विशिष्ट दलालांना कैक कोटींचा लाभ करून देणारा निर्णय घेणाऱ्या व्यक्तीची सुटका इतक्या सहज होते, ही भारतीय भांडवल बाजार व्यवस्थेची बेअब्रूच..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘नॅशनल स्टॉक एक्स्चेंज’ (एनएसई)च्या माजी व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण यांचे जे काही उद्योग प्रकाशात येत आहेत त्यामुळे भारतीय बाजारपेठेची उरलीसुरली अब्रूही निकालात निघतेच. पण यातून आपल्या अर्थव्यवस्थेतील नियामक यंत्रणा किती विसविशीत आहेत याचेही विदारक चित्र समोर येते. गेल्याच आठवडय़ात ‘लोकसत्ता’ने या स्तंभातील ‘लेपळे नियामक’ या संपादकीयात (१७ फेब्रुवारी) हा मुद्दा मांडला होता. पण चित्राबाईंनी केलेले उद्योग पाहता ‘लेपळे’ हे वर्णनदेखील धडधाकट वाटावे अशी स्थिती समोर येते. हे भयानक आहे. विश्वगुरू, महासत्ता, पाच लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था इत्यादी होऊ पाहणाऱ्या या देशात विशुद्ध, नियमाधारित व्यवस्था अजूनही शेकडो कोस कशी दूर आहे याचे होणारे दर्शन अस्वस्थ करणारे ठरते. म्हणून सुशिक्षित असूनही विचार करण्याची क्षमता शाबूत असणाऱ्या प्रत्येकाने या प्रकरणाची दखल घ्यायला हवी.

याचे कारण या चित्राबाई केवळ कोणा एका हिमालयवासी बाबाच्या प्रेमात पडल्या होत्या इतकेच नाही. या बाबास देहाकार नसूनही या चित्राबाईंस तो समुद्री जलविहारात ‘मौज’ करण्याचे निमंत्रण देतो हेदेखील या संतापाचे कारण नाही. भौतिक अस्तित्व नव्हे पण केवळ अनुभूती असलेला हा पुण्यपुरुष या चित्राबाईंस ‘या केशरचनेत तू किती सुंदर दिसतेस’ असे म्हणतो; म्हणून आपण अस्वस्थ व्हावे असेही मुळीच नाही. हा बाबा वीस वर्षांपूर्वी या चित्राबाईंस गंगाकिनारी भेटला म्हणे. असेलही तसे. कोणतेही भौगोलिक स्थान त्याचे अस्तित्व निदर्शक नाही आणि तरीही आपल्या क्षुद्र मानवी जगाशी जोडेल असा ‘ई-मेल’ मात्र त्याचा आहे. असू दे! हिंदूंना प्रिय अशा तीन वेदांची आद्याक्षरे ही त्याची ई-मेल ओळख असेना का!! पण या सर्वाविषयी तुम्हीआम्ही मत्र्य मानवांनी क्षुब्ध होण्याचे काहीच कारण नाही. असे पारलौकिक अनुभव येतात काही भाग्यवानांस, असे म्हणून एरवी या चित्राबाईंचा हेवा करीत त्यांच्याकडे दुर्लक्ष करता आले असते. पण कधी? जर हे सर्व त्यांच्या खासगी आयुष्याच्या परिघातच मर्यादित राहिले असते तर. तथापि त्यांच्या, आणि अर्थातच आपल्याही, दुर्दैवाने ते तसे नाही. म्हणून या वास्तवाचा समाचार घेणे अत्यावश्यक ठरते.

कारण ज्या भांडवली बाजारात आपल्यासारख्या कोटय़वधी सामान्यजनांची गुंतवणूक आहे, जो भांडवली बाजार जगातील सर्वात मोठय़ा बाजारांतील एक म्हणून आपण मिरवतो, ज्याची स्थापनाच मुळी हर्षद मेहताच्या घोटाळय़ानंतर त्याची पुनरावृत्ती टळावी म्हणून केली गेली त्या भांडवली बाजाराचे व्यवहार या कोणा भुक्कड बाबाच्या सल्ल्याने होत होते आणि ते रोखण्यासाठी आपल्या नियंत्रकांनी काहीही केले नाही; हे यामागील संतापाचे कारण. हा बाबा उजेडात येण्याआधी या बाईंचा सह-स्थान घोटाळा उघड झाला. म्हणजे यात बाजाराची उलाढाल ज्या संगणक प्रणालीद्वारे होते तिची ‘प्रतिकृती’ तयार केली गेली आणि क्षणाचा एक-दशांश वा आणखी लहान काळासाठी ती काही विशिष्ट सटोडियांस उपलब्ध करून दिली गेली. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हा-आम्हास बाजार सकाळी ८.५० वाजता सुरू होत असेल तर तो या सटोडियांसाठी क्षणाचा काही भाग आधी सुरू होई. सर्वसामान्यांस हे वाचून ‘त्यात काय एवढे’ असा प्रश्न पडेल. पण ज्या बाजारात शब्दश: एकेका पैशाच्या फरकाने कोटय़वधी रुपये कमावले वा गमावले जातात तेथे इतका फरकही महत्त्वाचा असतो. या बाजारात गुंतवणूक करणाऱ्या आणि या उलाढालींची माहिती असलेल्या कोणा अनामिक सिंगापूर-स्थित जागल्याने याची तक्रार केल्यावर आपल्या नियामकांस हे कळाले.

कधी? तर २०१५ साली. म्हणजे या घटनेस सात वर्षे झाली. याप्रकरणी बाजारपेठ नियंत्रक ‘सेबी’ने चौकशी सुरू केल्यावर हे बाबा प्रकरण उघडकीस आले. या चित्राबाईंनीच नेमलेला एक खास अधिकारीच हा बाबा असावा असा वहीम आहे. आनंद सुब्रमण्यम हे या भाग्यवान व्यक्तीचे नाव.  या ‘आनंद’ अधिकाऱ्यासाठी चित्राबाईंनी ‘एनएसई’चे सर्व नियम पायदळी तुडवले. ते केवळ त्याचा कार्यालयीन कक्ष आपल्या कार्यालयास खेटून ठेवण्यापुरतेच मर्यादित नव्हते. तर अवाचेसवा वेतनापासून ते अन्य सर्व ‘सुविधा’ही त्यास देऊ केल्या. बाईंचे वार्षिक वेतन साडेसात कोटी रुपयांच्या घरात तर या अधिकाऱ्याचा मेहनताना या खालोखाल. त्यासाठी इतके करणे एकवेळ क्षम्यही ठरले असते जर या अधिकाऱ्याची गणना एनएसईच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांत करून त्याप्रमाणे ‘सेबी’स तसे कळवले गेले असते तर. कळीच्या पदावरील अधिकाऱ्यांचा तपशील नियामकास कळवणे कायद्याने बंधनकारक असते.  तीन वर्षांत या गृहस्थास चित्राबाईंनी सहा वेळा पदोन्नत केले असल्याचे दिसते. पण तरीही त्याची माहिती ‘सेबी’स नाही. या उप्परही बाबा आहेच. आपले महत्त्वाचे निर्णय, कार्यालयीन तपशील आदी सर्व माहिती या बाई या बाबाचरणी वाहात असल्याचे आढळून आले. आता तर असेही म्हटले जाते की ‘एनएसई’च्या संचालक मंडळासही याची कल्पना होती आणि चित्राबाई, हा अधिकारी आणि हिमालयीन बाबा वगैरे संबंधांचाही त्या सर्वास अंदाज होता. पण या संचालकांनी ना कधी त्याबाबत ब्र काढला वा बाजारपेठ नियंत्रक ‘सेबी’ने आपली नियामक नजर याकडे वळवली.

अशा तऱ्हेने हे सर्व व्यवहार बिनबोभाट सुरू होते. आज सात वर्षांनंतर गेल्या शुक्रवारी ‘सेबी’ या प्रकरणाचा १९० पानी अहवाल सादर करते. सहा-सात वर्षांच्या कथित चौकशीनंतर हा अहवाल. तो वाचल्यावर ही बाजारपेठेची नियंत्रक आहे की चित्रपट संवाद-लेखक असा प्रश्न पडावा. या बाई काय म्हणाल्या आणि त्यावर बाबांची प्रतिक्रिया असा हा अहवाल. चौकशी म्हणवून घेण्यासाठी जो करडेपणा लागतो त्याचा अंशही या कथित चौकशीत नाही आणि त्यात कोठेही या गुन्ह्याचा ढळढळीत उल्लेखही नाही. उलट हे जे काही झाले ते सर्व कार्यालयीन चुकीचा भाग आहे असे ‘सेबी’स वाटते. जनतेच्या पैशाने, जनतेच्या पैशावर जनतेसाठी स्थापन झालेली ‘एनएसई’ केवळ  ‘‘बाबा.. तुमच्या आशीर्वादावर सुरू आहे,’’ असे म्हणत चित्राबाई या अर्थव्यवस्थेतील कळीच्या संस्थेतले श्रेय बाबाचरणी वाहतात. पण याबद्दल ‘सेबी’चा काही संताप वगैरे झाल्याचे या अहवालावरून तरी वाटत नाही. हे सर्व उघड असताना चित्राबाई आणि सर्व संबंधित पायउतार झाले खरे. पण या सर्व ‘चुकी’ची शिक्षा काय? तर अवघे तीन कोटी रुपये इतका दंड. म्हणजे ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न यापेक्षा साधारण अडीचपट होते, तिची इतक्याच दंडावर सुटका. काय म्हणावे यास? आंतरराष्ट्रीय अर्थविश्वात या प्रकरणाने भारताची काय प्रतिमा होईल? अब्बाजान, औरंगजेब, हिजाब आदी गहन मुद्दय़ांत आणि मनमोहन सिंग यांस चलनवाढ रोखण्यात कसे अपयश आले वगैरे चर्चेत गर्क आपल्या शीर्षस्थांस या सर्वाचे पुरेसे गांभीर्य आहे काय? आणि त्यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या देशातील बाजारस्नेही कमावत्या वर्गास याची काही चाड आहे काय? शक्यता अशी की या प्रश्नांकडेही शहाणेसुरते जन आपापल्या राजकीय निष्ठांच्या चष्म्यातूनच पाहतील. एकेकाळी या देशात गुंतवणूकदार हितार्थ काम करणाऱ्या संस्था होत्या. तशा कोणामार्फत या सर्वास न्यायालयात खेचून अद्दल घडेल अशी शिक्षा व्हायला हवी. नपेक्षा हे सर्व क्षेत्रांना ग्रासणाऱ्या ‘बाबा’ वाक्यं प्रमाणम्’ असेच सुरू राहील.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial on nse ex md chitra ramkrishna nse co location case zws