प्रफुल्ला डहाणूकर यांच्या शनिवारी सकाळी झालेल्या निधनानंतर, रविवारी मराठी वृत्तपत्रांनी त्यांना आदरांजली वाहण्यात कसूर सोडली नसली तरी महाराष्ट्राच्या राजधानीत प्रमुख आवृत्त्या असणाऱ्या इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये डहाणूकर यांच्या निधनाची बातमीही शोधावी लागणे, हे शोभनीय नाही. प्रफुल्ला डहाणूकर हे व्यक्तिमत्त्व गेली किमान साडेचार दशके मुंबईत आणि गोव्याच्याही कलाविश्वात सतत कार्यरत होते. स्वत: चित्रकार असल्या तरी शास्त्रीय संगीतातील जितेंद्र अभिषेकी, भीमसेन जोशी ते रविशंकर, कुमार गंधर्व यांच्याशी सहज संवाद साधू शकणाऱ्या, साहित्यात कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे यांच्यापासून ते नाटय़क्षेत्रातील सतीश दुभाषी, सत्यदेव दुबे अशा अनेकांची महत्ता ओळखूनही त्यांच्याशी मैत्रीण ही ओळख कायम ठेवणाऱ्या आणि नवोदित चित्रकार, गायक वा नाटय़कर्मीपर्यंत सर्वासाठी काही ना काही करणाऱ्या प्रफुल्ला डहाणूकर. एकोणीसशे पन्नास आणि साठच्या दशकांमध्ये आधुनिक भारत घडविण्यासाठीची जी उमेद होती, ती जणू प्रफुल्ला जोशी नावाची एक चित्रकर्ती मुंबईच्या भुलाभाई मेमोरिअल इन्स्टिटय़ूट या कलासंकुलात आली, तेव्हा तेथील विविध स्टुडिओंमध्ये एकवटली होती. त्या वेळच्या प्रफुल्ला जोशी पुढे डहाणूकर झाल्या, तरी ही उमेद त्यांनी कायम ठेवली. काळाने त्यांना नेले, तरी त्या ओळखल्या जातील अशा उमेदीसाठी आणि सर्वाशी सहज संवाद साधण्याच्या, कुणालाही सहज मदत करण्याच्या त्यांच्या स्वभावामागच्या मानवी मूल्यांसाठी. प्रत्येक वृत्तपत्राला असलेले, प्राधान्यक्रम ठरवण्याचे स्वातंत्र्य वादातीत मानायला हवेच, पण मराठीत प्रफुल्ला डहाणूकरांच्या बातमीचे मोल जास्त आणि इंग्रजीत मात्र नगण्य, ही स्थिती चित्रकलेच्या बाजारीकरणावर झगझगीत प्रकाश टाकणारी आहे. याच बाजारीकरणापेक्षा वेगळे, जेथे सारे चित्रकार एकमेकांचे मित्र आहेत अशा कलासमाजाचे स्वप्न पाहू शकणाऱ्यांपैकी प्रफुल्ला डहाणूकर हे महत्त्वाचे नाव होते. बाजार ही कलाकारांसाठी ‘आवश्यक आपत्ती’ आहे, हे सत्य प्रफुल्ला यांनी कधीही नाकारले नाही. मात्र, कलाबाजारातील पैसा, त्या पैशाच्याच बळावर प्रसारमाध्यमांनी निर्माण केलेले सेलेब्रिटी आणि या तथाकथित सेलेब्रिटी मंडळींना मिळत राहणारी अवास्तव प्रसिद्धी अशा साऱ्या तृतीय-पानी भंपकपणापासून प्रफुल्ला डहाणूकर नेहमीच दूर राहिल्या.  प्रफुल्ला यांनी वेळोवेळी जे निर्णय घेतले, त्यांपैकी काही थोडे वेगळे आणि अवाक् करणारे होते, म्हणून त्यावर वाद करण्याचाही प्रयत्न काही वेळा झाला. उदाहरणार्थ, बॉम्बे आर्ट सोसायटीच्या शतकमहोत्सवी वर्षांत, काही स्थायी स्वरूपाचा निधी तरुण कलावंतांसाठी उभारता यावा म्हणून भीमसेन जोशी यांचे गायन सुरू असतानाच मकबूल फिदा हुसेन यांनी सर्वादेखत एक मोठा कॅनव्हास रंगवायचा, ते चित्र विकून निधी उभारायचा अशी कल्पना प्रफुल्ला यांनी मांडली, तडीसही नेली. परंतु हुसेन रंगवणार असलेला तो कॅनव्हास कार्यक्रमाच्या आधीच विकण्यातसुद्धा त्या यशस्वी झाल्या. कला आणि समाज, या समाजातील नवोदित आणि होतकरू कलावंत, यांचा मेळ घालायचा तर संस्था हव्यातच, हे प्रफुल्ला यांना पुरते पटलेले होते. नेमके हेच संस्थाजीवन, १९९०च्या दशकापासून जागतिकीकरणोत्तर नवश्रीमंतीची सूज चढत गेलेल्या कलाबाजाराने बिनमहत्त्वाचे मानले. बाजारासोबत संस्थाही वाढल्याच पाहिजेत, स्पर्धा आणि सहजीवन यांना पैशात मोजले जाऊ नये आणि कलावंतांच्या निरागस उत्साहातून, कलेतिहासाच्या करडेपणालाही छेद जावा अशी मूल्ये प्रफुल्ला साक्षात जगल्या. असे जगणारे लोक कमी असतात आणि आपण चित्रकार नसलो तरी, असे लोक गेल्यावर समाज म्हणून आपलेही काही तरी हरपते, हे आपल्याला कळायला हवे.