भारतातील विविधता हा जगभरच्या अभ्यासकांसाठी कुतूहलाचा विषय. हे पुस्तकही त्याच कुतूहलातून संपादित झालेलं. भारतातील बहुविधतेचा वेध घेत हे पुस्तक आजच्या भारताच्या परिस्थितीविषयी भाष्य करतं. त्यामुळेच धर्मनिरपेक्षता, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, संस्कृतीसंघर्ष, सहिष्णु-असहिष्णुता अशा अनेक मुद्दय़ांबरोबच २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयाचा ऊहापोहही यात केला गेला आहे. वैविध्याचा आढावा घेतानाच त्यातून निर्माण झालेले प्रश्न व या प्रश्नांना भिडताना होणारी दमछाकही हे पुस्तक दाखवून देतं, हेच या पुस्तकाचं वैशिष्टय़ आहे..

ज्या विविध ताण्याबाण्यांनी ‘भारत’ ही ‘घटना’ घडत आलेली आहे, ते ताणेबाणे अभ्यासणे ही एक विलक्षण व दमवणारी गोष्ट आहे. भारताच्या इतिहासाबाबतच काय, पण वर्तमानाबाबतही काही निश्चितपणे बोलणे अवघड आहे. कारण भारतीय समाज एकाच वेळी विविध कालखंडात वावरत असतो. भारतीय समाज समाज ज्या विविध राजकीय आणि सामाजिक वळणांच्या प्रवाहातून वाहत गेलेला आहे, त्यांची गती आणि दिशा समजून घेणे सोपे नाही. कारण या प्रवाहांचे वाहणे जसे स्वतंत्र आहे, तसेच ते एकमेकांत गुंतलेलेही आहे. आचार-विचार, श्रद्धा-समजुती, रूढी-परंपरा यांचे कमालीचे वैविध्य, त्यांच्यातील झगडा आणि या वैविध्याला कवेत घेऊन कधी अतीव कष्टाने तर कधी क्लांत समाधानाने उभे असलेले ‘भारतीयत्व’ ही जगभरातल्या समाजशास्त्रज्ञांसाठी कुतूहलाची गोष्ट ठरत आली आहे, यात नवल नाही.

भारतीयत्वाच्या बहुविधतेचा हा धागा पकडून आजच्या भारतातील परिस्थतीविषयीची निरीक्षणे मांडणारे ‘इंडिया डायव्हर्सिटी’ हे पुस्तक म्हणजे इथल्या विविधतेची आणि खरे म्हणजे विविध प्रश्नांची एक छोटी सफर आहे. पुस्तकात एकूण १८ लेख आणि काही कविता आहेत. बरेचसे लेख विविध इंग्रजी नियतकालिकांतून, रीसर्च जर्नल्समधून आधी प्रकाशित झालेले आहेत. पुस्तकाचे संपादन हिल्डा डेव्हिड आणि फ्रान्सिस जार्मन यांचे आहे. हिल्डा डेव्हिड पुण्यातील सिम्बॉयसिस महाविद्यालयात प्राध्यापक आहेत्ी, तर फ्रान्सिस जार्मन जर्मनीतील हिल्डशाईम विद्यापीठातील इंग्रजी, सांस्कृतिक अभ्यास आणि आंतरसांस्कृतिक संवादाचे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. त्यांनी इजिप्त, थायलंड, जपान व युरोपातील विविध विद्यापीठांमधूनही अध्यापन केले आहे. पुस्तकाची सुरुवात त्यांच्याच लेखाने होते. लेखात त्यांनी ‘वैविध्य’ आणि ‘भिन्नत्व’ या संकल्पनांची चर्चा केलेली आहे. माणसाला विशिष्ट माणूस ‘आपला’ वाटतो आणि विशिष्ट माणूस ‘वेगळा’ वाटतो, हे का होते? आज ज्ञान-तंत्रज्ञान युगातही माणसातल्या आदिम आणि संपादित प्रेरणा माणसाला माणसापासून दूर किंवा जवळ करतात, हे आपण अनुभवतो. यात भाषा, वर्ण, धर्म, जात हे मुद्दे तर आहेतच, पण स्त्री आणि पुरुष हे भिन्नत्वदेखील स्त्रीला पुरुष व पुरुषाला स्त्री समजण्याच्या आड येते. जार्मन यांनी इथे ‘जेंडर कल्चर’ ही संज्ञा वापरली आहे. आणि याचाच पुढचा भाग म्हणजे- लैंगिक प्रवृत्तीमुळे (सेक्शुअल ओरिएंटेशन) आलेली भिन्नत्वाची भावना. अर्थात, या विविध मुद्दय़ांच्या ‘वैज्ञानिक खोला’त न जाता त्यांनी लेखाचा रोख भारताच्या सामाजिक-राजकीय घडणीवर ठेवला आहे.

२००२च्या गुजरात दंगलीवर ‘फायनल सोल्यूशन’ हा माहितीपट तयार करणारे राकेश शर्मा यांची मुलाखत भाजपच्या २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या विजयाचा ऊहापोह करणारी आहे. विविध राज्यांत भाजपने वापरलेली रणनीती, नरेंद्र मोदी-अमित शहा यांचे संघटन कौशल्य व इतर आनुषंगिक बाबींवर ते बोलले आहेत. ही मुलाखत सप्टेंबर २०१४ मधील आहे. मुलाखतीच्या अखेरीस त्यांनी भाजपच्या पुढील वाटचालीबाबत उत्सुकता दर्शवली आहे. संघाच्या कडव्या िहदुत्वाचाच आधार घेत भाजप पुढे जाणार की राष्ट्रीय ओळख आणि राष्ट्रीय प्रभाव निर्माण करण्यासाठी ‘सेंटर-राईट’ पक्ष म्हणून आपली प्रतिमा निर्माण करणार? २०१९ मध्ये जे नवीन मतदार असतील (अंदाजे ३५ कोटी) त्यांच्यापुढे भाजप कुठला चेहरा घेऊन जाईल? या प्रश्नांची उत्तरे ‘डायव्हर्स’ आहेत आणि वादाला आमंत्रण देणारी आहेत, हे वेगळं सांगायला नको.

लेखिका गीता हरिहरन यांचा लेख दिल्लीतील निर्भया बलात्कार घटनेच्या पाश्र्वभूमीवर दिल्ली शहर आणि लगतच्या हरियाणाचे भीषण वास्तव समोर ठेवतो. तर या लेखानंतरचे आम्रेन मोदी यांचे अनुभवकथन आहे. त्यात बचतगटांच्या मदतीने खेडय़ांतील स्त्रियांच्या जगण्यात घडणाऱ्या ‘सायलेंट रिव्होल्यूशन’चे चित्रण आले आहे. कवी-नाटककार आणि समिलगी व्यक्तींच्या हक्कांसाठी लढणारे आर. राज राव यांचा लेख कलम ३७७, भारतीय कायदा आणि समिलगी संबंधांबाबतची सामाजिक मानसिकता यावर विस्तृत भाष्य करणारा आहे. समलैंगिकतेचा धावता ऐतिहासिक आढावाही त्यांनी घेतला आहे. दुसऱ्या महायुद्धात नाझी पक्षाने जर्मनीतील समिलगी व्यक्तींना जी क्रूर वागणूक दिली तो अध्यायही या लेखात आला आहे. आदिवासी व वन्य जमातींचा समावेश असणाऱ्या डीनोटीफाइड ट्राइब्जपकी (डीएनटी) बऱ्याच जमातींना चुकीने ‘गुन्हेगार जमाती’ ठरवले गेले आहे. या प्रश्नाचा मागोवा घेणारा मंजू रामानन यांचा लेख पुस्तकात आहे. ईशान्येकडील राज्यांमधील सांस्कृतिक भिन्नता, तिथले स्थलांतरितांचे प्रश्न, फुटीर संघटनांच्या हालचाली, धर्माचे राजकारण याची चिकित्सा दिब्यज्योती सरमा यांनी केली आहे. वाल्मीकी रामायणातील मानव, वानर व राक्षस हे तीन मुख्य समूह व त्यांच्या समूहांतर्गत असणाऱ्या भिन्न चालीरीती (विशेषत: स्त्री-पुरुष संबंध, विवाहसंस्था) आणि त्यांच्या संघर्षांतून निर्माण झालेले प्रश्न, याचा रोचक वेध अर्शिया सत्तार यांनी घेतला आहे. शूर्पणखेला रामायणातील संघर्षांचा आरंभबिंदू म्हणता येईल. राक्षसी म्हणून शूर्पणखेला तिला आवडणाऱ्या पुरुषांना मिळवण्याचा ‘राक्षस धर्मदत्त’ अधिकारच आहे. याचा सामना जेव्हा राम-लक्ष्मणाच्या ‘अयोध्या धर्मा’शी होतो तेव्हा संघर्ष सुरू होतो. मानव, वानर व राक्षस स्त्रियांचे व त्यांच्या सामाजिक अधिकारांचे वाल्मीकी रामायणातील चित्रण पुष्कळच बोलके आहे.

भारतात धार्मिक संघर्षांच्या त्रिकोणाचे तीन कोन म्हणजे िहदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन. एम. एच. जफर आणि जोएल टिमोथी यांनी अनुक्रमे इस्लामच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता आणि भारतातील ख्रिस्ती धर्माचे, विशेषत: चर्चचे स्थान यांवर विवेचन केले आहे. जफर यांचा लेख त्रोटक आहे. इस्लामच्या काही माहीत नसलेल्या बाजूंविषयी ते बोलले आहेत, परंतु इस्लामचे आजचे सर्वसाधारण स्वरूप दहशतवादाशी जोडले गेलेले असल्याने कुराणचे आकलन, इस्लामचा गाभा आणि त्यातील गुंतागुंत अधिक स्पष्टपणे समोर यायला हवी होती, असे वाटते. भारतातील चर्चचे इतिहास-वर्तमान मांडताना चर्चमध्ये जातीव्यवस्था आपली भूमिका बजावते, हे जोएल टिमोथी यांचे निरीक्षण महत्त्वाचे आहे. चर्चसंबंधी त्यांनी एकूणातच परखडपणे आपली भूमिका मांडली आहे.

नाटककार रामू रामनाथन यांचा ललित व माहितीपर अशा दोन अंगांनी लिहिलेला लेख महाराष्ट्रातील विद्रोही चळवळीतील कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा विस्तृत आलेख मांडतो. कबीर कला मंच, नागपूरचा देशभक्ती युवा मंच आणि यातील कलाकारांना झालेली अटक, मुंबईत शिवाजी पार्कवर झालेले साहित्य संमेलन आणि धारावीत आयोजित केले गेलेले विद्रोही साहित्य संमेलन, ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाला झालेला विरोध, ‘विद्रोही’ मासिकाचे संपादक सुधीर ढवळे यांच्या अटकेचा तपशील (यात त्यांच्यावरील आरोपपत्रातील काही भागही दिला आहे) हे सर्व मांडत त्यांनी शासनाच्या भूमिकेवर प्रश्न उभे केले आहेत. कबीर कला मंचाच्या दोन केसेसबाबत (पहिली ज्योती चोरगे व सुषमा रामटेके आणि दुसरी दीपक डेंगळे व इतर) न्यायाधीश अभय ठिपसे यांनी जो निकाल दिला त्यातील पहिल्या केसच्या २६ पानी निकालपत्रातील काही महत्त्वाचे मुद्दे लेखात जसेच्या तसे उद्धृत केले आहेत. माओवादी चळवळीचा विचार करताना सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक भेदभावामुळे वंचित समूहातील अनेक लोक माओवादाकडे आकर्षित होतात आणि त्यामुळे त्या सर्वाना दहशतवादी संघटनेचे सभासद समजणे चुकीचे आहे, असे निकालपत्रात म्हटले आहे. विद्रोही कलावंतांबाबत शासनाच्या नकारात्मक भूमिकेच्या पाश्र्वभूमीवर हा मुद्दा उठून दिसतो. मराठी वाचकांना महाराष्ट्रातील विद्रोही चळवळीतील घडामोडींची ओळख करून घ्यायच्या दृष्टीने हा लेख उपयुक्त ठरेल.

प्रमिला पॉल यांचा लेख भारताच्या सहिष्णु-असहिष्णु अशा संमिश्र रूपाकडे लक्ष वेधतो. टी. डब्ल्यू. गेराघटी या आयरिश लेखकाचा एका परदेशी माणसाच्या नजरेतून दिसणाऱ्या भारताविषयीचा लेखही अशाच स्वरूपाचा आहे. पुस्तकात याखेरीज जेरी िपटो, संयुक्ता दासगुप्ता, गायत्री पगडी यांचे ललित स्वरूपाचे लेख आहेत. लॅिमग्टन रोडला केंद्रस्थानी ठेवून मुंबई महानगरातील घरांचे प्रकार, घराभोवतीचे पर्यावरण आणि इथल्या ‘प्रॉपर्टी मार्केट’मध्ये होणारे बदल टिपणारा प्रसाद शेट्टी व रुपाली गुप्ते यांचा लेख आहे. मीना कंडासामी, पीर खान व अरुंधती सुब्रमणियम यांच्या कविता आहेत.

या देशातील विविधता, त्या पाश्र्वभूमीवर ठळक होणारा लेखकाचा आस्थाविषय आणि त्याचे लेखकाला जाणवलेले पलू, परिघावरील/उपेक्षित लोकांच्या जगण्याचे प्रश्न, त्यांच्या सामाजिक अस्तित्वाशी जोडलेले न्यायाचे प्रश्न आणि यातून लेखकाच्या मनात उमटलेली प्रतिक्रिया हा संपूर्ण पुस्तकाचा अंत:स्वर आहे. यात प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न फारसा नाही, तर प्रश्नांची व्याप्ती वाचकांना जाणवून द्यायचा प्रयत्न आहे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक म्हणजे भारतातल्या काही ठिकाणांची धावती सफर आहे. पुस्तकाचे शीर्षक ‘इंडिया डायव्हर्सिटी’ असे असले तरी पुस्तकाचे स्वरूप या ‘डायव्हर्सिटी’मुळे निर्माण होणारे प्रश्न आणि त्यांचा सामना करताना होणारी दमछाक प्रामुख्याने दाखवते. आणि ते योग्यही आहे. कारण ‘वैविध्य असूनही भारतातील लोक गुण्यागोिवदाने राहतात’ या विधानाबरोबरच ‘ते गुण्यागोिवदाने राहात नाहीत’ हेही सांगणे आवश्यक आहे. दोन्ही विधानांमध्ये सत्यांश आहेच, पण अप्रिय सत्यांश न सांगण्याकडे सहसा आपला कल असतो. तो इथे टाळला गेला आहे. मात्र पुस्तकाच्या शीर्षकावरून कदाचित काही वाचकांची दिशाभूल व्हायची शक्यता नाकारता येत नाही.

पुस्तकातील लेख धावता आढावा घेणारे असले तरी लेखातील मांडणीविषयी त्या त्या क्षेत्रांतील तज्ज्ञ मंडळी त्यांचे मत नोंदवू शकतील. पुस्तकात ज्या विषयांना स्पर्श केला गेला आहे, त्यातील प्रत्येक विषय अर्थातच स्वतंत्रपणे अभ्यासावा असा आहे. आणि तसे केले तरच त्या विषयाचे योग्य आकलन होऊ शकेल. त्यामुळे भारतातील वैविध्य व त्यातील अडचणी यांचे ‘ट्रेलर’ म्हणून या पुस्तकाकडे पाहता येईल. शक्य तितक्या वैविध्यपूर्ण विषयांना हात घालणारे लेख संकलित करून छोटेखानी पुस्तकाच्या माध्यमातून या विषयांची तोंडओळख वाचकांना करून द्यायच्या दृष्टीने पुस्तक नक्कीच उपयुक्त आहे.

  • ‘इंडिया डायव्हर्सिटी’
  • संपादक : हिल्डा डेव्हिड, फ्रान्सिस जार्मन
  • प्रकाशक : ओम बुक्स इंटरनॅशनल
  • पृष्ठे : २१५, किंमत : ३५० रुपये

 

– उत्पल व. बा.

utpalvb@gmail.com