संरक्षण खात्यातील शिस्त अबाधित राखण्यासाठी या खात्यातील व्यक्तींना व्यभिचार अथवा विवाहबा संबंधांसाठी कोर्ट मार्शल होऊ शकते, असा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेला निकाल न्यायालयाच्याच २०१८ च्या निकालाच्या विरोधात जाणारा ठरल्यामुळे चर्चेत आहे. २०१८ मध्ये सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकरआदी पाच सदस्यांच्या खंडपीठाने विवाहबा संबंध (व्यभिचार) हा गुन्हा होऊ  शकत नाही, असा ऐतिहासिक निकाल देतानाच  व्यभिचाराला गुन्हा ठरवणारे भारतीय दंड संहितेचे कलम ४९७ अवैध ठरवले होते. जोसेफ शाइन यांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या आव्हानाच्या संदर्भातील हा निकाल होता. त्यामुळे १५८ वर्षे जुना असलेला व्यभिचारासंबंधीचा कायदा रद्द झाला होता. अर्थात मुळातच त्या कायद्यातील तरतुदी स्त्रीपुरुषांना असमान वागणूक देणाऱ्या आहेत, असा त्यांच्यावर आरोप होता. आयपीसीच्या या कलम ४९७ नुसार स्त्रीपुरुषांनी अवैध संबंध ठेवल्यास पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद होती. पण त्यातही या कायद्यानुसार केवळ संबंधित स्त्रीच्या पतीने तक्रार दाखल केली, तरच गुन्हा नोंदवण्याची तरतूद  होती. त्यामुळे या कायद्यातून पत्नी ही पतीची खासगी मालमत्ता असल्याचा विचार अधोरेखित होत होता. पतीने दुसऱ्या स्त्रीशी शारीरिक संबंध ठेवले तर त्या पुरुषाच्या पत्नीला आपला पती किंवा संबंधित स्त्रीविरोधात गुन्हा दाखल करता येईल अशी तरतूदच या कायद्यात नव्हती. पतीने व्यभिचार केल्याच्या आरोपावरून ती घटस्फोट घेऊ शकत होती, मात्र त्याच्याविरोधात तक्रार नोंदवू शकत नव्हती. पुरुषप्रधान मानसिकतेला खतपाणी घालणारा हा कायदा रद्द झाल्याबद्दल त्या वेळी आनंद व्यक्त केला गेला असला तरी असे होणे म्हणजे व्यभिचाराला परवानगी मिळाली आहे, असे नव्हे, हे लक्षात घ्यावे, असा मुद्दा अगदी न्यायालयीन पातळीवरूनही मांडला गेला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता न्यायमूर्ती के. एम. जोसेफ, न्यायमूर्ती अजय रस्तोगी, अनिरुद्ध बोस, हृषीकेश रॉय आणि सीटी रविकुमार यांच्या पाच जणांच्या खंडपीठाने ‘२०१८ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संरक्षण खात्यात काम करणाऱ्या व्यक्तींशी संबंध नाही, हा कायदा त्यांना लागू होत नाही,’ असा निवाडा देत संबंधित निकाल दिला आहे. या प्रकरणात अतिरिक्त सॉलिसिटर जनरल माधवी दिवाण यांनी असे मांडले की २०१८ च्या निकालामुळे असा समज होत गेला की व्यभिचार स्वीकारार्ह आहे. त्यामुळे सैन्य दलात तशी प्रकरणे मोठय़ा प्रमाणात वाढत गेली. त्यासंदर्भातील कारवाईला सर्वोच्च न्यायालयाच्या २०१८च्या निकालाच्या आधारे कारवाईला आव्हान दिले जात होते. मात्र २०१८ चा निकाल केवळ विवाहसंस्थेपुरता मर्यादित होता आणि सशस्त्र दलांसारख्या ठिकाणांसाठी नव्हता. ‘अशा आचरणाला जणू परवानगी मिळाल्याच्या समजामुळे संबंधितांवर जो परिणाम झाला आहे, त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ शकते,’ अशीही मांडणी दिवाण यांनी केली होती. त्यासंदर्भात न्यायालय म्हणते की ‘या न्यायालयाचा निकाल केवळ कलम ४९७ आणि कलम १९८(२) च्या वैधतेशी संबंधित होता. या प्रकरणात, या न्यायालयाला सशस्त्र दल कायद्याच्या तरतुदींचा प्रभाव विचारात घेण्याचा कोणताही प्रसंग नव्हता. या न्यायालयाने २०१८ च्या संबंधित निकालाने व्यभिचाराला मान्यता दिलेली नाही. न्यायालय व्यभिचार एक आधुनिक समस्या असल्याचे मानते, असे म्हणण्यास मात्र जागा आहे. 

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adultery laws in armed force army adultery punishment supreme court zws
First published on: 04-02-2023 at 02:05 IST