साहजिकच, तपाचरण हेही ठरते व्रतवैकल्यांचा एक भाग.

याचे कारण सोपे आहे. तप हेही होय शुद्धीचे एक साधन. व्रताचरण करायचे तेही शुद्धीसाठीच. ‘जे तापते अथवा तापविते ते तप’, इतकी निर्लेप व्याख्या आहे ‘तप’ या संकल्पनेची. सोने भट्टीत घालून झाळले की त्यांतील हीण जळून भस्मसात होते, हा व्यवहारातील कार्यकारणभाव लागू पडतो तपासंदर्भात. तपाचरणाद्वारे अपेक्षित आहे शुद्धी तनमनाची. त्यासाठीच शरीरासह मनाला संस्कारित करणारे नेमधर्म आचरावयाचे.

शरीराला नेम घालून देणे त्या मानाने सोपे. मात्र, मन नियमबद्ध करणे हे मोठे कठीण. मनच सैराट पळू-धावू लागले की व्रतधारणेद्वारे संस्कारित झालेली इंद्रियेदेखील मनाचा हात धरू न उधळतात, असा आपला अनुभव तपासी तें मन करूं पाहे घात । धरोनि सांगात इंद्रियांचा अशा नितळ शब्दांत तुकोबाराय व्यक्त करतात त्यांमागील रहस्य हेच. त्यांमुळे केवळ कायिक तप नाही ठरत पुरेसे. देहदंडणाद्वारे फारसे काहीच लागत नाही हाताला, हे पक्के ठाऊक असल्यामुळेच शरीरशोषणा नांव तप। हा मूर्खाचा खटाटोप असे निकराचे उद्गार मूर्तिमंत ‘शांतिब्रह्म’ गणल्या जाणाऱ्या नाथरायांच्याही मुखातून उमटावेत यांतच सर्व काही आले. अंत:शुद्धी ही तपाची अंतिम आणि अपेक्षित फलश्रुती. ज्याच्या कशामुळे अंत:करण निर्मळ बनेल ते ते सगळे ‘तप’ या संज्ञेत समाविष्ट. अमूक एक केले म्हणजे त्याला ‘तप’ असे म्हणावे, अशी तपाची सरधोपट व्याख्या करणे अवघड बनते ते यांपायीच. तपाचा जो मुख्य प्रकार। जेणें शुद्ध होय अभ्यंतर । तो स्वधर्मी गा सादर। अत्यादर करावा हे नाथांचे ‘एकनाथी भागवता’मधील स्पष्टीकरण या संदर्भात कमालीचे मननीय शाबूत होते. स्वधर्माचरणाद्वारे चित्तशुद्धी घडून येत असल्यामुळे स्वधर्मपालन हेच तप होय, हा झाला नाथांच्या या कथनाचा एक अर्थ. तर, ज्याच्याद्वारे चित्तशुद्धी साध्य होईल ते ते सर्व स्वधर्म समजून आदरपूर्वक आचरावे, हा झाला या नाथोक्तीचा दुसरा अर्थपदर. चित्तशुद्धीअभावीच मन स्थिर राहात नाही, हा या सगळ्याचा गाभा.

विमल अंत:करण हे अधिष्ठान होय अद्वयबोधाचे. असे तपाचरण ही साधकाची सर्वाधिक मूल्यवान शिदोरी. भूतदया हे ती शिदोरी हस्तगत करण्याचे सोपे साधन. जप तप अनुष्ठान हरी । एकचि तो नमस्कारीं । भूतद्वेष कदा न करीं । तप सामुग्री हेचि तुझी असा सांगावा देत नामदेवराय सहजपणे सांगड घालून देतात व्यक्तिगत स्तरावरील तपाची व्यापक व्यावहारिक समाजहिताशी.