सुग्रास स्वयंपाकावर आडवा हात मारून आकंठ भोजन केलेल्या व्यक्तीच्या अंगोपांगातून तृप्ती आणि सुस्ती ओथंबत राहते. ‘जेवण व्यवस्थित झाले आहे ना?’, असा प्रश्नदेखील त्या अवस्थेमध्ये विचारणे अर्थहीन शाबीत होते. कारण, अशा व्यक्तीचे आहारलेपणच त्यांच्या क्षुधाशांतीची ग्वाही देत असते. तुकोबांनी नेमकी हीच प्रतिमा वा उदाहरण अत्यंत चपखलपणे वापरलेले आहे त्यांच्या एका अभंगात, नामचिंतनाने चित्त विमल बनल्यामुळे तप:पूत आंतरिक जीवन प्रगाढ शान्तानन्दाने व्यापून जाऊन मन पूर्णत: निवलेल्या साधकाचे वर्णन करण्यासाठी. जालें भोजनसें दिसे । चिरा पडोनि ठेला इच्छे । धालियाच्या ऐसे । अंगा येती उद्गार अशा शब्दकळेद्वारे तुकोबा विदित करतात अवस्था आशेचा अंतर्बाह्य निचरा घडून आलेल्या व्रतस्थाची. हीच स्थिती अभिव्यक्त करण्यासाठी नाथांनी ‘निराश’ अशी शब्दयोजना केलेली दिसते ‘एकनाथी भागवता’मध्ये. सबाह्य शुचित्वाची प्राप्ती आशेचा ठाव तनमनातून समूळ निघाल्यामुळेच सहजसाध्य बनते, हा कार्यकारणभाव नैराश्यें स्वधर्माचरण। तेणें अंतरमळाचे क्षालन। या नांव गा शौच जाण। ‘शौच’ संपूर्ण नैराश्यें अशा कमालीच्या प्रत्ययकारी शैलीत विवरून सांगतात नाथराय भागवतटीकेच्या १९व्या अध्यायात. अस्तित्वाच्या कणाकणातून आशेची गच्छन्ती केल्यानंतर हातून जी जी कामे घडतात त्यांच्या माध्यमातून चित्त शुद्ध बनत जाते, अशी उपपत्ती आहे नाथांची या संदर्भातील. अशा पराकोटीच्या निरिच्छ अंत:स्थितीलाच म्हणतात ‘संतोष’. ‘समाधान’ हेही त्याच स्थितीचे दुसरे नाव. साधकाच्या ठायी अपेक्षित असलेल्या साधन चतुष्ट्यातील शमदमादी षट्संपत्तींमधील अंतिम, सर्वोच्च संपदा गणले जाणारे हेच ते प्रगाढ असे आंतरिक समाधान. परतत्त्वाचे अधिष्ठान अंत:करणात स्थिर झाल्याचे एक बाह्य लक्षण म्हणजे समाधान. येती अंगा वसती लक्षणें। अंतरीं देवें धरिलें ठाणें असे त्या दशेचे वर्णन करतात तुकोबाराय. अशा साधकाच्या देहमनातून तृप्ती अविरत निथळत राहते. जगाला सतत तिचे दर्शन होत राहते. ते समाधान, तो संतोष तोंडाने सांगावा लागत नाही. बघताक्षणीच त्याची प्रचीती येत राहते. समाधान त्यांचीं इंद्रियें सकळ। जयां तो गोपाळ समागमें अशी साक्षच आहे तुकोबांची. आनंद मग बनतो अशा सात्त्विकाचा स्थायीभाव. ‘स्व’च्या संकुचित जाणिवेसह आशेने अंत:करणातून बिऱ्हाड हलविलेले असल्यामुळे आपल्या पृथक अस्तित्वाच्या उपाधीपासून मुक्त असलेल्या त्या आनंदरूप साधकाला उभी सृष्टीच आनंदमय भासत राहते. कशाची म्हणून अथवा काही तरी मिळवण्याची म्हणा, परंतु, इच्छाच मुदलात नसल्यामुळे सर्व प्रकारच्या द्वंद्वांपासून तो बनलेला असतो अलिप्त. त्याच्या अंतरात थारा मिळावा म्हणून आनंदच त्याला शोधत राहतो सतत. तुका ह्मणे न ये जाणीव अंतरा। अंतरीं या थारा आनंदाचा अशी ती अस्तित्वाची अनुपम स्थिती वर्णन करतात तुकोबाराय स्वानुभवाच्या आधारे. पारलौकिकाचा ध्यास एकीकडे मनीमानसी जागवत असतानाच, लौकिक व्यवहार विशुद्ध बनविण्यासाठी दुसरीकडे अविरत कार्यरत राहणाऱ्या अशा त्या सुचरिताचा स्थायीभाव बनलेला चिरसंतोष अधिक काही प्राप्त झाल्याने वाढत नसतो अथवा काही गमावल्याने कणभरही उणावत नसतो. आत्मतृप्त सागरासारखा तो असतो पूर्णभरित. वर्षियेंवीण सागरू। जैसा जळें नित्यनिर्भरू। तैसा निरु पचारू। संतोषी जो असे त्या ‘संतोषी’ व्यक्तिमत्त्वाचे शब्दचित्र ज्ञानदेवीच्या १२व्या अध्यायात ज्ञानदेवांनी रेखाटलेले आहे ते काय लटके म्हणावे? – अभय टिळक
agtilak@gmail.com
