श्रीरंजन आवटे poetshriranjan@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसाहतवादाला केलेला गुणात्मक विरोध, आत्यंतिक उन्मादी राष्ट्रवादातून जन्माला येणाऱ्या फॅसिझमला सुस्पष्ट नकार, जमातवादाला नि:संदिग्ध विरोध, धर्मनिरपेक्षतेचे तत्त्वज्ञान व सर्वसमावेशक वृत्ती यांतून नेहरूंनी भारतीय राष्ट्रवादास आकार दिला..

(१) ‘भारत हे राष्ट्र नाही. भारत ही केवळ एक भौगोलिक अभिव्यक्ती आहे,’ अशा आशयाचे विधान विन्स्टन चर्चिल यांनी केले होते.

(२) ‘द बेस्ट यू कॅन डू अबाउट इंडियन नॅशनॅलिझम इज दॅट यू शुड नॉट डिफाइन इट’ – भारतीय राष्ट्रवादाबाबत सर्वोत्तम गोष्ट काय केली जाऊ शकते? तर त्याची व्याख्या न करणं –  अशा आशयाचे विधान पं. जवाहरलाल नेहरूंनी केल्याचा उल्लेख बेंजामिन झकेरिया यांनी नेहरूंवरील चरित्रात केला आहे.

या दोन्ही विधानांचा नेमका अर्थ काय? विन्स्टन चर्चिल जेव्हा ‘भारत हे राष्ट्र नाही,’ असं म्हणतात तेव्हा ते राष्ट्राची व्याख्या युरोपीय दृष्टिकोनातून करतात. ‘एकच वंश, एकसाची अशी संस्कृती आणि वांशिक वळणाने उभारलेला राष्ट्रवाद’ असे गृहीतक चर्चिल यांच्या विधानामागे आहे.

दुसऱ्या क्रमांकाचे नेहरूंचे विधान नीट लक्षात घ्यायला हवे. भारतीय राष्ट्रवादाची व्याख्याच न करणे ही राष्ट्रवादाबाबतची सर्वोत्तम गोष्ट असे ते म्हणतात, तेव्हा त्यांना भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृतीकडे आणि त्यातील व्यामिश्रतेकडे निर्देश करायचा आहे. अर्थातच विविध संस्कृतींचे सहअस्तित्व हा राष्ट्राच्या निर्मिती प्रक्रियेतला अडथळा आहे, असे नेहरू मानत नाहीत मात्र राष्ट्रवादाची व्याख्या करताच सीमांची आखणी होते आणि त्यातून ‘आपण’ आणि ‘ते’ अशी विभागणी होते. राष्ट्रवादातून अपरिहार्यपणे होणारी ही विभागणी लक्षात घेता त्यातून नेहमीच काही समूह, गट, जाती, जमाती यांना वगळण्याची प्रक्रिया घडू शकते आणि त्यामुळे भारतीय राष्ट्रवादाला काटेकोररीत्या व्याख्यांकित न करणे हा सर्वोत्तम पर्याय ठरतो.

दोन्ही विधानांचे हे संदर्भ असले तरी बहुपेडी भारतीय संस्कृतीचे विशेषत्व त्यातून अधोरेखित होते. नेहरूंच्या राष्ट्रवादविषयक मांडणीला वासाहतिक संदर्भ आहे. भारतातला राष्ट्रवादच मुळी वसाहतवादविरोधी चळवळीतून आकाराला आला आहे. अनेकदा जेव्हा ‘भारताला हजारो वर्षांची परंपरा आहे’ यासारखी विधाने केली जातात तेव्हा भारतात आधुनिक अर्थाने घडलेली राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया हे वासाहतिक अपत्य आहे, ही मूलभूत बाब ध्यानात घेतली जात नाही. त्यातून अनेक संकल्पनात्मक गोंधळ निर्माण होऊन अखेरीस आकलनातील तूट समकाळाच्या अर्थनिर्णयन प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण करते.

साम्राज्यवादाला विरोध हे भारतीय राष्ट्रवादाचे मूळ आहे आणि महत्त्वाचे वैशिष्टय़ही. नेहरूंच्या मते, साम्राज्यवादाला असलेल्या विरोधाचा तार्किक विस्तार म्हणजे फॅसिझम-विरोध. ब्रिटिशप्रणीत साम्राज्यवादाला नि:संदिग्ध विरोध करताना फॅसिझमचा धोका नेहरू जाणून असल्याचे अनेक पुरावे आहेत. आक्रमक आणि उन्मादी राष्ट्रवाद देशाची काय वाताहत करू शकतो, हे त्यांनी सखोल अभ्यासलेले होते. त्यामुळे याविषयी आपल्या सहकाऱ्यांना ते सावध करतात.

एकोणिसाव्या शतकात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात बहुतांश देशांमध्ये वसाहतवादी शक्ती कार्यरत होत्या. त्यातील अनेक ठिकाणी वसाहतवादविरोधी चळवळी सुरू झाल्या; मात्र ब्रिटिशांचा द्वेष हा भारतातील वसाहतवादविरोधी चळवळीचा पाया नव्हता, हे भारतातील वसाहतवादविरोधी चळवळीचे वैशिष्टय़ मानावे लागेल. गांधी आणि नेहरू यांनी स्वातंत्र्य आंदोलनात दिलेल्या योगदानाहूनही ‘नवा भारत घडवण्या’त त्यांचे असणारे योगदान अनन्यसाधारण अशा स्वरूपाचे आहे. गांधींवर १९२२ साली राजद्रोहाचा खटला झाल्यानंतर न्यायालयात गांधींनी केलेल्या विधानातून भारतातील वसाहतवादाच्या विरोधाचे वेगळेपण ध्यानात येते. आपला शत्रू कोण, या प्रश्नावर आधारित भारतीय राष्ट्रवाद आकाराला येता कामा नये, याची पुरेशी दक्षता गांधी-नेहरूंनी घेतली. तेव्हा ब्रिटिश किंवा नंतर पाकिस्तान या शत्रूंनुसार राष्ट्राची स्व-ओळख असता कामा नये, यावर त्यांचा कटाक्ष होता.

वसाहतवादाच्या संदर्भापलीकडे राष्ट्रवादाला व्यापक चष्म्यातून पाहाणाऱ्या मोजक्या काही लोकांमध्ये नेहरूंचा समावेश होतो. नेहरूंव्यतिरिक्त अशी थेट मांडणी करणारे विचारवंत म्हणजे रवींद्रनाथ टागोर. रामचंद्र गुहा यांनी म्हटल्याप्रमाणे गांधी-नेहरूंच्या राष्ट्रवादविषयक मांडणीचा पाया टागोरांनी घातला आहे. गांधी आणि टागोरांचा या संदर्भातला पत्रव्यवहार रोचक आहे. राष्ट्रवादविषयक असणाऱ्या तीन निबंधांमधून टागोरांचे आधुनिकता, पाश्चात्त्य संस्कृती, वसाहतवाद आणि राष्ट्रवाद या संदर्भातील मूलभूत चिंतन समोर येते. ‘‘देशभक्ती हा अंतिम आध्यात्मिक आसरा असू शकत नाही. माझ्यासाठी मानवता हाच अंतिम आसरा आहे. मी हिऱ्याची किंमत देऊन काच विकत घेऊ इच्छित नाही. मी जिवंत असेपर्यंत देशभक्तीला मानवतेचा पराभव  करू देणार नाही.’’

देशाचे राष्ट्रगीत लिहिणारे टागोर गेल्यानंतरही त्यांच्या याच विधानांचा मथितार्थ सांगत नेहरू टागोरांना अभिवादन करत होते.

नेहरूंच्या मते, राजकीय स्वातंत्र्याच्या अभावाला स्वाभाविक प्रतिसाद म्हणून भारतीय राष्ट्रवाद जन्माला आलेला आहे. स्वातंत्र्यानंतर आंतरराष्ट्रीयवादाची वाट चोखाळणेच इष्ट आहे. ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ या १९४६ साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात नेहरूंनी हे नोंदवले आहे. ‘ग्लिम्प्सेस ऑफ वल्र्ड हिस्ट्री’ आणि त्यांचे आत्मचरित्र या दोहोंतूनही नेहरूंची राष्ट्रवादविषयक मते लक्षात येतात. तसेच वसाहतवादविरोधी चळवळ आणि राष्ट्रवादविषयक चष्म्यातून केलेले इतिहासाचे आकलन यांतून नेहरूंची मते तयार झाली, हे दिसून येते. 

राष्ट्रवादाविषयी सुस्पष्ट मांडणी करताना, युरोपमधील फॅसिस्ट प्रवृत्तींमुळे त्या देशांचे झालेले अध:पतन नेहरूंच्या मनाच्या तळाशी आहे. त्यामुळे संकुचित राष्ट्रवाद देशासाठी कसा घातक आहे, हे ते पुन:पुन्हा सांगत राहातात. संकुचित राष्ट्रवाद हा जमातवादाचे वेगळे रूप असते. बहुसंख्याकांचा जमातवाद जहाल राष्ट्रवादाचे स्वरूप धारण करतो आणि म्हणून तो अधिक घातक आहे, असे नेहरूंचे आग्रही प्रतिपादन आहे.

भारतीय स्वातंत्र्यलढय़ाची चळवळ ऐन जोमात असताना जमातवादाची वाढ समांतर पद्धतीने झालेली दिसते. १९१५ नंतर हिंदू-मुस्लीम तणाव वाढत जाऊन दोन्ही धर्मातील जमातवादाने उग्र रूप धारण केले. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा हिंदू, मुस्लीम, शीख या धर्मविषयक, वंशविषयक आणि आक्रमक फॅसिस्ट वृत्तीशी नाते सांगणाऱ्या राष्ट्रवादाच्या विविध आवृत्त्या अस्तित्वात होत्या. हिंदू आणि मुस्लीम जमातवादाचे अंतिम पर्यवसान भारताच्या फाळणीत झाले. पाकिस्तान हे नवे राष्ट्रच मुस्लीम राष्ट्रवादाच्या आधारावर जन्माला आले; तर भारताच्या राष्ट्रपित्याची हत्या हिंदू राष्ट्रवाद्यांच्या प्रतिनिधीने केली. शीख राष्ट्रवादाने माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची हत्या केली, तर राजीव गांधींची हत्या वांशिक राष्ट्रवादाने केली. गौरी लंकेश, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि यांची हत्या फॅसिस्ट प्रवृत्तीशी नाते सांगणाऱ्या राष्ट्रवादी आवृत्तीने केल्याचे उघड होते आहे. या सर्वच िहसक, विखारी राष्ट्रवादाच्या आवृत्त्या २०१४ पूर्वी कधीही मुख्यप्रवाही राजकारणाच्या भाग बनल्या नाहीत. भारतीय राष्ट्रवादाचा मुख्य प्रवाह सर्वसमावेशक, धर्मनिरपेक्ष राखण्यामध्ये काँग्रेसचा आणि त्यातही प्रामुख्याने नेहरूंचा सिंहाचा वाटा आहे. नंतर या मुख्य प्रवाहाला लागलेले घातक वळण हा स्वतंत्र अध्याय आहे.

स्वातंत्र्यानंतर राष्ट्रवादाची अशी सर्वसमावेशक मांडणी करत देशाची उभारणी करणे हे अतिशय खडतर आव्हान होते. ‘हे विश्वचि माझे घर’ अशी भाषा करतानाच ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’ म्हणणाऱ्या फुटीरतावादी प्रवृत्तींना सामोरे जाणे, त्यांचा बीमोड करणे मुश्कील होते. नेहरूंनी त्यांच्या परीने राष्ट्रवादाची सर्वसमावेशक मांडणी होईल, याची पुरेपूर खबरदारी घेतली. हा देशच नाही, म्हणणाऱ्या विन्स्टन चर्चिल यांचा देश दुभंगला; मात्र भारताचे ‘बाल्कनायझेशन’ झाले नाही. भारत एकसंध राहिला. भल्या भल्या राजकीय पंडितांनी भारताचे विभाजन होईल, अशी अटकळ बांधली होती. देश दुभंगला तर नाहीच; उलट प्रगतीच्या दिशेने झेपावला. या प्रकाशमय प्रगतिपथाचे प्रमुख कारण हे नेहरूंच्या सर्वाना जोडणाऱ्या समावेशक दृष्टीत दडले होते.

वसाहतवादाला केलेला गुणात्मक विरोध, आत्यंतिक उन्मादी राष्ट्रवादातून जन्माला येणाऱ्या फॅसिझमला दिलेला सुस्पष्ट नकार, सर्व प्रकारच्या जमातवादाला नि:संदिग्ध विरोध, धर्मनिरपेक्षतेचे तत्त्वज्ञान आणि सर्वसमावेशक वृत्ती यातून नेहरूंनी भारतीय राष्ट्रवादाचे संभाषित घडवले. यामुळे नेहरूप्रणीत राष्ट्रवादाने मानवतेच्या व्यापक दृष्टीस पूरक असा कोन साधला. १९३९ला दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर, वासाहतिक चौकटीत भारताने नेमकी काय भूमिका घ्यायची असा विवाद्य मुद्दा उभा ठाकला तेव्हा सुभाषचंद्र बोस फॅसिस्ट शक्तींची मदत घेण्याची भाषा करत होते, तर पं. नेहरू आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्यातून या घटनेकडे पाहात असल्याने फॅसिझम आणि साम्राज्यवाद यांना विरोध दर्शवत आधुनिक भारताची पायाभरणी करत होते. बोस आणि नेहरूंच्या भूमिकांमधील फरकामधून नेहरूंचे आंतरराष्ट्रीय भान लक्षात येते. राष्ट्रवादाचे साधन आपल्याच देशाच्या अंगावर उलटू नये, उलट त्यातून एकत्वाची भावना टिकून राहावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न नेहरूंनी केले म्हणूनच ‘भारतमाता की जय’ म्हणत ते आंदोलनात सामील झाले आणि मानवतावादाचे गाणे गात वैश्विक पसायदान मागत राहिले. या दोन्हीतले द्वैत कुशलतेने दूर सारत त्यांनी राष्ट्रवादाची मांडणी केली आणि राष्ट्रवादाला बदमाशाचे अंतिम आश्रयस्थान बनू न देता राष्ट्रवादाच्या माध्यमातून मानवतेच्या स्वप्नलोकाचे बांधकाम त्यांनी केले.

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अध्यापन करतात. 

मराठीतील सर्व चतु:सूत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pandit jawaharlal nehru views on indian nationalism zws
First published on: 01-06-2022 at 00:46 IST