वाचनाची सवय लहानपणीच लागणे आवश्यक असल्याने आणि आजचे पालक लहान मुलांना शांत ठेवण्यासाठी किंवा गुंतवण्यासाठी मोबाइल देत असल्याने अमेरिकेतील काही शाळांनी पुढाकार घेत नवी शक्कल लढविली. मार्चमध्ये मिशिगन येथील प्राथमिक शाळेत पुस्तकांचे व्हेण्डिंग मशीन बसवण्यात आले. मुलांना वाचनालयातून पुस्तके मिळतातच पण व्हेण्डिंग मशीनमध्ये पैसे भरून शीतपेय ओरपणाऱ्या माणसांसारखी पुस्तके काढण्याची कल्पना राबवली गेली. शाळेत चांगली वर्तणूक, अभ्यासातील प्रगती आदी गुणांच्या आधारावर मुले व्हेण्डिंग मशीनमधून पुस्तके काढण्यासाठी कॉइन्स मिळवितात. सध्या अमेरिकी शाळांमध्ये मुलांना पुस्तकांकडे आकर्षित करण्याचा हा प्रकार लोकप्रिय होतो आहे. त्याविषयीचे हे न्यू जर्सी (फ्रँकलिन) मधील शाळेतील वृत्त आणि व्हिडीओ.

भारतातसुद्धा, बेंगळूरु शहरात आणि तिरुवनंतपुरम या दक्षिणी शहरांत अशी पुस्तकांची व्हेण्डिंग मशिन्स गेल्या दोन वर्षांत कार्यरत झाली आहेत. पण शाळांतील प्रयोग म्हणून नाही.

https://tinyurl.com/3f3r2b8u

मुंबापुरीची ‘फिक्शनरी’…

पुस्तकवेड्या माणसांकडून शहरातील बंद झालेल्या पुस्तक दुकानांच्या आठवणी भरपूर सांगितल्या जातात. पण जोमात नवी ग्रंथदालने होत आहेत, यांच्याकडे त्यांचे दुर्लक्ष असते. विले पार्लेमधील ‘बुक गार्डन’ वांद्रे येथील ‘फिक्शनरी’ ही नवी भर बहुतांशांकडून दुर्लक्षित झालेली. भल्यामोठ्या नसलेल्या ‘बुक गार्डन’मध्ये बेस्टसेलर्सचा फापटपसारा नाही. तर फिक्शनरीमध्ये कथात्मक पुस्तकांखेरीज इतर काहीच नाही. कथात्मक साहित्यच विकायला ठेवलेले हे भारतातील एकमेव पुस्तकदालन असावे. याशिवाय कुर्ल्यातील सौरभ नंदी या तरुणाने सर्वांसाठी सुरू केलेले घरातील वाचनालय. या सगळ्यांचा फेरफटका असलेला हा व्हिडीओ. वाचन सजगतेबाबत भारतातही चांगले प्रयत्न होत असल्याचा दिलासा देणारा.

https://tinyurl.com/md979h3 k

आगामी पुस्तकांतील उतारे…

सोफी हेनी या पॅरिस रिव्ह्यूच्या वेब संपादिका आणि मासिकाच्या सहसंपादिका ऑलिव्हिया कान-स्पर्लिंग यांदी एक नवा प्रयोग त्यांच्या संकेतस्थळावरील मोफत वाचकांसाठी केला. प्रकाशनासाठी, पुस्तकाच्या परीक्षणासाठी आणि विविध मार्गांनी आगामी पुस्तके येत असतात. त्यांच्या वाचनातून या संपादकांच्या चर्चा घडतात. तर या आगाऊ वाचनसंधीतून मिळालेल्या पुस्तकातील उत्तम उतारे त्यांनी येथे दिलेत. ब्रिटनी स्पीयर या कलावतीची वाट पाहणाऱ्या सायंकालीन दैनिकाच्या पत्रकारापासून ते फ्रेंच, स्विडिश पुस्तकांच्या अनुवादातील हे उतारे (कधी येतील तेव्हाच्या) पुस्तकांची जाहिरात म्हणून नाहीत. या संपादकांच्या चोख नजरांची ओळख करून देणारे.

https://tinyurl.com/yxbmhffu