महात्मा गांधी यांच्या विचारांनी भारलेल्या, गांधीजी व आचार्य विनोबा भावे यांचा सहवास लाभलेल्या, स्वातंत्र्योत्तर काळात निराधार महिला आणि अनाथ मुलांसाठी सेवा कार्य करून त्यांना आधार देत आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या ‘पद्माभूषण’ शोभना रानडे यांच्या निधनाने विसावे शतक आणि एकविसाव्या शतकाला सांधणारा गांधीवादी विचारसरणीचा महत्त्वपूर्ण दुवा निखळला आहे. गांधीविचार आत्मसात करून त्याचा जीवनव्रत म्हणून अवलंब करत शोभनाताईंनी अनेकांचे आयुष्य उजळून टाकले.

शोभना रानडे यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९२४ रोजी झाला. वयाच्या १८ व्या त्यांची महात्मा गांधी यांच्याशी भेट झाली. त्यानंतर त्यांनी आयुष्यभर गांधीवादी आदर्श स्वीकारला. त्या काही वर्षे आसाममध्ये होत्या. त्याच काळात विनोबांची भूदान पदयात्रा आसाममध्ये असताना विनोबांनी ‘मैत्री आश्रमा’ची स्थापना केली. शोभनाताई मैत्री आश्रमाच्या विश्वस्त झाल्या. त्यांनी आसामी भाषेतील दोन कादंबऱ्यांचा मराठी अनुवादही केला होता. नागा महिलांना चरखा चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी रानडे यांनी आदिम जाति सेवा संघ ही संस्था सुरू केली.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : अटळ बाजारझड; पण नुकसानही अपरिहार्य?

विनोबा भावे यांच्या जन्मगावी- गागोदे येथे १५ ऑगस्ट १९७४ रोजी अनाथ निराधार मुलांसाठी पहिले बाल सदन सुरू केले. ‘महाराष्ट्र ग्रामदान मंडळा’च्या त्या अनेक वर्षे अध्यक्षा होत्या. १९७९ मध्ये पुण्यात परतल्यानंतर आगाखान पॅलेसमध्ये त्यांनी गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटीची विश्वस्त सचिव म्हणून जबाबदारी स्वीकारली. १९८८ मध्ये खादी ग्रामोद्याोग आयोगाच्या मदतीने त्यांनी इंदूरमध्ये भारतातील पहिले मुलींसाठीचे कस्तुरबा महिला खादी ग्रामोद्याोग विद्यालय सुरू केले. या विद्यालयाद्वारे ४० हजारांहून अधिक उद्याोजक प्रशिक्षित केले आहेत. पंचायत राजमधील महिला प्रतिनिधी, बालवाड्या आणि पाळणाघरे यांच्या शिक्षिका, अंगणवाडी सेविका यांना प्रशिक्षण देण्याचे कामही त्यांनी केले. शंकरराव देव, प्रेमाताई कंटक आणि विनोबांचे बंधू बाळकोबा भावे यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता. देव यांच्या सासवड येथील आश्रमाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. बालग्राम या शैक्षणिक चळवळीची मुहूर्तमेढ त्यांनी गागादे गावात रोवली. गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटीच्या माध्यमातून गंगा वाचवा चळवळ राबवून गंगा नदीला प्रदूषणापासून वाचविण्याच्या मोहिमेमध्ये रानडे यांचा सहभाग होता. सेवा कार्याबद्दल त्यांना ‘पद्माभूषण’, जमनालाल बजाज पुरस्कार, रवींद्रनाथ टागोर पुरस्कार, राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार, प्राइड ऑफ पुणे पुरस्कार यांसह महात्मा गांधी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एवढा साधेपणा होता की कोणीही सहजपणे भेटून मार्गदर्शन घेऊ शकत असे. निर्मोही जीवनाची कला त्यांनी आत्मसात केली होती.