रोहित वेमुला या २६-२७ वर्षांच्या तरुणानं हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठातील एका वसतिगृहात १७ जानेवारी २०१६ रोजी आत्महत्या केल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत, ९ ऑगस्ट २०१६ रोजी त्याच्या ‘दैनंदिन नोंदीं’चे पुस्तक प्रकाशित झालं. या प्रत्यक्षात त्याच्या ‘फेसबुक नोंदी’च आहेत. रोहित वेमुलाचं फेसबुक-खातं अद्याप सुरू आहे, त्यामुळे जरा वेळ काढल्यास या सर्व नोंदी कुणालाही वाचता येणार आहेतच. मग त्याचं २५० हून अधिक पानी पुस्तक कशासाठी?

याचं उत्तर आहे- वेळ वाचवण्यासाठी! सर्व नोंदींतून महत्त्वाच्या निवडून, विषयानुसार त्यांचं संपादन करून संगतवार लावून आणि आवश्यक तिथे संदर्भही देऊन या पुस्तकात मांडलेल्या आहेत, त्यामुळे रोहित वेमुला हा कार्यकर्ता आणि लेखक म्हणून कसा होता, हे लक्षात येणं अधिक सुकर होतं. फेसबुकवरच नोंदी वाचताना मध्येमध्ये जो प्रतिमांचा आणि प्रतिक्रियांचा भाग असतो, त्यात तर वेळ जातोच; पण नोंदींचा क्रम तारखेनुसारच असल्यानं वाचक म्हणून एकंदर अर्थसंगती लावणं हेही वेळखाऊच ठरतं.

‘हा तारखांचा क्रम पुस्तकात पूर्णत: काढूनच टाकावा का?’ हा प्रश्नच या पुस्तकाच्या संपादिका निखिला हेन्री यांच्यापुढे महत्त्वाचा होता. पुस्तकाच्या ११ प्रकरणांतून रोहितचा नास्तिकवाद आणि त्याचे राष्ट्रप्रेमाबद्दलचे विचार, जातिभेदाबद्दलची त्याची निरीक्षणं, प्रचलित राजकारणाबद्दल त्याचं म्हणणं, डाव्या पक्षांबाबत आस्था असूनदेखील त्यानं प्रसंगी या पक्षांवर केलेली टीका, ‘आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन’ या संघटनेच्या कार्यक्रमांबद्दल त्यानं लिहिलेली आवाहनं आणि डॉ. आंबेडकरांचं त्यानं केलेलं परिशीलन, हे सुसंगतपणे मांडलेलं दिसावं हा संपादिका म्हणून निखिला यांचा आग्रह होता, पण फेसबुक-नोंदी हे या लिखाणाचं मूळ स्वरूप असल्यानं अखेर, प्रत्येक प्रकरणात तारखेसह (पण तारखांच्या उतरत्या क्रमानुसार नव्हे) नोंदी या पुस्तकात वाचता येतात. प्रत्येक प्रकरणाला संपादिकेची छोटेखानी प्रस्तावना आहे. नोंदींतून दिसणारा रोहित कसा आहे, हेच ही प्रास्ताविकं सांगतात. वाचकांना ते कळणारच असतं.

हे पुस्तक वाचून झाल्यावरही लक्षात राहणारा भाग म्हणजे रोहित वेमुलाचा आशावाद, जीवनावरलं त्याचं (तारुण्यसुलभ?) प्रेम आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे विचार समजून घेण्याची त्याची तयारी. ख्रिस्तोफर हिचेन्स, व्हिक्टर ह्यूगो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वचनं तो चपखलपणेच उद्धृत करतो. त्यानं २३, २४ आणि २५ वर्षांचा असताना लिहिलेल्या या नोंदींत एवढा मिताक्षरीपणा नसता, तरी चालून गेलं असतं. पण रोहित नेमकं आणि मोजकं लिहितो. काही इंग्रजी शब्द वापरताना त्यात ढिलाई झाल्याचं वाचकांना (आता) जाणवूही शकेल. पण आपलं लिखाण वाचणारे लोक विचार करणारच आहेत, याची खात्री असल्यासारखा रोहित लिहीत राहिला होता हे आजही पक्कं लक्षात येतं. उदाहरणार्थ,  स्वामी विवेकानंद यांनी कोणताही नवा विचार दिलेला नाही, हे सांगताना तो त्यांना ‘अपॉलॉजिस्ट’ म्हणतो. विद्रोहाऐवजी प्रचारातच जास्त रस असणारे, अशा अर्थानं हाच शब्द रोहित स्वातंत्र्यपूर्व काळातल्या अनेक सवर्ण नेत्यांबद्दल वापरतो. पण पुढे आणखी एका नोंदीत, दलित राजकीय जाणिवांना कसं नाकारलंच गेलं हे सांगताना पुन्हा दलित हे जणूकाही ‘अपॉलॉजिस्ट’ आहेत अशा प्रकारे लोक (सवर्ण) वागतात, असंही तो म्हणतो. इथं शब्द-निवडीतली ढिलाई जाणवते.

एरवीही, फक्त शब्दानं लढणाऱ्यांपैकी रोहित नव्हताच आणि तो जाणिवांनी लढणारा होता, याची साक्ष अनेक नोंदींतून मिळत राहाते. शाब्दिक टीका करत राहून किंवा मुद्दे खोडून काढत राहून प्रतिवाद करण्यापेक्षा नेमका आतला मुद्दा मांडण्याकडे त्याचा कल जास्त होता, हे लक्षात येतं. समाजाबद्दल आणि विशेषत रोहित ज्या क्षेत्रात कार्यरत होता त्या विद्यार्थी-चळवळीबद्दल पुरेपूर संवेदनक्षमता रोहितकडे असल्यानं, तो जगला असता तर आणखी सुयोग्य शब्दांत लिहू शकला असता, असंही वाचकांना वाटू शकेल. रोहितला दिसणारा ‘समाज’ हा वंचितांचा, शोषितांचा आहे. दलितांचा आहे. त्या वर्गाशी त्यानं नातं जोडलं आहे आणि मुख्य म्हणजे, मुलींविषयीच्या तारुण्यसुलभ भावना असल्या तरीही स्त्रीच्या आत्मसन्मानाची जाणीव त्यानं कधीही, कुठेही सोडलेली नाही. आईला  ‘जीवरक्षक’ मानणारा रोहित, तिच्या आयुष्यातून बरंच काही शिकला असावा. मात्र याचे तपशील तो देत नाही.

कम्युनिस्टांवर रोहितनं कशी टीकाच केली होती, हा मुद्दा बऱ्याच चवीनं चर्चिला जातो. ही टीका आत्मीयतेतूनच होती, याची उदाहरणं नोंदींगणिक मिळतात. राजकीय पक्षांमध्ये त्यानं केलेलं तारतम्य सन २०१३ मध्ये चार विधानसभांच्या निवडणूक-निकालांबद्दलच्या नोंदीत दिसतं. काँग्रेस हरल्याबद्दल समाधान, भाजपचा दिल्लीखेरीज सर्वत्र विजय झाल्याबद्दल तीव्र असमाधान आणि ‘आप’च्या विजयाकडे साकल्यानं पाहताना, ‘काळासोबत नवे प्रश्न पाहण्याचं, नवं नेतृत्व आणण्याचं हे काम खरं तर डाव्यांनी केलं पाहिजे होतं’ असा निष्कर्ष या नोंदीत आहे. हैदराबादेत झालेल्या अधिवेशनानंतरच्या नोंदीत मात्र, दलित नेतेही डाव्या सवर्ण नेत्यांनी केलेल्या चुकांचीच री ओढत आहेत, याबद्दल रोहितचा संताप दिसतो. शब्दांऐवजी जाणिवांना महत्त्व, समानतेवर मुळात विश्वास, जगभरच्या शोषितांबद्दल आत्मीयता, ब्राह्मणीकरणावर नोंदवल्या गेलेल्या आक्षेपांचं आकलन, विद्रोह अपरिहार्य मानून त्याचे मार्ग ‘आत्ताचे’ असावेत असा आग्रह.. आणि अखेर, तो आग्रह लक्षात न घेणारे आपले नाहीत असं मानण्याची वृत्ती, यातून रोहितची दलित जाणीव दिसत राहाते.

रोहितच्या तीन कवितावजा नोंदीही आहेत. काव्य म्हणून त्या फार दर्जेदार नाहीत. पण त्याचे प्रवाही विचार त्यातून कळतात. ‘इतिहास जेत्यांचा नव्हे, लोकांचाच असतो’ असं रोहित आळवून सांगतो, ती कविता वाचताना त्याच्या आत्महत्येला ‘निष्प्रभ’ करण्याचे व्यवस्थात्मक प्रयत्नही नक्कीच आठवतील. नायकत्त्व नाकारण्याचा प्रयत्न त्यानं केला. स्वतच्या धूम्रपान-बिअरपानाबद्दल लिहिलं. पण आत्महत्येनंतर तो नायक ठरलाच. अगदी अलीकडे, ‘रोहित वेमुला याची आईच दलित नव्हती, त्यामुळे तोही दलित नव्हताच.. त्याच्याशी विद्यापीठ योग्यच वागलं आणि त्यानं आत्महत्या वैफल्यातून केली’ असा शोध लावणारा एक अहवाल आला आहे. याच गोष्टी हज्जारदा सांगितल्या जातील. पण रोहित वैफल्यग्रस्त कसा काय असेल, तो दलित नाही असं सांगून तो ज्याविरुद्ध लढला त्या अन्यायाला कितपत नाकारता येईल, हे प्रश्न कायम जिवंत ठेवण्याचं काम या पुस्तकानं केलं आहे.