उदगीर संमेलनाच्या उद्घाटन सत्रातील सर्वच भाषणे दखलपात्र आणि स्वागतार्हदेखील.. पण त्यांमधले विरोधाभासही पाहायलाच हवेत!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांचे सर्वप्रथम अभिनंदन. खरे तर उदगीरच्या या ९५ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रातील सर्वच वक्ते या अभिनंदनास पात्र ठरतात. सासणे यांचे अभिनंदन व्यवस्थेच्या विरोधात ते भूमिका घेते झाले यासाठी केवळ नाही. वास्तव आणि साहित्य यांची जी फारकत गेली काही वर्षे मराठीत झाली होती त्या पार्श्वभूमीवर सासणे हे हा सांधा पुन्हा जोडू पाहतात. ही बाब अधिक अभिनंदनीय. साहित्य आणि साहित्यिक यांचे तसे बरे चालले होते. सासणे त्यांना ‘जागा दाखवून’ देतात. त्यांच्या भाषणाने साहित्यवर्तुळात ‘शांत सागरी कशास उठविलीस वादळे’ अशी काहीशी भावना निर्माण झाली असल्यास नवल नाही. मुळात साहित्याचे प्रयोजन, साहित्यिकांचे कर्तव्य आणि साहित्य आणि भवताल यांचे संबंध हा विषय उदगीर साहित्य संमेलन उद्घाटन सत्रातील भाषणांमुळे चर्चेस येतो. ती करत असताना सासणे यांच्या भाषणातील काही विरोधाभासी मुद्दय़ांची दखल घ्यायला हवी.

उदाहरणार्थ ‘एकच एक वास्तव कधीच अस्तित्वात नसते’ असे सासणे एके ठिकाणी नमूद करतात. हे विधान शंभर टक्के खरे. पुढे ते साहित्य आणि त्यातून हरवत चाललेला ‘सामान्य माणसाचा चेहरा’ याबद्दल ऊहापोह करतात. तोही शंभर टक्के खराच. पण नंतर, ‘काही वर्षांपूर्वी हा चेहरा नारायण सुर्वेच्या कवितांमधून, तेंडुलकरांच्या नाटकांमधून.. अन्य काही वास्तवदर्शी लेखकांच्या लेखनामधून दिसला होता’, असे नमूद करतात. याबाबतही काही आक्षेप नाही. पण ‘वास्तववाद म्हणजे काय याच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगवेगळय़ा असू शकतात’ हेही सासणे याच भाषणात मान्य करीत असतील तर सुर्वे, तेंडुलकर वगळता अन्यांच्या लेखनात प्रतििबबित झालेला सामान्य माणसाचा चेहरा हा वास्तवातला नव्हता असे कसे म्हणणार? सुर्वे, तेंडुलकर यांचे श्रेष्ठत्व निर्विवाद. पण त्यांचे हे मोठेपण मान्य करीत असताना पाडगावकर, गोखले वा कानेटकर यांचे लिखाण वा त्यांच्या लिखाणातील ‘वास्तव’ हे कमअस्सल ठरवण्याची गल्लत कुणी का करावी?  त्याच भाषणात पुढे ‘साहित्याच्या परिघामध्ये एक विचित्र असा तुच्छतावाद निर्माण झाला आहे’ असा तक्रारीचा सूर लावतात, पण तो केवळ अन्य साहित्यिकांपुरता, त्यांच्या भाषेपुरता मर्यादित नाही. या तुच्छतावादाचे जनकत्व भालचंद्र नेमाडे यांस द्यावे लागेल. नेमाडे आयुष्यभर वर्तमानपत्रांची टिंगलटवाळी करत राहिले. पण आयुष्याच्या (वाङ्मयीन) अखेरीस एका वर्तमानपत्राचाच राज्यभूषण पुरस्कार..  तोही अत्यंत हलक्या राजकारण्याच्या हस्ते.. ते स्वीकारते झाले. साहित्यिक हे वास्तवाचा निषेध करीत नाहीत असे सासणे जेव्हा म्हणतात तेव्हा नेमाडपंथीयातील किती साहित्यिकांनी त्यांच्या या वास्तवाचा निषेध केला हा प्रश्न अस्थानी असला तरी तार्किक ठरतो.

याचा अर्थ असा की वाचकांची एक अभिरुची असते आणि ती निर्माण होण्यास त्या त्या वाचकाची पार्श्वभूमी महत्त्वाची ठरते. अशा वेळी काही विशिष्ट अभिरुची आहे/नाही म्हणून त्या त्या वाचकांस कमी/अधिक लेखणे योग्य नाही. सासणे वास्तवाविषयी जो टिपेचा सूर लावतात त्यातून हे ध्वनित होते. फार कमी व्यक्ती अशा असतात की ज्या आपले जन्मजात संस्कार-कवच भेदून भिन्न चवींचा स्वाद घेतात आणि त्यानुसार स्वत:स घडवतात. भारताचे, केवळ महाराष्ट्राचे नव्हे, दुर्दैव हे की या जन्मजात संस्कार-कवचांस भेदण्याची प्रक्रिया सध्या पूर्णपणे बंद झालेली आहे. हे संस्कार-कवच भेदण्याचा प्रारंभ शिक्षणातून होतो. पण त्या क्षेत्राविषयी न बोललेलेच बरे. अशा वेळी आपल्या देशात सारा प्रयत्न आहे तो ही संस्कार-कवचे जतन करायची आणि समान संस्कार-कवचधाऱ्यांनी जास्तीत जास्त एकत्र येऊन आपापले जमाव तयार करायचे. साहित्यातही हेच होताना दिसते. त्यामुळे साहित्यिकाची जात/गोत्र आदी पाहिल्याखेरीज त्याचा आस्वाद घेणे जवळपास थांबले आहे. अलीकडे तर जात/गोत्र आदी तपशिलांवरून वाचकाची राजकीय भूमिकाही ध्वनित होते. म्हणजे आणखी एक कप्पा वाढला. आसपासच्या वास्तवात जे घडते ते साहित्यात प्रतििबबित झाल्याखेरीज कसे राहणार? सासणे म्हणतात ते वास्तव हे आहे आणि ते अन्य वास्तवांइतकेच खरे आहे. बाकी राजकीय व्यवस्थेबाबत सासणे यांनी व्यक्त केलेली मते उत्तम. त्यातही विशेषत: थाळीवादनाचा दाखला आणि त्यास निर्बुद्ध म्हणण्याचा प्रामाणिकपणा कौतुकास्पद. ‘मराठीत सआदत हसन मंटो नाही’ ही त्यांची वेदना खरी आहे. मानवी वेदना शोधार्थ निघालेल्या मंटो यास भणंगपणे जगणे मान्य होते. या वेदना मांडणे हेच त्याच्या लेखनाचे प्रयोजन. आपणास लेखक म्हणून ओळखले जावे ही काही त्याची प्रेरणा नव्हती. ‘१९७२ चा दुष्काळ आदीचे प्रतििबब मराठी साहित्यात नाही’ ही सासणे यांची खंतही खरी. पण तसे पाहू गेल्यास फाळणीच्या वेदना पंजाबी वा बंगाली साहित्यात जितक्या प्रकट झाल्या तितक्या अन्य भाषांत नाही, हे सत्यच नव्हे काय? नर्मदेच्या दक्षिणेकडील किती भाषांत फाळणीच्या जखमा आढळतात? या सत्यामुळेच भारतीय साहित्य खुजे ठरते हे नाकारता येत नाही.

उदगीर संमेलनाच्या उद्घाटन सत्रातील सर्वच भाषणे दखलपात्र. ‘राज्यकर्त्यांनी साहित्य आणि माध्यमांची कमकुवत अंगे ओळखली आहेत’, हे शरद पवार यांचे विधान शंभर टक्के सत्य. पण खुद्द पवार हेच अशी ‘कमकुवत अंगे’ ओळखणाऱ्यांचे पितामह आहेत हे कसे विसरणार? ‘पवारांचा रमणा’ ही त्याची सुरुवात होती. त्यातील आणि आजच्या परिस्थितीतील फरक इतकाच की साहित्यिकादींना किती ‘वाकवायचे’ हे समजण्याचा एक सुज्ञ-सभ्य-समंजसपणा पवार यांच्यासारख्या जुन्या संस्कारात वाढलेल्या राजकारण्याठायी आहे. आता बाजारपेठीय मूल्यव्यवस्थेतील राजकारणी तसे नाहीत. म्हणून तेव्हा पवारांसमोर केवळ झुकलेले साहित्यिक आज आपणास पाठीचा कणा असतो हे विसरून लोटांगण घालू लागले आहेत. पवार यांचे प्रचारकी साहित्याबाबतचे विधानही अर्धसत्य ठरते. प्रचार- मग तो कोणत्याही विचारधारेचा असो- तो खोटाच असतो. ‘खऱ्या’ सत्यास प्रचाराची गरज नसते. ते आपल्या पायावर स्वतंत्रपणे उभे राहते. राजकुमार तांगडे यांचे ‘पोटार्थी’ लेखकांसंबंधातील विधानही योग्यच. पण तत्त्वच्युती हा केवळ पोटार्थीचाच अपराध नाही. ते बिचारे सरळ सापडतात. पण मोठा भ्रष्टाचार हा वैचारिक पातळीवरचा असतो. ‘आपला’ आणि ‘त्यांचा’ ही विभागणी त्यातही असते. म्हणजे विचारात ‘आपल्या’ बाजूला असलेल्याच्या सर्व प्रमादांकडे दुर्लक्ष करायचे आणि ‘त्यांच्या’ गटातील प्रत्येकाच्या कृतीबाबत कागाळी करायची हे आपल्याकडे सातत्याने होते. त्यामुळे वैचारिक बांधिलकी ही एका अर्थी अडचणच ठरते. बाकी सत्तेचा माज चढला की निर्बंध घातले जातात वगैरे दामोदर मावजो यांच्या विधानाबाबत कोणाचे दुमत असण्याची शक्यता नाही. पण सत्तेचा माज कोणीही करू धजणार नाही इतपत सजग समाजनिर्मिती करायची कशी हे आपल्यासमोरील मोठे आव्हान आहे. तशा समाजनिर्मितीच्या आड येणाऱ्या ज्या विचारधारेस साहित्य संमेलनात बोल लावले गेले त्या विचारधारेने गेली ७५ वर्षे केलेली पायाभरणी हा अशा समाजनिर्मितीतील मोठा अडसर आहे. तो दूर करायचा तर एखाद्या संमेलनाने भागणारे नाही. वैचारिक नेतृत्व करणाऱ्या धुरीणांचा प्रामाणिकपणा त्यासाठी आवश्यक आहे. तो जोपर्यंत आपले विचारवंत दाखवू शकत नाहीत तोपर्यंत भारतातील हे भ्रमयुग संपुष्टात येणार नाही.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial bharat sasane 95 akhil bharatiya marathi sahitya sammelan zws