शांता गोखले यांच्या संपादनातून सिद्ध झालेले हे पुस्तक मुंबईतील प्रायोगिक नाटय़चळवळीचा इतिहास मांडताना ‘छबिलदास’ सह तीन ठिकाणांवर भर देते; इब्राहिम अल्काझी, सत्यदेव दुबे, अरविंद देशपांडे यांच्या काळाचा पट उलगडते. गो. पु. देशपांडे, पुष्पा भावे, गिरीश कर्नाड, राजीव नाईक यांच्या मुलाखतींतून परखड आत्मपरीक्षणही करते.. मात्र अनेक मुलाखती स्मरणरंजनात रमतात; त्या कशामुळे?
भारत या देशातील सभ्यतेला वा संस्कृतीला, युरोपीय समाजाप्रमाणे इतिहासाचे भान नाही असे काही पंडित मानतात. याउलट, असे भान अगदीच नाही असे नव्हे, त्याची मांडणी वेगळी आहे असाही दावा काही जण करतात. या दोन्ही विधानांत काही तथ्य आहे, पण युरोपीय पद्धतीच्या, म्हणजे हेगेलियन मांडणीला अनुसरून असलेल्या ‘एकात्म’, विश्लेषक इतिहासाचे या संस्कृतीला वावडे होते व आधुनिक काळातही ते आहे, असे म्हणता येईल. चिकित्सक, विश्लेषक इतिहास जाऊच द्या, साधे बेसिक म्हणावे असे डॉक्युमेंटेशनही आपल्याकडे केले जात नाही, असा अनुभव बहुतेक अभ्यासकांचा आहे. कलांचा इतिहास केवळ सांस्कृतिक अंगानेच नव्हे तर, सामाजिक, राजकीय अंगानेही किती महत्त्वाचा आहे हे सांगण्याचीही आवश्यकता नाही. प्रायोगिक रंगभूमीच्या साधारणत: तीन दशकांचा, असा आठवणींच्या स्वरूपातला मौखिक इतिहास, निदान मुंबई शहरापुरता का होईना, पण कसोशीने आणि आत्मीयतेने संपादित करून, इंग्रजीतून आपल्याला उपलब्ध करून दिल्याबद्दल, संपादिका शांता गोखले, प्रकाशक स्पीकिंग टायगर आणि त्याला अर्थसाहाय्य करणाऱ्या साहित्य रंगभूमी प्रतिष्ठान यांचे अभिनंदन करायला हवे.
या पुस्तकाचे स्वरूप अनेकांच्या मुलाखती असे असणार हे उघड आहे. पण या मुख्य मजकुराआधी तीन लेख आहेत आणि ते माझ्या मते अत्यंत महत्त्वाचे आहेत. अगदी सुरुवातीस, त्या काळातील एक महत्त्वाचे नाटककार गिरीश कर्नाड यांची प्रस्तावना आहे. त्यानंतर, तितकेच महत्त्वाचे नाटककार आणि विचारवंत प्रा. गो. पु. देशपांडे यांचा मुंबईतल्या मराठी प्रायोगिक रंगभूमी संदर्भातील लेख आहे आणि नंतर शांता गोखले यांची प्रस्तावना आहे. या छोटय़ा परीक्षणात मुख्य मजकुरातील सर्व मुलाखतींचा तपशील देणे शक्य नाही. तेव्हा या पुस्तकाचे एकंदरीने महत्त्व, त्याच्या मर्यादा, त्याचे एकंदरीने स्वरूप आणि या विषयाचे तात्त्विक स्वरूप स्पष्ट करणारे हे तीन लेख/प्रस्तावना यावरच भर दिल्यास वाचकांस त्याचा काही उपयोग होईल असे वाटते.
या पुस्तकाच्या प्रोसेसविषयी सुस्पष्ट प्रस्तावना शांता गोखले यांनी पुस्तकाच्या सुरुवातीला केली आहे. माझ्या मते अशा पुस्तकाची मांडणी करण्यात दोन आव्हाने विशेषकरून असतात. असा इतिहास ग्रथित करायचा तर तो कोणत्या अंगाने, लेखकांच्या, दिग्दर्शकांच्या का नाटकांच्या, हे पहिले आव्हान. यावर संपादिकेने जाणीवपूर्वक एक वेगळी संकल्पना राबवली आहे. त्या काळच्या मुंबईतली, रंगभूमीसाठी महत्त्वाच्या असलेल्या तीन महत्त्वाच्या ‘जागा/स्थळे’ त्यांनी निवडली आहेत आणि त्या अनुषंगाने या इतिहासची संरचना केली आहे. माझ्या मते ही मांडणी या पुस्तकाचे सर्वात मोठे बलस्थान आहे.
अशा, म्हणजे मौखिक इतिहासासमोर दुसरे आव्हान असे असते की तो निव्वळ गोष्टीवेल्हाळतेच्या अंगाने जाणारा, किस्सेवजा -अ‍ॅनेक्डोटल- होण्याची भीती असते याची संपादिकेला जाणीव आहे. हा इतिहास तसा होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली याची माहितीही शांता गोखले यांनी स्पष्टपणे नोंदवली आहे. त्या स्वत: संपादकीयातच ही मर्यादा निश्चितपणे ओलांडून जात काही महत्त्वाचे मुद्दे मांडतात. उदा. केवळ नवेपणा/वेगळेपणा आणि खरोखरची प्रायोगिकता यात मोठेच अंतर असते असे त्या लिहितात. तशी धारणा, ज्याचा इतिहास इथे ग्रथित केला गेला आहे, त्या रंगभूमीला नव्हती असे त्या स्पष्टपणे नोंदवतात. स्वाभाविकच या पुस्तकात त्या काळातले रंगकर्मी जे बोलतात त्यातले जवळजवळ कोणीच या रंगभूमीच्या स्वरूपाबाबतच्या तत्त्वचिंतनात जात नाहीत आणि त्यामागचे कारण शांताबाईंच्या या नोंदीतच आढळते!
या काळाचे अजून एक महत्त्व म्हणजे हा काळ निव्वळ महाराष्ट्रात नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरही महत्त्वाचा होता, अनेक प्रांतातल्या रंगभूमीवरील विचारांचे आणि आचारांचे क्रॉसपॉलिनेशन -परागधान- होत होते याचीही नोंद त्या करतात. ही बाब पुस्तकातील मुलाखतीत आणि गिरीश कर्नाड यांच्या प्रस्तावनेतही अधोरेखित होते. आपण एकदा वालचंद टेरेसवर एका रात्री, तेंडुलकरांशी तीव्रतेने वाद करत झोपलो आणि उठलो तेव्हा तेंडुलकर तर गायब होते पण आपल्या दुसऱ्या बाजूला बादल सरकार, आधी न कळवता रात्री कधी तरी येऊन आरामात झोपलेले आपल्याला आढळले असे ते लिहितात. गिरीश कर्नाड यांच्या प्रस्तावनेतील बराच भाग स्वत:चे त्या काळचे अनुभव, अ‍ॅनेक्डोट्स यांनी व्यापलेला असला तरी त्यातून त्या काळच्या वातावरणाची, त्याच्या राष्ट्रीय परिमाणाची कल्पना आपल्याला येते. शिवाय त्यांनी काही प्रमाणात त्या काळची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामाजिक-राजकीय पाश्र्वभूमी थोडक्यात चांगल्या प्रकारे मांडली आहे. त्यामुळे या नाटकाच्या इतिहासाची व्यापक पाश्र्वभूमी काहीशी स्पष्ट होते.
शेवटी ते लिहितात की, १९८२च्या आसपास रंगीत दूरचित्रवाणी चालू झाल्यामुळे मुंबईच्या प्रायोगिक रंगभूमीच्या सुवर्णकाळाचा अस्त झाला. या विधानात काही प्रमाणात तथ्य असले तरी ते संपूर्णपणे पटणारे नाही. माझ्या मते, अधिक महत्त्वाचे कारण असे आहे की, या सुमारास सामाजिक/ राजकीय वास्तवात फार मूलभूत आणि तीव्र फरक झाले आणि त्याचा अन्वयार्थ या रंगकर्मीना लावता आला नाही. १९८५ नंतर लिहित्या झालेल्या पिढीने, या प्रचंड वेगात बदलणाऱ्या वास्तवाचे अर्थ लावण्याचा प्रयत्न जरूर केला. ते अर्थ किती योग्य वा किती खोलातले याचा निर्णय काळ करलेच. परंतु ज्या पिढीबद्दल हे पुस्तक आहे त्या पिढीने, या नव्या प्रयोगांवर प्रतिकूल भूमिकाच नोंदविली आणि ज्या उच्च मध्यमवर्गात त्यांना ‘आयकॉनिक’ स्थान होते, ज्यांच्यावर त्यांचे प्रभुत्व होते आणि ज्या अल्पसंख्य वर्गाची सांस्कृतिक मक्तेदारी होती, त्यांना या आधीच्या कालखंडाबद्दलच्या स्मरणरंजनात गुंतवून ठेवले आणि मग या वर्गानीही या नव्या प्रयत्नांकडे तुच्छतेने तरी पाहिले वा तिला अनुल्लेखाने मारले. पण ते असो! या मुद्दय़ाला ओझरता का होईना पण स्पर्श, याच पुस्तकातील एका मुलाखतीत डॉ. राजीव नाईक यांनी केला आहे.
प्रा. गो. पु. देशपांडे यांचे, ‘एक्स्पेरिमेंटल थिएटर : व्हॉट वॉज दॅट’ या शीर्षकाखाली लिहिलेले लेखवजा प्रास्ताविक मात्र अशी कुठलीही डोळेझाक न करता, या संपूर्ण कालखंडाचा एक उत्तम चिकित्सक आढावा घेते. या लेखाची सुरुवातच गो.पुं.नी त्या काळातल्या प्रायोगिकतेमागे सामाजिक-राजकीय प्रेरणा होत्या किंवा कसे याबाबत शंका घेऊन केली आहे. त्याचप्रमाणे छबिलदास वा इतरही दोन स्थळे, या चळवळीच्या केंद्रस्थानी होती काय -कारण ‘घाशीराम कोतवाल’सारखी महत्त्वाची प्रायोगिक नाटके तिथे झालेली नाहीत- हे ही ते नोंदवितात. त्या काळाची इतिश्री का झाली असावी याबद्दलचे त्यांचे विवेचनही सामाजिक अंगाने थोडक्यात असले तरी खूपच अधिक खोलात जाणारे आहे. एकच बाब सांगायची झाली, तर ही प्रायोगिक रंगभूमी, मुख्य धारेतल्या रंगभूमीहून वाटते तेवढी वेगळी कशी मुळातच नव्हती, त्याचमुळे प्रायोगिक रंगभूमीवर काम करणारी मंडळी कशी सहज ‘घसरून जात’ मध्यधारेतही सामावून जाऊ शकत, असे ते लिहितात. त्या काळातल्या समीक्षेच्या मर्यादाही ते नोंदवतात. गो.पुं.ची मांडणी अर्थातच त्यांच्या राजकीय भूमिकेशी सुसंगत आहे आणि ती काहींना पूर्णपणे पटणार नाही हेही शक्य आहे. पण काही कळीचे प्रश्न ते मांडतात हे महत्त्वाचे!

मौखिक इतिहासाचा पहिला टप्पा येतो तो भुलाभाई देसाई मेमोरियल इन्स्टिटय़ूटच्या अवकाशाबाबत. या प्रकरणात गार्सन डा कुन्हा, प्रफुल्ल डहाणूकर, अकबर पदमसी, अलेक पदमसी, गिरीश कर्नाड, श्याम बेनेगल, कुसुम हैदर, सत्यदेव दुबे आणि पुह सयानी यांच्या मुलाखती आहेत. या जागेबद्दल सर्वाच्याच मांडणीतून सर्वात महत्त्वाचे काय जाणवत असेल तर त्या ठिकाणी अनेक कलांचे आणि त्यातील कलाकारांचे एकत्र येणे! ही बाब दुर्दैवाने आता कुठेही होताना दिसत नाही. ‘आषाढ का एक दिन’, ‘तुघलक’ ते ‘मिस ज्यूली’, ‘अ‍ॅण्टिगनी’, ‘एऱ्युडाइस’ अशा नाटकांच्या आठवणी या प्रकरणात आहेत. एखादे अवकाश वा वास्तू, त्यात वावरणाऱ्या माणसांना कशी घडवते त्याचे दर्शन आपल्याला या पुस्तकातून घडते; त्याची पहिली चुणूक येथे मिळते.
दुसरे प्रकरण वालचंद टेरेस या वास्तूभोवती गुंफलेले आहे. या जागेतली रंगभूमी विशेषत: सत्यदेव दुबे आणि अरिवद देशपांडे या दोन रंगकर्मीभोवती फिरली. ‘हयवदन’, ‘आधे-अधुरे’, ‘वल्लभपूरची रूपकथा’, ‘ययाती’, ‘अंधारयात्रा’, ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’, ‘अवध्य’ अशा नाटकांच्या जन्मकथा या जागेशी थेट वा आडवळणाने निगडित आहेत. या प्रकरणात अमोल पालेकर, सुनील शानबाग, सरयू दोशी, गार्सन डा कुन्हा, गिरीश कर्नाड, श्रीराम लागू, अलेक पदमसी, श्याम बेनेगल, गो. पु. देशपांडे, दिलीप कोल्हटकर, सुनिला प्रधान, हेमू अधिकारी, दीपा श्रीराम, अच्युत वझे, कमलाकर सारंग, सत्यदेव दुबे, मीना नाईक, रत्ना पाठक शहा इत्यादींच्या मुलाखती आहेत. ही नावे सांगितल्यावर रंगभूमीबाबत थोडाही रस असणाऱ्या कोणासही, या प्रकरणात आठवणींचा केवढा मोठा खजिना असेल ते सांगण्याची जरूर नाही.
यानंतरचे स्थळ आहे छबिलदास शाळा! ते मराठी रंगभूमीप्रेमी मंडळींच्या काहीसे अधिक जवळचे आणि काळातही अधिक जवळचे. माझ्यासारख्या पुढच्या पिढीतील नाटककारांची नाटकेही तेथे झाली. या प्रकरणात खूपच रंगकर्मीच्या मुलाखती आहेत त्यामुळे सर्वाची यादी देत बसत नाही. पण त्यातील पुष्पा भावे आणि राजीव नाईक यांच्या मुलाखतींचा उल्लेख करावयास हवा, कारण त्यांनी या पुस्तकात विरळा आणि अत्यंत महत्त्वाचा असा स्व-चिकित्सेचा सूर लावला आहे. अर्थात ‘समीप रंगमंच’ असण्यासारख्या या स्थळाच्या वैशिष्टय़ांची नोंदही ते करतात. आमची जीवनदृष्टी कशी कमी पडली, जागतिक पातळीवरच्या नव्या दृष्टिकोनातून केलेल्या, मूलभूत, रॅडिकल प्रयोगांशी आमची तुलना कशी आणि का होऊ शकत नाही, याचे विवरण पुष्पाबाईंनी केले आहे.
यानंतरच्या एका छोटेखानी प्रकरणात, १९८५-९० नंतर अशा जागाच मुंबईत कशा कमी झाल्या त्याची नोंद करून या काळातील मुंबईतील अनेक रंगकर्मीची थोडक्यात ओळख शांताबाईंनी करून दिली आहे.
आधी म्हटल्याप्रमाणे, माझ्या मते या पुस्तकाचे एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून महत्त्व निर्वविाद आहे, पण त्याच्या काही मर्यादांचाही उल्लेख केला पाहीजे. त्यात अनेकवार पुनरावृत्ती आहे पण ती कदाचित त्याच्या स्वरूपामुळे अटळ आहे. पुस्तकाची मुख्य मर्यादा ही म्हणता येईल की संपादकाने प्रयत्न करूनही बहुतेक मुलाखती अ‍ॅनेक्डोट्स आणि स्मरणरंजनात कमी-अधिक प्रमाणात प्रमाणात अडकलेल्या आहेत. पुस्तकाच्या ब्लर्बवरच, एका प्रयोगाच्या वेळी नाटकाचा सूत्रधार कसा ‘ब्लँक झाला’ याची, या काळाचे कुठलेही वैशिष्टय़ न सांगणारी, एक अत्यंत सामान्य, सरधोपट अशी -सुनीला प्रधान यांची- आठवण दिलेली आहे. पुस्तकातील अनेक मुलाखती/आठवणी यापलीकडे जाणाऱ्या असल्या तरी त्या चिकित्सक होत नाहीत, या मागे भारतीय मनच, विशेषत: कला/साहित्याशी संबंध असणारे मध्यमवर्गीय मनच, विचारांपेक्षा स्मरणरंजनात रमते हे कारण कदाचित असावे! एका विशिष्ट काळावर पुस्तक काढण्याचा इरादाच हे दर्शवतो की त्या काळाचे म्हणून काही वैशिष्टय़ होते. तसे असले तर त्याची काही सामाजिक, राजकीय, तात्त्विक कारणपरंपरा, तो काळ इतर काळांहून महत्त्वाचा का झाला, मागे वळून पाहता त्याचे मोल आणि मर्यादा काय होत्या याचे काही विवेचन असावयास हवे. ते मात्र या पुस्तकात विरळा आहे. अर्थात या काळचे ‘वातावरण’ आणि मुख्य पात्रे मात्र या मुलाखतींच्या कोलाजमधून अप्रतिमरीत्या उभे राहातात.
काही महत्त्वाच्या रंगकर्मीच्या मुलाखती यात नाहीत -उदा. विजया मेहता- हेही नमूद केले पाहिजे. अर्थात, शांता गोखले यांच्यासारख्या दक्ष संपादकाकडून असे नजरचुकीने झाले असणे शक्य नाही याची मला खात्री आहे. तेव्हा त्यामागे काही कारण असणार हे उघड आहे.
एकंदरीने पहाता, मुंबईच्या संस्कृतीच्या दृष्टीनेच हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. सांस्कृतिक जीवनात रस असणाऱ्या सर्वासाठीच हे पुस्तक संग्रा आहे.

द सीन्स वुइ मेड- अ‍ॅन ओरल हिस्टरी ऑफ एक्स्पेरिमेंटल थिएटर इन मुंबई.
– शांता गोखले
प्रकाशक : स्पीकिंग टायगर
पृष्ठे : २१६, किंमत : ७५० रु.

 

मकरंद साठे
लेखक नाटककार व कादंबरीकार असून अन्य ललितेतर साहित्यासह त्यांचा ‘मराठी रंगभूमीच्या तीस रात्री’ हा संवादरूप ग्रंथ तीन खंडांत प्रकाशित झाला आहे. ईमेल : makarand.sathe@gmail.com