अभय टिळक agtilak@gmail.com
तोंडाने केवळ उच्चार जरी केला यमाचा तरी थरकापतो कोणीही माणूस. त्याला कारणही तसेच आहे. ‘यम’ या संकल्पनेची सांगड आपण अपरिहार्यपणे घालतो मृत्यूशी. मृत्युदेवता म्हणूनच यमाला गणलेले आहे आपल्या परंपरेने. मृत्यू नकोसा वाटतो प्रत्येकालाच. यमराजाशी भेट शक्य तेवढी लांबावी अशीच कामना करतो आपण सगळे जण. मात्र, ‘यम’ या संकल्पनेचे मूळ व सहज नाते जुळलेले आहे ते अंतापेक्षाही नियमनाशी. ‘आवर घालणे’, ‘ताबा राखणे’, ‘नियमन करणे’ अशा अर्थच्छटा लाभलेल्या आहेत ‘यम’ या संज्ञा-संकल्पनेला. एकाच शब्दात सांगायचे झाले तर ‘आत्मसंयमन’ हा होय ‘यम’ या शब्दाचा आद्य अर्थ. जगण्यामध्ये संयमाची गरज नसते असे कोण म्हणेल? आत्मसंयम केवळ साधकाला अथवा योग्यालाच गरजेचा असतो का? त्या अर्थाने यमाचा अंगीकार प्रत्येकालाच अगत्याचा ठरतो. योग्याला अथवा साधकाला त्याची निकड प्रापंचिकांपेक्षा कणभर अधिक भासावी हे स्वाभाविकच ठरते कारण त्यांची नित्य लढाई असते ‘मन’ नावाच्या नितांत चपळ आणि म्हणूनच आवरायला दुष्कर असलेल्या चिजेशी. कदाचित म्हणूनच, ‘यम’ हे ठरते अष्टांगयोगातील पहिले अंग. यम, नियम आणि आसन या अष्टांगयोगातील पहिल्या तीन पायऱ्यांना ‘बहिर्योग’ असे संबोधले जाते कारण त्यांचे उपयोजन साधकाने मुख्यत: घडवायचे असते ते शारीरिक स्तरावर. मनाचा आणि शरीराचा अत्यंत घनिष्ठ संबंध असल्यामुळे शारीरिक स्तरावरील योगाची बैठक स्थिर होत नाही तोवर प्राणायाम-प्रत्याहार-धारणा-ध्यानादी, स्वरूपत: मानसिक स्तरावर आचरावयाच्या अंतर्योगाची साधना अशक्यच असते. योगदुर्गाच्या रूपकाद्वारे ‘ज्ञानदेवी’च्या नवव्या अध्यायात ही बाब अधोरेखित करतात ज्ञानदेव. ‘बाहेरी यमनियमांची कांटी लाविली । आंतु वज्रासनाची पौली पन्नासिली । वरी प्राणायामाचीं मांडिलीं । वाहातीं यंत्रें’ हे ज्ञानदेवांचे कथन या संदर्भात  सूचक होय. पाच यम आणि पाच नियम यांचे काटेरी कुंपण शरीररूपी किल्लय़ाच्या बाहेरच्या अंगाला सिद्ध करून विकारादी बाह्य़ शत्रूंना प्रांगणात मुळात  प्रवेशच मिळू नये याची जय्यत तयारी करायची असते योग्याने, हेच ज्ञानदेव स्पष्ट करतात इथे. सत्य, अपरिग्रह, अस्तेय, अहिंसा व ब्रह्मचर्य हे पाच ‘यम’ आणि शौच, तप, संतोष, स्वाध्याय व ईश्वरप्रणिधान हे पाच ‘नियम’ यांचे काटेरी कुंपण चिरेबंदी बनविणे हा झाला बहिर्योगाचा गाभा. यातून साधकांसाठी विधिनिषेधांचे सूचनच जणू घडवतात पतंजली यम-नियमांच्या माध्यमातून. जीवनात जे जे काही निषिद्ध समजावे त्यांचा निर्देश ‘यम’ या संकल्पनेमध्ये होतो. तर, रोजच्या जगण्यात ज्या मूल्यांचा अंगीकार डोळसपणे करावा अशांचा समावेश होतो ‘नियम’ या संकल्पनेमध्ये. असत्य बोलणे, अनावश्यक बाबींचा संग्रह करत बसणे, चोरी करणे, हिंसाचरण आणि बेभान जगणे या गोष्टी टाळायच्याच असतात. अशा निषिद्ध गोष्टींवर निरंतर ताबा ठेवायचा असल्यामुळेच ‘यम’ या योगविधीमध्ये त्यांचा समावेश करतात योगीश्वर पतंजली. ‘सत्य’ हा असतो या पंच-अंगांचा पाया. ‘तरी मऊ पणें बुबुळें । झगडतांही परी नाडळे । एऱ्हवीं फोडी कोंराळे । पाणी जैसे’ अशा मोठय़ा  उद्बोधक शैलीमध्ये ज्ञानदेव उलगडतात ‘सत्य’ या आद्ययमाचे दुहेरी अंगलक्षण.

एरवी मृदुमुलायमपणे स्रवणारी सत्यवाणी प्रसंगी वज्रतीक्ष्णही बनू शकते, हेच सांगायचे आहे ज्ञानदेवांना इथे.