अभय टिळक agtilak@gmail.com
‘ज्याच्या योगाने तरून जाता येते ते तीर्थ’- इतकी साधी, सरळ आणि सोपी व्याख्या आहे ‘तीर्थ’ या संकल्पनेची. अर्थातराचे अनंत पदर जोडले जात पुढे ‘तीर्थ’ या शब्दाच्या व्याख्येचा पैस विस्तारत गेला, रुंदावत राहिला. ‘ज्याच्यामुळे पापादिकांतून तरून जाता येते त्याला तीर्थ म्हणावे,’ हा ‘तीर्थ’ या शब्दाचा सर्वपरिचित अर्थ यथावकाश प्रतिष्ठित झाला तो याच प्रक्रियेद्वारे. ‘नदीतील उतार’ याच अर्थाने हा शब्द वैदिक साहित्यात डोकावतो. साहजिकच, तीर्थाचा जैविक संबंध जोडलेला आहे नदीशी अथवा तिच्या पवित्र गणल्या गेलेल्या जलप्रवाहाशी. ‘तीर्थाची जागा’, ‘पवित्र व धार्मिक स्थळ’, ‘यात्रेचे, देवतेचे ठिकाण’ या अर्थाचे सूचन घडविणाऱ्या ‘क्षेत्र’ या संज्ञेचा संयोग तीर्थाशी घडून ‘तीर्थक्षेत्र’ ही जोडसंकल्पना साकारावी, हे सहज ठरते. तीर्थ, क्षेत्र आणि त्या क्षेत्राचे अधिष्ठात्रे दैवत यांचा अकृत्रिम संबंध ‘उपासक’ वा ‘भक्त’ या संकल्पनांशी यावा अथवा असावा, यांत अस्वाभाविक ते काय? इथे गंमत अशी आहे की, क्षेत्र, तीर्थ, देव आणि भक्त असा चतुव्र्यूह एका ठिकाणी विराजमान असणे ही सहजासहजी साध्य असणारी बाब नोहे. या दुर्मीळ समन्वयाचा निर्देश आपल्याला घडतो नामदेवरायांच्या गाथ्यातील एक अभंगात. ‘विष्णुदास नामा’ अशी नामखूण अभंगाच्या अखेरच्या चरणात नोंदविणारा हा अभंग ‘विष्णुदास’ असे दास्यत्वदर्शक बिरुद सविनय धारण करणाऱ्या पंढरपूरवासी नामदेवरायांचा आहे की, ‘विष्णुदास नामा’ या १६ व्या-१७ व्या शतकांच्या संधिकाळात होऊन गेलेल्या संतविभूतीचा आहे, याबद्दल ठाम काहीच सांगता येत नाही. मात्र, अभंग आहे मार्मिक. या अभंगात नमूद आहे संवाद भगवान शंकर आणि त्यांचा मुलगा स्कंद यांच्यादरम्यानचा. सर्वार्थाने परिपूर्ण असे एखादे तीर्थक्षेत्र या पृथ्वीतलावर कोठे आहे काय, असा प्रश्न स्कंदांना विचारतात एक नाही दोन नाही तर तब्बल ८८ हजार ऋषी! त्या प्रश्नाचा उलगडा करून घेण्यासाठी स्कंद गाठतो थेट कैलास आणि ऋषींचा तो प्रश्न सादर करतो आपल्या जन्मदात्याच्या पुढय़ात. ‘‘बरवीं तीर्थे पुण्यरासी। महात्म्यें सांगत होतों त्यांसी। परी तीर्थ क्षेत्र देवांसी। नाही चहूंसी एक मेळा।’’ अशी आपली अडचणही स्कंद प्रांजळपणे मुखर करतो. क्षेत्र, तीर्थ, दैवत आणि भक्त असा चतुव्र्यूह एके ठायी नांदणारे क्षेत्र म्हणजे पंढरी, असा खुलासा मग करतात त्रिपुरारी महादेव त्या वेळी. पांडुरंग परमात्म्याच्या निवासाने क्षेत्राचे पावनत्व लाभलेले स्थळ, चंद्रभागा-भीमा हे तीर्थ, पांडुरंग हे आदिदैवत आणि पुंडलिकराय हा भक्तराज असा हा चार तत्त्वांचा नांदता मेळा हेच तर अलौकिकत्व पंढरीनगरीचे. अधिष्ठात्रे दैवत आणि त्याच्या वास्तव्याने पुनीत झालेले त्याचे क्षेत्र या उभयतांचे ‘पांडुरंग’ हेच समान अभिधान असावे, हाही एक योगायोगच. ‘‘अवघें हें पवित्र पांडुरंग क्षेत्र। सुखचि सर्वत्र भरलें असे।’’ हे नामदेवरायांचे उद्गार त्या वास्तवाची निरपवाद पुष्टी करतात. तर, ‘‘आड वाहे भीमा। तारावया देह आत्मा। पैल थडीय परमात्मा। मध्य राहिला पुंडलिकु।’’ अशा शब्दांत ज्ञानदेव विशद करतात चतुव्र्यूहाच्या अन्य तीन कोनांचा परस्परअनुबंध. ‘‘पंढरीसी जा रे आलेनो संसारा’’ असे कळकळीचे आवाहन तुकोबाराय तुम्हाआम्हाला करतात, त्यामागील कारण हेच!
