मुलाखतींमधील संवाद, चौकशी आणि उलटतपासणी यांतील सीमारेषा जवळपास पूर्णपणे पुसल्या गेल्याच्या सध्याच्या इलेक्ट्रॉनिक वृत्तवाहिन्यांच्या काळात लॅरी किंग यांचे निधन अधिकच खंतावणारे ठरते. गेली काही वर्षे ते फारसे दिसत नव्हतेच. तरीही गतशतकात आणि विशेषत: सीएनएन वाहिनीवरील ‘लॅरी किंग लाइव्ह’ या मुलाखतवजा कार्यक्रमातून त्यांनी वृत्तवाहिनी संवादाची जी नवी परिमाणे निर्माण केली आणि त्या वेळची काही जुनी मोडीत काढली, त्यांचे स्मरण आजही होतच असते. पुन्हा हे सगळे घडून आले ते कोणत्याही आविर्भाव वा अभिनिवेशाविना, सहजप्रवृत्तीतून आणि सहजसंवादातून. लॅरी किंग ऊर्फ लॉरेन्स झायगर यांची पत्रकार-संवादकाची कारकीर्द तशी सुरू झाली १९५० च्या दशकात. परंतु सीएनएन वाहिनीवर १९८५ पासून सुरू झालेल्या ‘लॅरी किंग लाइव्ह’मुळे ते अमेरिकेत आणि नंतर जगभर प्रसिद्धी पावले. आपल्याकडे भारतात नव्वदच्या दशकात उदारीकरणामुळे खासगी व परदेशी दूरचित्रवाणी वाहिन्या दिसू लागल्या आणि लॅरी किंग आपल्या दिवाणखान्यातही येऊ लागले. उदार चौकसबुद्धीतून समोरच्याला बोलते करणारा, कोट-सूटऐवजी बाह्य़ा वर केलेला बुशशर्ट आणि खांद्यांवरून ओढलेले विजारीचे ‘सस्पेंडर’ अशा पाश्चिमात्य सर्वसामान्य पोशाखात दररात्री अवतरणारा हा मुलाखतकार येथेही लोकप्रिय होणारच होता. किंग यांची भाषा सोपी होती आणि प्रश्न छोटे असायचे. ते कमी बोलायचे आणि अधिक ऐकायचे. मुलाखतकाराने काय करावे नि काय करू नये यांविषयी त्यांचे ठोकताळे सोपे, पण धाडसी आणि कदाचित म्हणूनच आचरण्यास अवघड होते. ते काय होते?
‘सीएनएन’साठी त्यांनी जवळपास २५ वर्षे ‘लॅरी किंग लाइव्ह’ हा कार्यक्रम सादर केला. या काळात दलाई लामांपासून नेल्सन मंडेलांपर्यंत, फ्रँक सिनात्रांपासून कार्दाशियान भगिनींपर्यंत, गेराल्ड फोर्डपासून बराक ओबामा अशा अमेरिकी राष्ट्राध्यक्षांपर्यंत असंख्य वलयांकित मंडळींना बोलते केले. मुलाखतींसाठी किंवा मुलाखतींपूर्वी फार खोलात जाऊन संबंधित व्यक्ती वा विषयावर संशोधन करायचे नाही यावर त्यांचा कटाक्ष असे. हा पवित्रा सीएनएन आणि त्यापूर्वी ज्यांच्या-ज्यांच्याबरोबर लॅरी यांनी काम केले, तेथील वरिष्ठ मंडळींना सुरुवातीला काहीसा घाबरवून सोडी. लॅरी मग खुलासा करत : आपल्या प्रेक्षकांपेक्षा एखाद्या व्यक्तीविषयी फार अधिक माहिती आपल्याला असण्याचे कारण नाही. तसे झाल्यासच त्यांच्यासारखे प्रश्न आपल्याला विचारता येतील, हा यामागील विचार. मुलाखत कशी असावी? तिच्या सुरुवातीला समोरच्याविषयी जे माहिती होते, त्यात मुलाखतीअखेर भर पडेल अशी! या भूमिकेत जसा बालसुलभ चौकसपणा होता, तशीच दयाबुद्धी आणि उदारबुद्धीही होती. यातूनच कधी बिल क्लिंटन यांना मोनिका ल्युइन्स्की प्रकरणादरम्यान प्रश्न विचारला जाई- ‘हे प्रकरण सोडा; पण तुम्ही न्यायासनासमोर जे शपथेवर खोटे बोललात, त्याचे काय?’ किंवा एखाद्या राष्ट्राध्यक्षाला आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर विचारण्याऐवजी- ‘या पदावर असताना तुम्हाला अजिबात न आवडणारे काम कोणते’ किंवा ‘आयुष्यात सर्वात मोठी चूक कोणती मानाल?’ असे प्रश्न संबंधित पाहुण्याइतकेच प्रेक्षकांनाही भावून जायचे. विख्यात अभिनेते-गायक फ्रँक सिनात्रा कधीही मुलाखती द्यायचे नाहीत. ते लॅरी किंग यांच्याकडे आले. त्यांच्यातील हा संवाद पाहा- ‘‘किंग : ‘आज येथे कसे काय?’ सिनात्रा : ‘तू बोलावलेस म्हणून आलो. तुझ्याशी गप्पा माराव्याशा वाटल्या. खूप दिवसांत भेटलो नाही आपण’!’’ ती मुलाखत पाहून लगेचच आणखी एक मनस्वी अभिनेता मार्लन ब्रँडो हेही त्या कार्यक्रमात हजर झाले!
आता अशी दयाबुद्धी, उदारमतवाद आणि चौकसपणाही उतरणीला लागलेला दिसतो. माहितीच्या लाटा दरक्षणी येऊन आदळतात. अशा काळात मुलाखतीसाठीची तयारी न करणे (ती प्रत्यक्ष मुलाखतीदरम्यान किती दिसते हा स्वतंत्र मुद्दा!) हे तर महापातक. लॅरी किंग यांच्याकडून २५ वर्षांतील ६० हजार मुलाखतींदरम्यान चुका झाल्या नाहीत असे नाही. पण मुलाखत म्हणजे पोलिसी चौकशी नव्हे किंवा न्यायालयीन उलटतपासणीही नव्हे, हे पथ्य त्यांनी न सांगता पाळले. भारतात सीएनएन, बीबीसीसारख्या वाहिन्या दिसू लागल्यानंतर पाव शतकाहून अधिक काळ लोटला. तरीही प्रणय रॉय किंवा करण थापर यांच्यासारखे सन्माननीय अपवाद वगळता, लॅरी किंग किंवा बीबीसी वाहिनीवर ‘हार्ड टॉक’ कार्यक्रम गाजवलेले टिम सेबॅस्टियन यांच्यासारखे संवादक आपल्याकडे तयार होऊ शकले नाहीत हे वास्तव. असे संवादक हे परिपक्व लोकशाहीचे लक्षण असते. सांगण्यापेक्षाही ऐकून घेण्याची सवय रुजवावी आणि मुरवावी लागते. समोरच्याशी संवाद म्हणजे बोलते करणे. गळे-बखोट पकडणे नव्हे! तसेच अशा मुलाखती म्हणजे पांडित्यप्रदर्शनही नव्हे. पुन्हा पांडित्य नसूनही ते दाखवण्याचा सोस तर थेट हास्यास्पद ठरतो. होतकरू संवादकांनी आजही लॅरी किंग यांच्या असंख्य मुलाखती अभ्यासण्यासारख्या आहेत. पण त्यांच्यासारख्या संवादकांचे आश्रयस्थान असलेल्या ‘सीएनएन’सारख्या वाहिन्या येथे कुठे आहेत?
