चंद्रास्वामी, धीरेंद्र ब्रह्मचारी यांच्यापासून बाबा रामदेव यांच्यापर्यंत राजकीय प्रभाव आणि संपत्ती असलेल्या गुरूंचा मागोवा घेणारे हे पुस्तक आहे..

पूर्णत: बुद्धीवर चालणारा जसा कुणी असण्याची शक्यता नसते तसाच पूर्णत: श्रद्धेवर चालणाराही कुणी असण्याची शक्यता कमीच. मुद्दा बुद्धी आणि श्रद्धा परस्परांशी योग्य प्रमाणात आहेत की नाहीत, हा आहे.  गौतम बुद्ध, सॉक्रेटिस यांसारख्या महामानवांनी धर्मनिष्ठांशी बुद्धीच्या जोरावर टक्कर घेतली. कालबाह्य़ धर्मश्रद्धांवर हल्ले केले. त्या खिळखिळ्या केल्या. तरीही शेकडो वर्षे लोटूनही खिळखिळ्या झालेल्या धर्मश्रद्धा एकत्र जोडण्याचे काम आजही केले जात आहे. यात गुरू, बाबा, महाराज यांचे कार्य अविरत सुरू आहे. बुद्धी आणि श्रद्धा यांचा सांधा तोडून स्वत:च्या लाभासाठी काही गुरूंनी जनमनाला आपल्या चरणी लीन होण्यास भाग पाडले. धर्मप्रसारक, धर्मवर्धिष्णु करणारे म्हणून हजारो वर्षांपासून समाजमनावर अधिराज्य गाजवणारे गुरू करणे हे अनेकांसाठी स्टेट्स सिम्बॉल ठरले आहे. हे गुरू सर्वार्थाने राजकारणात वरचढ ठरल्याची उदाहरणे जास्त आहेत. धर्म या संकल्पनेशी त्यांचे हितसंबंध जोडलेले होते आणि आहेत.

भारताचे हे गुरू जागतिक ख्याती मिळविलेले आहेत. ते सर्वाचे आहेत; पण त्यांच्याभोवती एक गूढ वलय आहे. बहुरंगी सांस्कृतिक मातीतली ती फळे आहेत, असे म्हणायला हरकत नाही. यापैकी बहुतेक जण स्वत:ला देवाचा अंश मानतात. इहलोकीचे दु:ख निर्दाळण्यासाठी म्हणून आम्ही आमचे अवतारकार्य पूर्ण करीत आहोत, अशी त्यांची स्वत:विषयीची दृढ भावना असते. सर्व संसारसुखे त्यागूनही त्यांची तंत्रज्ञान आणि बाजारपेठांवर पकड आहे. कुटुंबातील सर्वाना भल्याबुऱ्याचे सल्ले देणारे, स्वत:च्या विमान, हेलिकॉप्टरमधून विश्वभ्रमंती करणारे गुरू पैशाने गडगंज आहेत. देशातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी त्यांच्या शेकडो हेक्टर जमीनजुमला, जागा आहेत, त्याचबरोबर अनुयायांच्या मनातही कधीही नष्ट न होणारे स्थान आहे.

मुरब्बी पत्रकार, लेखिका भवदीप कांग यांनी आपल्या ‘गुरूज-  स्टोरीज ऑफ इंडियाज लीडिंग बाबाज’ या पुस्तकात नवगुरूंच्या व्यक्तित्वाचा उभा-आडवा पोत तयार केला आहे. या साऱ्या कथा आहेत जे घडले ते सांगणाऱ्या. गुरू म्हणजे असाधारण व्यक्तित्व. या व्यक्तित्वामागे दडलेला माणूस शोधण्याचा ओझरता प्रयत्न केला आहे. गुरूंची अनेक विषयांवरील मते काय आहेत, यावरून त्यांची जनमानसात असलेली प्रतिमा काय आहे, याचा शोध या पुस्तकात घेण्यात आला आहे. काही बऱ्या-वाईट प्रसंगांतून हे नऊ गुरू प्रतिबिंबित होत गेले आहेत. लेखिकेने स्वत: संशोधन, गुरूंशी झालेल्या मुलाखती आणि त्यांच्यावरील उपलब्ध ग्रंथांच्या अभ्यासातून ते अधिक रेखीव करण्याचा प्रयत्न केला आहे.

पहिले प्रकरण महर्षी महेश योगी यांच्यावरील आहे. भारताचे पहिले पॉपगुरू अशी यांची ओळख. महर्षी महेश यांना वयाच्या २३व्या वर्षीच नश्वर जगाची जाणीव झाली. मध्य प्रदेशातील जबलपूर येथे आलेल्या एका सद्गुरूंच्या भेटीने स्तंभित झालेला महेश सर्वज्ञानी होण्यासाठी तयार झाला आणि त्यांनी सहज ध्यानधारणेचे गुपित मिळवले. १९५९ मध्ये महर्षीचे अमेरिकेत पाऊल पडले. सन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांनी जाहीर केले की सहज ध्यानधारणा करण्यासाठी येत्या तीन वर्षांत २५ हजार योगशिक्षक तयार केले जातील. जे संपूर्ण अमेरिका आणि युरोपमध्ये काम करतील. त्यानंतरच्या काळात बहुतेक पाश्चिमात्य देशांत ध्यानधारणा केंद्रांच्या माध्यमातून कोटय़वधी रुपयांची मालमत्ता महर्षीच्या नावावर झाली. अमेरिकेत महर्षी यांच्या अनुयायांनी राजकीय पक्षही स्थापन केला.

महर्षी महेश योगींच्या ध्यानधारणेचा मोठा प्रभाव अमेरिका आणि युरोपभर झाला. त्यानंतर काही वर्षांनी ‘बीटल्स’ महर्षीच्या सान्निध्यात आले. हे बीटल्स म्हणविणारे चौघे पॉप-संगीतकार आणि महर्षी यांचे मेतकूट आणि नंतर त्यांच्यातील ताटातूट हा अनेकांच्या चर्चेचा विषय असला तरी भारतीय तत्त्वज्ञानाविषयी अमेरिकनांच्या मनात कुतूहल निर्माण करण्याचे काम महर्षी यांनी केले. त्यांच्यावर काही महिलांशी लैंगिक संबंध असल्याचे आरोप केले गेले; परंतु त्यावर महर्षी यांच्याकडून ना कोणतेही स्पष्टीकरण दिले गेले वा आरोपांचे खंडन केले गेले. अखेरच्या काळातील अनेक वादळांना तोंड देत महर्षी केवळ हसतच राहिले (पाश्चात्त्यांनी हे हसणे ‘फिदीफिदी’ आहे असे ठरवले आणि त्यांच्या या हसण्यापायी त्यांना ‘गिगलिंग गुरू’ हे नामाभिधान जोडले गेले). पण क्लेशाचा लवलेशही त्यांच्या ठायी दिसला नाही. भारतीय धर्मसंस्कृतीतील गूढवाद पश्चिमेपर्यंत पोहोचवणारे गुरू अशी ख्याती मिरवणारे महर्षी हे ‘स्वामी विवेकानंदांच्या नंतरचे अमेरिकेवर प्रभाव गाजवणारे गुरू’ असेही म्हणता येते.

ज्योतरपीठाचे शंकराचार्य ब्रह्मानंद सरस्वती यांच्या निर्वाणानंतर त्यांचे शिष्य शांतानंद स्वामी यांना गादीवर आणले गेले. याचे कारण असे दिले की महेश वर्मा हा उच्चवर्णीय नाही, त्यामुळे तो गादीवर बसू शकत नाही.. महर्षी यांनी आपल्या अखेरच्या श्वासाच्या काही तास आधी लेबनॉनचे माजी संशोधक, वैज्ञानिक टोनी नादेर (आताचे महाराजा नादेर राम) यांची वारसदार म्हणून निवड केली.

धीरेंद्र ब्रह्मचारी यांच्यावरील प्रकरण हे गांधी घराणे आणि ब्रह्मचारी यांच्यातील संबंधावरच आहे. धीरेंद्र हे देखणे गुरू होते. ते इंदिरांना योग शिकवायचे. तसा इंदिराजींचा हट्ट असायचा. धीरेंद्र यांच्यासाठी ज्या काही सुविधा मिळवून द्यायच्या आहेत, त्यासाठी इंदिराजींनी वडील जवाहरलाल नेहरू यांच्याकडे वारंवार आग्रह धरले आणि योगगुरूंची इच्छा पूर्ण होईपर्यंत ते सोडलेही नाहीत. मग ते धीरेंद्र यांच्या योग संस्थांसाठी लागणारी जमीन असो वा सरकारी मंजुरी किंवा शिक्षणमंत्री बदलण्यापर्यंतची ही आग्रहपूर्ती होती. धीरेंद्र यांना सर्व काही सहजरीत्या मिळत गेले. काही क्षणी सरकारमध्ये कोण शिक्षणमंत्री असावा, याची सूचना धीरेंद्र करीत असत. या आणि अशा अनेक घटनांनी नेहरूंनाही काव आणला होता, याचे उल्लेख या पुस्तकात आहेत. दिवंगत लेखक, पत्रकार खुशवंत सिंग यांनी नोंदवून ठेवले आहे की, धीरेंद्र दणकट शरीरयष्टीचे, उंचपुरे आणि देखणे होते. त्यांच्या डोळ्यात एक आकर्षित करणारे तेज होते. भल्या पहाटे ते इंदिराजींना योगाचे धडे शिकविण्यासाठी येत असत. बंद दरवाजामागे ते इंदिराजींना योग शिकवत असत. धीरेंद्र यांचा राजकीय प्रभाव पुढे इतका वाढत गेला की, त्यांना दिल्लीतील फ्रेंड्स कॉलनीत आलिशान घर आणि महागडय़ा गाडय़ा मिळाल्या. त्यांच्या विश्वायतन योगाश्रमासाठी जमीनही बहाल करण्यात आली. पुढे आणीबाणीनंतर त्यांच्यावर गैरव्यवहाराचे अनेक आरोप झाले आणि इंदिरा गांधींचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर सर्व आरोप मागे घेण्यात आले आणि त्यांच्यावरील खटले रद्दही करण्यात आले. योगगुरू म्हणून थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत आपला दीर्घ प्रभाव आणि प्रसंगी दबदबा दाखविणारी धीरेंद्र ब्रह्मचारी ही भारतातील पहिलीच व्यक्ती होती.

माता अमृतानंदमयी यांच्यावरील प्रकरणातून लक्षात राहाते ती एका मुलीची तक्रार.. ‘तुमच्या खांद्यावर मला जास्त वेळ डोकं नाही ठेवता येत. मला वेळ हवाय.’ मग माता अपार मायेनं त्या मुलीला जवळ घेतात आणि तिच्या दुपट्टय़ाला आपल्या शालीचे टोक बांधून दर्शनाचा लाभ देतात. मुलगी धन्य पावते.

एका कोळ्याच्या घरात जन्माला आलेल्या मुलीला तिच्या घरातूनच अन्यायाला सामोरे जावे लागले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना साक्षात्कार झाला. आणि त्या साऱ्यांची माता म्हणून दर्शन देणे सुरू केले. त्या म्हणतात, आज मातेची माया लोक विसरत चालले आहेत. माता काय करू शकते, तर मुलाला आपल्या कुशीत घेते. तिथेच प्रेमाची निर्मिती. माझ्या आयुष्याचे तेच ध्येय आहे. माता अमृतानंदमयी यांच्या खांद्यावर डोके टेकण्यासाठी ऑक्सफर्डमधील प्राध्यापक येतात. ही उच्चशिक्षितांची यादी मोठी असते.

प्रसंगांतून गुरूंची ओळख करून देण्याची हातोटी लेखिकेला साधली आहे. उदाहरणार्थ जग्गी वासुदेव यांच्यावरील प्रकरणात नववर्षांच्या पूर्वसंध्येला जग्गी यांचे उच्च दर्जाच्या सभागृहात आख्यान सुरू असते. आपल्या धीरगंभीर, पण गोड गळ्यातून प्रार्थना संपवून ते बोलणे सुरू करतात : आज काही तरी नववर्षांसाठी संकल्प केला पाहिजे. का नाही आपण कमी बोलण्याचा संकल्प करू शकत? प्रश्न संपवून ते उदाहरणाला हात घालतात. म्हणतात, एक म्हातारी असते. गरीब. म्हणजे फारच गरीब. ती देवाची रोज प्रार्थना करीत असते. पण एक दिवस म्हणते- देवा, तुझी मी रोज प्रार्थना करते, पण अजूनही गरीबच आहे, काय करू? देव म्हणतो, तू खूप बडबड करते बाई, ती आधी थांबव. याचा अर्थ तुम्ही जर देवाशी बोलत असाल तर ती प्रार्थना असेल, पण जर का देव तुमच्याशी बोलत असेल तर मात्र वेडे आहात, असा निष्कर्ष काढायला हरकत नाही..

जग्गी वासुदेव यांची दीड-दोन तास उभे राहून बोलण्याची ताकद अनेकांना थक्क करणारी. तसा त्यांच्या जीवनातील बहुतांश भाग हा थक्क करणारा आहे. १९५७ मध्ये वासुदेव यांचा जन्म झाला, पण ते स्वत: म्हणतात, की ते दोनदा जन्माला आले. वर्गमित्राचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना हे जग निर्हेतुक भासू लागले. म्हणून त्यांनी गार्डिनल सोडियमच्या मूठभर गोळ्या प्राशन केल्या. तो त्यांचा आत्महत्या करण्याचा एक अपयशी प्रयत्न होता.

नेत्रतज्ज्ञांच्या कुटुंबात जन्माला आलेल्या वासुदेव यांनी व्यावहारिक शिक्षणाचा नाद सोडून आयुष्यात तर्कापल्याड जगण्याचा ध्यास घेतला आणि आपल्या प्रवचनांतून बुद्धिप्रामाण्यवादी भूमिका मांडली. इशा फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी स्वत:ला शाश्वत करणारी सामाजिक चळवळ सुरू केली. ‘आज आता तुम्ही एक स्वप्न पाहिले तर ते तुमचे पहिले पाऊल ठरेल. त्यासाठी तुमच्या आयुष्यात ते पूर्ण करू शकाल; परंतु अखिल मानवजातीच्या कल्याणासाठीचे स्वप्न उराशी बाळगत असाल तर ते तुमचे एक पाऊल ठरेल आणि पुढची पिढी ते पूर्ण करण्यासाठी एक पाऊल टाकेल’ असे भाषणांतून सांगणाऱ्या जग्गींचा समावेश हल्ली ‘लिटररी फेस्टिवल’मध्ये असू लागला आहे.

भय्यू महाराजांची राजकीय गुरू म्हणून ओळख गुजरातमधून सुरू होते. गुजरातचे सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी शपथ घेणार होते. शपथ सोहळ्याला हजर असलेल्या देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींमध्ये भय्यू महाराजांचा समावेश होता. भय्यू महाराज यांची शिकवण मातीशी नाळ जोडणारी आहे, म्हणजे ते समर्थन करताना म्हणतात, शिस्त आणि जर्मन यांना कोणी अलग करू शकत नाही. जसे वेळेचे व्यवस्थापन आणि जपानी नागरिकांना अलग करता येत नाही, तसंच भारतीयांपासून शेती आणि धर्म तुम्ही वेगळा करू शकणार नाही. भय्यू महाराज भारतीयांचे हे वैशिष्टय़  अगदी ठामपणे विशद करतात, याचे लेखिकेला अप्रूप आहे. भारतीयांकडे असलेली धर्मश्रद्धा ही त्यांची एकाच वेळी सर्वात मोठी ताकद आणि कमकुवतपणासुद्धा आहे. समाजसेवा म्हणजे पुरस्कार मिळवणे आणि निधी मिळवणे. धर्म म्हणजे सत्ता आणि पैसा मिळविण्याचे सर्वात प्रभावी साधन. बाबा, महाराजांना लाखो रुपयांचे हार घालणारे, सामाजिक कार्यासाठी फुटकी कवडीही देण्यास तयार नसतात.

याशिवाय मोरारी बापू, बाबा रामदेव, श्री श्री रविशंकर आणि  चंद्रास्वामी यांच्याविषयीचा धावता आढावा लेखिकेने घेतला आहे. हे सर्व सांगत असताना बाबा, महाराज आणि गुरू यांच्या ‘अनासक्ती’तूनही दिसून येणारा संपत्तीलोभ लेखिकेच्या पत्रकार नजरेतून सुटलेला नाही. कोणाची संपत्ती कशी गडगंज आहे आणि कोणाचे राजकीय प्रभाव कसकसे दिसलेले आहेत, याचे तपशील जवळपास प्रत्येक प्रकरणात आहेत, ते खुल्या मनाने मुळातूनच वाचणे इष्ट.

या पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे, जी तथ्यपूर्ण माहिती आधीच सार्वजनिक झाली आहे, तिचा आधार घेत आणि अनुभवकथन करीत, पण कोणताही अभिनिवेशन न ठेवता हे पुस्तक लिहिण्यात आले आहे. अर्थात, गुरूंबद्दलचे लेखिकेचे कुतूहल हे अभ्यासूच आहे याची खात्री पुस्तक वाचताना पटते.

  • गुरूज – स्टोरीज ऑफ इंडियाज लीडिंग बाबाज
  • लेखिका : भवदीप कांग
  • प्रकाशक : वेस्टलँड बुक्स
  • पृष्ठे : २३५ (पेपरबॅक), किंमत : २९५ रुपये.

 

– गोविंद डेगवेकर

govind.degvekar@expressindia.com