अभय टिळक agtilak@gmail.com
‘वारी करतो तो वारकरी’ अशी ‘वारकरी’ या शब्दाची सहजसोपी व्याख्या. मूळ शब्द असावा ‘वारीकर’ असा. ज्ञानदेवांनीच तो दिसतो योजलेला. बोलीव्यवहारात ‘वारीकरा’चे शब्दरूप बनले ‘वारकरी’! ही संज्ञा नेमकी कोणाला शोभून दिसते, याचे जणू विवरणच करतात ज्ञानदेव एके ठिकाणी. ‘‘कायावाचामनें जिवें सर्वस्वें उदार। बापरखुमादेविवरा विठ्ठलाचा वारिकर।’’ हे ज्ञानदेवांचे स्पष्टीकरण हृदयावर कोरून ठेवावे असेच आहे. ज्ञानदेवांना अपेक्षित आणि अभिप्रेत असणारा ‘वारिकर’ होणे सोपे नाही. ‘वारकरी सांप्रदायिक’ बनणे सोपे आहे एक वेळ. परंतु ‘वारकरी’ बनणे हे दुष्करच. आराध्य दैवताच्या भेटीस नित्याने जाणे, म्हणजेच अभिगमन करणे यालाच म्हणावे वारी. ‘येरझार’ हा वारी या शब्दाचा एक अर्थ प्रचलित आहे तो याच न्यायाने. परंतु ‘व्रत’ हादेखील आहे एक अर्थ ‘वारी’ या संज्ञा-संकल्पनेचा. वारी हे एक व्रत आहे. या व्रताचे पालन निष्ठेने करणे ही खरोखरच अवघड बाब. वारी हा, खरे पाहता, आहे एक यज्ञच. पंढरीनगरीच्या दिशेने पावले उचलणाऱ्या वारीकराच्या मुखामध्ये अखंड असते नाम. वारीदरम्यान जणू नामयज्ञच चालू असतो वारकऱ्याचा. गीता-भागवताचा उद्गाता असणारा कृष्णच पंढरीला विटेवर विठ्ठलरूपाने अवतरलेला आहे, ही वारकऱ्यांची दृढ श्रद्धा आहे. ‘‘गीता जेणें उपदेशिली। ते ही विटेवरी माउली।’’ ही तुकोबारायांची या संदर्भातील निरपवाद साक्ष. सर्व प्रकारच्या यज्ञांमध्ये सर्वश्रेष्ठ गणला जाणारा नामयज्ञ म्हणजे माझी विभूती, असा रोकडा दाखलाच देतात भगवंत श्रीमद्भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात अर्जुनाला. ‘‘यज्ञानां जपयज्ञोऽस्मि’’ हे परमतत्त्वाचे उद्गार हा होय त्याचा निखळ पुरावा. विष्णू-कृष्ण-विठ्ठल या तीन तत्त्वांचे प्रगाढ ऐक्यच स्पष्ट होते या सगळ्यांतून. ‘‘पंढरीचे वाटे अनंत घडती याग। वैकुंठींचा मार्ग तेणें संगें।’’ हे ज्ञानदेवांचे वचन निर्देश करते याच तीन तत्त्वांच्या सामरस्याकडे. तर, ‘‘नामजप यज्ञु तो परम। बाधूं न शके स्नानादि कर्म। नामें पावन धर्माधर्म। नाम परब्रह्म वेदार्थे।’’ अशा शब्दांत ज्ञानदेव विशद करतात या नामयज्ञाचे असाधारणत्व. विठ्ठलनामाचे उच्चारण करत पंढरीकडे वाटचाल करणाऱ्या विठ्ठलयात्रेमध्ये तनमनाने सहभागी असणारा वारकरी या अर्थाने असतो मूर्तिमंत याज्ञिक! यज्ञात अपेक्षित असते हवन. द्यावयाची असते यज्ञात आहुती. स्वत:ला परिष्कृत बनविणे, हा असतो आद्यतम हेतू कोणत्याही होमाचा. वारीदरम्यान वारकरी करत असतो नेमके तेच. परिवर्तन हा वारीचा गाभा शाबीत होतो तो याच अर्थाने. वारी होते परिपूर्ण पंढरीक्षेत्रात. वारीमध्ये पाऊल घालत पंढरीक्षेत्रात प्रवेशेपर्यंत तुकोबारायांना अपेक्षित आहे अंतर्बाह्य़ परिवर्तन या यात्रेमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक यात्रेकरूमध्ये. ‘‘मूढ मतिहीन दुष्ट अविचारी। ते होती पंढरी दयारूप। शांति क्षमा अंगीं विरक्ति सकळ। नैराश्य निर्मळ नारी नर।’’ हे आहे त्या परिवर्तनाचे तुकोबारायांना अभिप्रेत असणारे स्वरूप. दुर्गुणांचे निराकरण आणि सद्गुणांचे आरोपण हे ईप्सित होय वारीचे. हे साध्य झाले की वारी घडली म्हणायचे यथार्थ. ‘‘वारी पंढरीची तोचि वारकरी। दया क्षमा बरी वसे जेथें।’’ हे आमच्या चोखोबारायांचे चोख उद्गार म्हणजे वारी आणि वारकरी यांचे मर्म अचूक हेरण्याची हुकमी कळच जणू!
