|| मनोज पाथरकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बर्मा (आजचा म्यानमार) येथील ब्रिटिश इम्पिरिअल पोलीस दलात रुजू होण्याचा एरिक ब्लेअरने बरोबर १०० वर्षांपूर्वी घेतलेला निर्णय म्हणजे ‘जॉर्ज ऑर्वेल’ होण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल. त्याची लेखकीय वाटचाल इथूनच घडत गेली..

जानेवारी १९२२ मध्ये ईटनसारख्या इंग्लंडमधील उच्चभ्रू शाळेत शिकलेल्या एरिक ब्लेअर या तरुणाने ऑक्सफर्ड किंवा केंब्रिजला न जाता बर्मा येथील ब्रिटिश इम्पिरिअल पोलीस दलात रुजू होण्याचा निर्णय घेतला आणि ‘जॉर्ज ऑर्वेल’ होण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. असा जगावेगळा निर्णय घेणारा ईटन शाळेच्या इतिहासातील तो बहुधा पहिला आणि शेवटचाच विद्यार्थी असावा. आज या घटनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या शंभर वर्षांत ऑर्वेलची कारकीर्द आणि साहित्य यांबद्दल इतके काही लिहिले-वाचले गेलेले आहे, की त्याची तुलना शेक्सपिअर, डिकन्स किंवा जॉईसशी केली जाऊ शकते. पण खरे सांगायचे तर केवळ एक सर्जनशील लेखक म्हणून ऑर्वेल या दिग्गजांच्या पंक्तीत बसणारा नाही. तो सर्वश्रुत झाला याची दोन कारणे सांगता येतील – विसाव्या शतकातील समस्यांवर विशिष्ट शैलीत केलेले चिंतन आणि ‘राजकीय लेखन एक कला म्हणून’ विकसित करण्याचा प्रयत्न. अर्थात, यामागे आणखीही एका गोष्टीचा सिंहाचा वाटा होता – पाश्चात्त्य जगताला त्याचे साहित्य शीतयुद्धाच्या काळात कम्युनिझमविरोधी प्रचारयुद्धात महत्त्वाचे वाटले. हे त्याच्या कादंबऱ्यांच्या बाबतीत मान्य करावेच लागते (हे न विसरता, की त्यांतील अनेक गोष्टींचा वेगळा, प्रचाराला छेद देणारा अर्थ लावला जाऊ शकतो).  मात्र ऑर्वेलचे निबंध आणि वृत्तपत्रीय लेख ही एक विलक्षण विचारप्रवर्तक निर्मिती आहे. आजही हे लेखन महत्त्वाचे का ठरते याचे एक उत्तर ऑर्वेलने १९२२ साली घेतलेल्या निर्णयात सापडते.

ऑर्वेलचा प्रवास

ऑर्वेलच्या आयुष्यात अनेक महत्त्वाची वळणे आली ज्यांनी त्याच्या कारकीर्दीला आकार दिला. ब्रिटिश समीक्षक रेमंड विल्यम्स् यांच्या शब्दांत ‘इतिहासाची दिशा ठरवणाऱ्या निर्णायक क्षणी ऑर्वेल योग्य ठिकाणी हजर झालेलाच नाही तर त्या प्रक्रियेत सामीलही झालेला दिसतो.’ १९२० च्या दशकात बर्मा येथील पोलीस दलात कार्यरत असल्याने ब्रिटिश साम्राज्याला लागलेली उतरती कळा जवळून पाहणे त्याला शक्य झाले. याच दशकाच्या शेवटच्या वर्षांत कलेचा प्रांत कायमचा बदलून टाकणाऱ्या पॅरिसमधील कलावंतांच्या गोतावळय़ाचे त्याला जवळून दर्शन घेता आले. फॅसिस्ट आणि कम्युनिस्ट विचारसरणींमधल्या आंतरराष्ट्रीय संघर्षांचे प्रतिबिंब देशांतर्गत घडामोडींत पहिल्यांदा दृश्यमान करणाऱ्या स्पेनमधील यादवी युद्धात तो जनरल फ्रँकोच्या फॅसिस्ट सैन्याविरुद्ध लढताना दिसला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रणभूमीवर दाखल होण्यासाठी शारीरिक चाचणीत ‘अनफिट’ ठरल्याने प्रथम लंडन होमगार्ड आणि नंतर बीबीसीमध्ये काम करताना त्याने प्रचार आणि प्रसारमाध्यमे यांच्यातील परस्परसंबंधांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. दुसरे महायुद्ध संपून भांडवलशाही दोस्त-राष्ट्रे आणि साम्यवादी रशिया यांच्यातील शीतयुद्धाची औपचारिक सुरुवात होण्याआधीच त्याने साम्यवादी हुकूमशाहीवर बेतलेली ‘अ‍ॅनिमल फार्म’ लिहायला घेतली. ऑर्वेल या सगळय़ा ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार ठरण्यास कारण होते त्याने घेतलेले पठडीबाहेरचे निर्णय. यांपैकी कोणता निर्णय त्याला लेखक-पत्रकार म्हणून घडवणारा ‘टर्निग पॉइंट’ ठरला याबद्दल अनेक मते मांडली गेलेली आहेत.

खरा टर्निग पॉइंट

काहींच्या मते, त्याचा स्पेनमध्ये जाण्याचा निर्णय हा खरा ‘टर्निग पॉइंट’ होता. तर काहींच्या मते, साम्राज्यवादी पोलीस दलातील नोकरी सोडण्याचा निर्णय हा खरा ‘टर्निग पॉइंट’ होता. विद्यार्थीदशेत झालेल्या संस्कारांना महत्त्व देत काहींनी त्याचे ईटन शाळेत शिक्षण होणे निर्णायक ठरवले. तर काहींना त्याचा कम्युनिझमविरोधी कादंबरी लिहिण्याचा निर्णय सर्वात महत्त्वाचा वाटला. इथे लक्षात घ्यायला हवे, की ऑर्वेलच्या लेखनामागचा उद्देश होता ‘असत्याचे आवरण भेदून सत्य उघड करण्याचा’ प्रयत्न करणे. यात आत्मपरीक्षण आणि सत्तासंबंधांची जाणीव या दोन गोष्टी एकत्र येण्याची कळीची भूमिका होती. हे पाहता असे वाटते, की ईटन सोडल्यानंतर बर्मातील ब्रिटिश इम्पिरिअल पोलीस दलात सामील होण्याचा ऑर्वेलचा निर्णय त्याच्या आयुष्यातील खरा ‘टर्निग पॉइंट’ होता. हा निर्णय न घेता जर तो इंग्लंडमध्ये राहिला असता तर पुढे स्वभावाप्रमाणे तो बंडखोर लेखक झालाच असता. पण बर्मातील अनुभवांमुळे त्या बंडखोरपणाला मिळालेला वैश्विक राजकीय आयाम कदाचित मिळाला नसता.

बर्मात काम करताना ऑर्वेलने सत्ता गाजवणारे आणि सत्तेसमोर हतबल असलेले यांच्यातील संबंध खूप जवळून अनुभवला. सत्ता कशी माणसांना क्रूर बनवते आणि सभ्य, सुसंस्कृत (डिसेंट) समाजाची रचना अशक्य करून ठेवते हे त्याला आतून अनुभवता आले. बर्मातील सर्वसामान्य नागरिकांशी त्याने कसेही वर्तन केले तरी त्याला जाब विचारणारे कुणी नव्हते. खरेतर त्याच्या बरोबरीने काम करणारे साम्राज्याचे अधिकारी या नागरिकांना माणसेच समजत नव्हते, हे त्याच्या लक्षात आले. हीच दृष्टी घेऊन पुढे इंग्लंडला परतल्यावर त्याने पाहिले की उच्च मध्यमवर्गीय (आणि मध्यमवर्गीय) ब्रिटिश नागरिक कामगारवर्गातील सर्वसामान्यांना अशाच प्रकारे पूर्णाशाने माणसे समजत नाहीत. त्याला जाणवले की तोदेखील लहानपणापासून हाच दृष्टिकोन मनात बाळगत आलेला आहे. या आत्मपरीक्षणातूनच त्याची वर्गावर्गामधील सत्तासंबंधांची जाणीव अधिक तीक्ष्ण झाली. समाजात आपल्यापेक्षा वरचे स्थान असलेले आपल्याला कशी दुय्यम वागणूक देतात या ईटनमध्ये घेतलेल्या अनुभवाचा नवा, व्यापक अन्वयार्थ लागला. याची परिणती त्याने कामगारवर्गाशी आणि वर्गव्यवस्थेच्या तळाशी असलेल्यांशी जोडून घेण्यात झाली. आपल्यातील वर्गजाणिवेची धार बोथट करायची असेल तर कष्टकऱ्यांमध्ये, कोणतेही घरदार नसलेल्या भटक्यांमध्ये राहायला हवे, असे त्याला वाटले. यातूनच पुढे ‘डाउन अ‍ॅण्ड आऊट इन लंडन अँड पॅरिस’ या रिपोर्ताजवजा पुस्तकात शब्दबद्ध केलेले अनुभव त्याच्या जीवनाचा भाग झाले. त्याचा पुढचा सर्व प्रवास ‘ज्यांच्यावर सत्ता गाजवली जाते त्यांच्या बाजूने’ जग पाहण्याच्या प्रयत्नातून आकाराला आलेला दिसतो. याची सुरुवात म्हणून बर्मातील अनुभव एरिक ब्लेअरच्या ‘जॉर्ज ऑर्वेल’ म्हणून झालेल्या जडणघडणीत सर्वात महत्त्वाचा घटक ठरतो.

वेगळं वळण

पण मग ऑर्वेलने ईटननंतर विद्यापीठात न जाता बर्मा येथील पोलीस दलात जाण्याचा निर्णय का घेतला असावा? याची वेगवेगळी कारणे दिली गेलेली आहेत. त्यातील पहिले महत्त्वाचे कारण म्हणजे ऑर्वेल ऑक्सफर्ड आणि केंब्रिज या विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षांच्या अभ्यासात कमी पडला. ईटनमधील त्याचा टय़ूटर अँड्रयू गव् ( ॅ६) याने त्याची विद्यापीठात प्रवेशासाठी शिफारस करण्यास नकार दिला. असे विद्यार्थी विद्यापीठात पाठवल्यास ईटनची पत कमी होईल असे त्याचे मत होते.

यामागे ऑर्वेलने घेतलेला आणखी एक निर्णय होता. सुरुवातीला त्याने आपल्या टय़ूटरकडे इंग्रजी हा विशेष विषय घेऊन नाव नोंदवले. पण मध्येच त्याने इंग्रजी सोडून वर्षभर विज्ञानाचा अभ्यास करायचे ठरवले. जीवशास्त्र आणि सृष्टीविज्ञान यांबद्दल ऑर्वेलला खूप कुतूहल होते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर निसर्गाच्या वेगवेगळय़ा रूपांशी आणि चमत्कृतींशी त्याचे नाते जोडलेले राहिले. परंतु अभ्यासविषय म्हणून विज्ञानात प्रावीण्य मिळविण्याचा प्रयत्न काही त्याने केला नाही. एक वर्ष हा परिचयवजा अभ्यास करून तो पुन्हा मानव्यविद्यांकडे वळला. या वेळी त्याच्या टय़ूटरने त्याचे नाव पूर्वीप्रमाणे इंग्रजी विषयासाठी न घेता ‘सर्वसामान्य अभ्यास’ या गटात टाकले. प्रत्यक्षात विद्यापीठात प्रवेश मिळविताना कोणत्या तरी एका विषयात प्रावीण्य असण्याचा विद्यार्थ्यांला फायदा होत असे. ऑर्वेल हा अभ्यास करू शकणार नाही असे त्याच्या टय़ूटरला वाटल्याने त्याने कोणत्याही विशेष विषयासाठी त्याचे नाव घेतले नाही आणि तशी तयारीही करून घेतली नाही. पुढे सहा महिन्यांनी जेव्हा ऑर्वेलने पोलीस दलातील प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेली प्रवेशपरीक्षा दिली तेव्हा २९ उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये तो सातवा होता. त्याला ग्रीकमध्ये सर्वोत्तम गुण होते, त्याखालोखाल लॅटीन, इंग्रजी आणि फ्रेंच या विषयांचा क्रमांक होता. यावरून असे दिसते की त्याच्या ईटनमधील  टय़ूटरने सहानुभूतीपर्वक विचार करून ऑर्वेलला विशिष्ट विषयात तयार केले असते तर ऑक्सफर्ड किंवा केंब्रिज विद्यापीठात त्याला प्रवेश मिळणे अशक्य नव्हते.

अर्थात, ऑर्वेलनेही आपल्या टय़ूटरकडे याचा अजिबात पाठपुरावा केला नाही. त्याने विद्यापीठीय शिक्षणामध्ये रस न दाखविण्यामागे इतरही कारणे असावीत असे त्याच्या शाळेतील मित्रांनी आणि सहकाऱ्यांनी नंतर अनेकदा बोलून दाखवलेले आहे. आपल्या पहिल्या शाळेतील (सेंट सिप्रियन) त्याचा अनुभव फारसा चांगला नव्हता. हा अनुभव १९४८ साली लिहिलेल्या आणि त्याच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी, म्हणजे १९५२ साली प्रकाशित झालेल्या ‘सच सच वेअर द जॉइज’  (Such Such Were the Joys) या प्रदीर्घ लेखात शब्दबद्ध केलेला आहे. या दु:खद अनुभवानंतर ईटनला आल्यावर ऑर्वेलने जन्मजात टीकाकाराची भूमिका घेत तुच्छतादर्शक व्यक्तीचा (सीनिक) मुखवटा धारण केला. अजूनही स्पर्धेतील यश आपण समाजात कुठून सुरुवात करतो यावर अवलंबून आहे हे लक्षात आल्याने या दृष्टिकोनाचे रूपांतर बंडखोरीत होत गेले. ‘यशस्वी होणे’ ही कल्पनाच त्याला नकोशी वाटू लागली; कारण ही कल्पना ‘बूज्र्वा’ मध्यमवर्गाच्या ढोंगीपणाचे मर्म होती. ईटन ते ऑक्सब्रीज हा मार्ग पत्करणे त्याला यशाच्या सर्वमान्य कल्पनेला शरण जाण्यासारखे वाटले. पर्यायाने यशस्वी होण्याचा राजमार्ग मानले जाणारे विद्यापीठीय शिक्षण, तेही शिष्यवृत्तीच्या बळावर, घेण्याची फारशी धडपड त्याने केली नाही.

कौटुंबिक जबाबदारी

आणखी एक व्यवहारी कारण म्हणजे ऑर्वेलच्या कुटुंबाला कमावत्या पुरुषाची आवश्यकता होती. १९२१ पूर्वीच त्याचे वडील रिचर्ड ब्लेअर भारतातील सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले होते. त्याची बहीण अ‍ॅवरील केकशॉप काढण्याच्या प्रयत्नात होती. अशा वेळी इम्पिरिअल पोलीस दलातील नोकरी त्याला वडिलांच्या निवृत्तिवेतनापेक्षा कितीतरी जास्त मोबदला देणारी होती. तो विद्यापीठात प्रवेश मिळवण्यात अपयशी झालेला पाहून त्याच्या वडिलांची त्याच्याबाबतीत निराशा झालेली होती. निदान साम्राज्याची चाकरी करताना मोठय़ा पदापर्यंत पोहोचून त्यांच्यासमोर स्वत:ला सिद्ध करावे असेही ऑर्वेलला वाटले असावे. त्याने अनेकदा असेही म्हटलेले आहे की माझ्या कुटुंबात लष्करी परंपरा होती. पहिल्या महायुद्धात लढता आले नाही याची त्याला नेहमीच खंत वाटायची. पोलीस दलातील नोकरी करून कुठेतरी याची भरपाई करता येईल असाही विचार त्याच्या निर्णयामागे असावा.

वरील गोष्टींबरोबरच एकीकडे साहसाची ओढ आणि दुसरीकडे पौर्वात्य देशांबद्दल (जिथे ब्रिटनने मोठे साम्राज्य उभे केलेले होते) आकर्षण यांचाही ऑर्वेलच्या बर्मा येथे जाण्याच्या निर्णयात सहभाग असावा. किपिलगसारख्या लेखकांकडून मिळालेली ‘मॅजिकल ईस्ट’ ही कल्पना त्याने गंभीरपणे घेतली होती आणि त्याला ही जादू अनुभवायची होती. तसे पाहता पोलीस दलातील सेवेसाठी ठिकाणाचा पर्याय देताना जिथे त्याचा जन्म झालेला होता अशा भारतात जाणे जास्त सयुक्तिक ठरले असते. परंतु इथे त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी महत्त्वाची ठरली. ऑर्वेलची आई आयडा ही लिमझीन या बर्मामध्ये स्थायिक झालेल्या फ्रेंच कुटुंबात जन्मलेली होती. तिची आई, म्हणजेच त्याची आजी मुलेमिन येथे राहत होती. त्यामुळे बर्मा येथे नोकरीवर रुजू झाल्यास आपल्या फ्रेंच मुळांशी पुन्हा जोडून घेता येईल असे त्याला वाटले. ऑर्वेलच्या व्यक्तिमत्त्वात ब्रिटिश आणि फ्रेंच गुणावगुणांचे एक वेगळेच मिश्रण झालेले होते. राजकीय-सामाजिक विचार करताना तो नेहमी स्वत:ला युरोपियन पातळीशी जोडून घ्यायचा. त्याचे फ्रेंच साहित्याचे वाचनही बऱ्यापैकी होते. पुढे बर्मातील नोकरी सोडून पूर्णवेळ लेखनाकडे वळण्याचा निर्णय घेतल्यावर सर्वप्रथम त्याने काही काळ पॅरिसमध्ये वास्तव्य केले.

मानसिकतेचे विश्लेषण

ऑर्वेलचे चरित्रकार आणि समीक्षकांनी बऱ्याचदा ऑर्वेलच्या जडणघडणीची संगती लावताना त्याच्या वेगवेगळय़ा मनोगंडांकडे निर्देश केलेला आहे. काहींनी या गंडांचे मूळ त्याच्या पूर्व-प्राथमिक शिक्षणात शोधले. हे शिक्षण नन्सच्या मार्गदर्शनाखाली एका कॉन्व्हेंटमध्ये झालेले होते. काहींच्या मते, सेंट सिप्रिअन शाळेत घरापासून (आणि स्त्रियांच्या गराडय़ापासून) पहिल्यांदा दूर राहावे लागल्याने आणि सतत सामान्य घरातील असल्याची जाणीव करून दिली गेल्याने काही भावनांनी त्याच्या मनात घर केले असावे. यात सगळय़ात महत्त्वाची होती अपराधी भावना झ्र् त्याला नेहमी वाटायचे की आपण काहीतरी भयंकर चूक केलेली आहे, ज्याचे प्रायश्चित्त आपल्याला घ्यावेच लागेल. या अपराधी भावनेमागे आपल्यात कुठेतरी ‘परपीडेत सुख मानणाऱ्या प्रवृत्ती’ आहेत याची त्याला कल्पना आलेली होती. अधिकार गाजवण्याची आणि इतरांशी क्रूरपणे वागण्याची सुप्त ऊर्मी त्याच्या मनात होती. साम्राज्याच्या पोलीस दलातील नोकरी स्वीकारण्यामागे कुठेतरी ही भावनाही असणे शक्य होते. लेखक म्हणून प्रस्थापित झाल्यानंतर फॅसिझमविषयी लिहिताना ऑर्वेलने अनेकदा जॅक लंडनचा संदर्भ देऊन असे म्हटलेले आहे, की फॅसिझमचा खरा अर्थ आणि त्यातील धोका पूर्णपणे त्यांनाच कळतो ज्यांच्या स्वत:च्या व्यक्तिमत्त्वात सुप्त फॅसिस्ट वृत्ती दडलेल्या असतात.

कारण काहीही असो, ऑर्वेलने बर्मा येथील ब्रिटिश साम्राज्याच्या पोलीस दलात पाच वर्षे काढल्यामुळेच तो कठोर आत्मपरीक्षणाकडे वळला आणि एका विशिष्ट दृष्टिकोनातून (नंतर ज्याला ‘सबाल्टर्न’ म्हटले गेले) समाजातील सत्तासंबंधांकडे पाहू लागला. यातूनच त्याच्या पुढील प्रवासाने आणि लेखनाने आकार घेतला. ऑर्वेलची कारकीर्द आणि लेखन यांबद्दल अनेक प्रवाद आहेत (किंवा निर्माण केले गेलेले आहेत). त्याचा डावा विचार दिखाऊ होता का? त्याचे सुरुवातीपासूनच गुप्तहेर खात्याशी संबंध होते की शीतयुद्धाच्या काळात ते निर्माण झाले? त्याचा साम्राज्यवादविरोध कितपत खरा होता? त्याचे लेखन खरेच महत्त्वाचे आहे, की वेगळय़ाच कारणांमुळे ते डोक्यावर घेतले गेले? इत्यादी. याबद्दल ज्याने त्याने आपली भूमिका ठरवणे योग्य ठरेल, परंतु त्याआधी त्याचे लेखन वाचणे आणि त्यातून काय ध्वनित होते यावर विचार करणे आवश्यक आहे. यात त्याच्या कादंबऱ्यांबरोबरच त्याचे निबंध आणि वृत्तपत्रीय लेखही तितकेच महत्त्वाचे आहेत. ऑर्वेलचे वैयक्तिक गुणावगुण आणि लेखक म्हणून त्याची महानता हे मुद्दे गौण आहेत. त्याच्या लेखनाचा लावला गेलेला सोयीस्कर अर्थ बाजूला ठेवून ते वाचल्यास आजच्या प्रश्नांकडे चिकित्सक दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळत असेल, तर ते लेखन आजही महत्त्वाचे ठरेल.  रेमंड विल्यम्स म्हणतात त्याप्रमाणे ऑर्वेलचे लेखन विरोधाभासांत अर्थ शोधण्याचा निकराचा प्रयत्न होते.

 ऑर्वेलचा मोकळेपणा, त्याची ऊर्जा आणि इतिहासाच्या प्रक्रियेत उडी घेण्याची त्याची तयारी यांची भविष्यात वेळोवेळी गरज भासणार आहे. त्यासाठी त्याचे लेखन आणि त्याचा ऐतिहासिक प्रवास यांची केवळ उजळणी करून भागणार नाही तर ते व्यवस्थितपणे समजून घ्यावे लागेल.   

          manojrm074@gmail.com

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Burma myanmar british imperial police force george orwell to oxford or cambridge akp