खुल्या मैदानात उघड्या आभाळाखाली भरणारा आठवडी बाजार नेहमीच गजबजलेला असतो. कनाती बांधून उभारलेल्या तात्पुरत्या पालांमध्ये दुकाने थाटलेल्या दुकानदारांचे हाकारे व विक्रेत्यांच्या आरोळ्या यांचा एकच गदारोळ असतो तिथे. अर्थकारणातील बाजाराचा हा न्याय लागू होतो परमार्थकारणातील मुक्तपेठेलाही. ‘‘पुंडलिकपेठ वैष्णवाचा हाट। करिती बोभाट हरिनामाचा।’’ हे निवृत्तिनाथांचे उद्गार त्याच वास्तवाकडे निर्देश करतात. गरजेच्या जिनसा हातोहात खपतात, हा तर बाजारपेठेचा नियमच जणू. काही प्रकारच्या मालाला मात्र उठावच नसतो, तर बाजारातील चढउतारांचे हेलकावे बसत असतात काही वस्तूंच्या मागणीला. प्रसंगी नफ्याच्या प्रमाणात घट सोसून का होईना, परंतु काही चीजा खपवाव्या लागतात विक्रेत्यांना. रामनामाचा वाण मोडतो नेमका याच कोटीत! त्यासाठी मोजावे लागते मोल जिभेचे. वेचावी लागते वाणी अहोरात्र त्यासाठी. साहजिकच हा वाण ग्राहकांच्या (शब्दश:) गळी उतरवण्यासाठी विक्रेत्यांना कराव्या लागणाऱ्या या आटाआटीचे प्रतिबिंब पडलेले दिसते स्पष्टपणे आपल्याला- ‘‘भक्तिभाव आम्ही बांधिलासे गांठी। सादावितों हाटीं घ्यारे कोणीं।’’ या तुकोबारायांच्या शब्दांत. कितीही नेमस्त झाला तरी कोणताही व्यापारी पाडून पाडून भाव किती पाडेल? मुदलात ग्राहकापाशी क्रयशक्तीच तुटपुंजी असेल तर दुकानदाराने तरी काय करावे? ‘‘तुका म्हणे न वेंचतां मोल। तो हा यांसि महाग विठ्ठल। वेंचितां फुकाचे चि बोल। केवढें खोल अभागियां।’’ अशा शब्दांत तुकोबाराय व्यक्त करतात तशा अभावग्रस्त गिऱ्हाईकांप्रतिची सकणव हळहळ. मात्र काही ग्राहकही असतात चांगले बिलंदर! उच्च प्रतीचा माल त्यांना पदरात पाडून घ्यायचा असतो कवडीमोलाने. ‘‘मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव। देव अशाने भेटायचा नाही रे, देव बाजाराचा भाजीपाला नाही रे।’’ अशा रोखठोक शैलीत तशा बिलंदरांची खरपूस हजेरी घेतात तुकडोजी महाराज! परंतु जे गृहस्थ कधी बाजाराकडे फिरकतच नाहीत, त्यांचे काय? त्यांच्या गरजांचा नि:शेष भागाकार झालेला असतो का? खरेदीची ऊर्मी वसत असते अशाही ग्राहकवर्गात, मात्र ती सुप्त, अप्रगट असते. एखाद्या चीजवस्तूची वास्तवात आपल्याला गरज आहे, याचीही जाणीव नसते त्यांना. त्यांना उपभोगप्रवण आणि खरेदीप्रवृत्त करण्यासाठी बैठे दुकान सोडून व्यापाऱ्याला बनावे लागते फिरस्ता विक्रेता! भागवतधर्मी संत नेहमी याच उभय भूमिकांमध्ये असतो. तो निखळ लोकधर्मी ठरतो त्याच न्यायाने. भावभक्तीचे अक्षय भांडार साठवलेले संत नामाचा वाण मुक्त हस्ताने दान करतात त्यांच्या दुकानाची पायरी चढणाऱ्या ग्राहकांना. ‘‘घातला दुकान। देती आलियासी दान। संत उदार उदार। भरलें अनंत भांडार।’’ असे त्यांचे यथार्थ वर्णन करतात तुकोबाराय. मात्र, बाजाराचे वावडे असणाऱ्या ग्राहकांच्या हिताचा कळवळा पोटी वागवणारे तुकोबा त्यासाठी स्वत:च स्वीकारतात फिरस्ती. मोल न उमगलेल्या जगाला ‘देव’नामक चिरंतन आदिवस्तूची महती पटवून देण्यासाठी देहूच्या पेठेतील दुकाने आणि देहूची महाजनकी यांचा मोह मोकलून ‘‘देव घ्या देव घ्या कोणी’’ असे हाकारे देत तुकोबा बिदोबिदी हिंडतात. ‘‘तुका म्हणें पोतें। देवें भरिलें नव्हे रितें।’’ असे सांगणारा हा देहूकर वाणी भागवतधर्मप्रणित समाजाभिमुख संतत्वाचा निखळ आदर्शच! – अभय टिळक

agtilak@gmail.com