जयपूरच्या ‘डिग्गी पॅलेस हॉटेल’मध्ये २००६ ‘जयपूर लिटररी फेस्टिव्हल’ भरू लागला आणि साधारण २००८ पासून तो फारच ग्लॅमरबिमर मिळवू लागल्यानंतर ‘लिटफेस्ट’ हे त्याचं लघुरूप सर्वामुखी झालं. लिटफेस्ट म्हणजे तीन चार दिवस नवनव्या पुस्तकांच्या / किंवा जुन्या व प्रसिद्ध लेखकांशी गप्पांची रेलचेल, वैचारिक लिखाण करणाऱ्यांचे परिसंवाद, अगदी गुलजमरसारखे कवी.. असं छान समीकरण जुळून आलं आणि ‘लिटफेस्ट’ हे आजच्या इंग्रजी वाचकांच्या जीवनशैलीचं अंग बनलं- फक्त जयपूरच नाही, एव्हाना मुंबईलाही ‘टाटा लिटफेस्ट’ सुरू झाला होता आणि यंदापासून ‘पुणे लिटफेस्ट’ देखील सुरू झाला आहे. पण अनेक वाचक ‘रजा मिळत नाही’ म्हणून जयपूरला जात नाहीत, मुंबईकर वाचकसुद्धा ‘टाटा थिएटर फार एका बाजूला पडतं’ म्हणत लिटफेस्टला मुकतात.. अर्थात कामधंदे बाजूला ठेवून जिवाचं लिटफेस्ट करणं परवडणारे वाचकही असतातच, ते अगदी कुमाऊंच्या जंगलातसुद्धा जातात लिटफेस्टला! खोटं नाही.. ‘कुमाऊं लिटररी फेस्टिव्हल’ २३ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे आणि तो २९ तारखेपर्यंत चालणार आहे. पण बातमी ही नव्हेच.. ती अशी की, आजवरच्या- ‘तिथे जाऊन’ अनुभवण्याच्या लिटफेस्टच्या ऐवजी एक ‘व्हच्र्युअल’- म्हणजे वास्तवाभासी लिटफेस्टसुद्धा २३ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. थेट तुमच्या मोबाइलवर हा लिटफेस्ट एक नोव्हेंबपर्यंत सुरूच राहणार आहे.. अर्थात, तुम्ही फक्त त्यांच्या संकेतस्थळावर जाऊन ‘लाइव्ह स्ट्रीमिंग’ सुरू करायचं!
‘लिटफेस्टएक्स’ या नावाचा हा लिटफेस्ट, लेखकांना त्यांच्या ठिकाणीच बसून वाचकांशी संवादाची संधी देणारा असल्यामुळे अनुभा भोंसले (अमेरिकेतून), सुधांशू पळसुले (ब्रिटनमधून) अशा ज्या नव्या-उभरत्या लेखकांना आपण कधी ऐकू शकलो नसतो, त्यांना ऐकण्याची संधी (अनुक्रमे २४ आणि २६ रोजी) मिळणार आहे. ब्रिटनमधल्या भारतीय लेखकांची संख्या ‘लिटफेस्टएक्स’ मध्ये अधिक आहे. लॉर्ड मेघनाद साहा, भन्नाट नर्मविनोदी शैलीत टोप्या उडवणारा सिडिन वडुकुट हे तिघेही ब्रिटनहून २४ ते २६ ऑक्टोबपर्यंत तुमच्या मोबाइलवर येऊ शकतील. त्यानंतरच्या दिवसांमध्ये रघुनाथ माशेलकर, चेतन भगत, शशी थरूर अशी मंडळी आहेत. राजदीप सरदेसाई, नरेश फर्नाडिस, तवलीन सिंग अशा पत्रकार-लेखकांशी आणि नंदिता हक्सर, मरकडेय काटजू यांसारख्या अतिन्यायाग्रहींशी संवाद २३ रोजी (शुक्रवारी) पार पडला.
हातातल्या अंकीय- डिजिटल पडद्यावर पुस्तकं वाचण्याची सवय सर्वाना लावू पाहणाऱ्या ‘किंडल’नं – म्हणजेच पर्यायाने ‘अमेझॉन’नं लिटफेस्टएक्सचं आयोजन केलं आहे (बाकी प्रायोजकांची मोठमोठी नावं त्यांच्या संकेतस्थळावर यावर्षी तरी दिसत नाहीत, हा आणखी सुखावणरा भाग!) . कुतूहल म्हणून या लिटफेस्टच्या ‘ ’litfestx.in ’ या संकेतस्थळावर शनिवार वा रविवारी सहज डोकवायला हरकत नाही. साहित्यमहोत्सवापेक्षा ‘लिटफेस्ट’ किती वेगळा आणि किती बाजारकेंद्री असतो, ते इथेही कळेलच!