राजेश बोबडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वातंत्र्यानंतर दिलेल्या एका व्याख्यानात खऱ्या सुशिक्षितांची व्याख्या करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात प्रचारमंत्र बिघडल्यामुळेच सर्व बाजूंनी भारताच्या शक्तिबुद्धीचा व पावित्र्याचा नाश झाला होता. भारतातील तेहतीस कोटी देव केवळ दगड होऊन पडले! आज त्या दगडांना देवत्व देण्याचे आपले सर्वाचे काम आहे व ते आपण धडाडीने आणि निर्लोभ वृत्तीने केले तरच भारताचा उद्धार होणार आहे! ‘सत्ते’ च्या जोरावर समाजातील अनेक रूढी मोडून काढता येतील, अनेक योजना आखून बहुजनसमाजास जागृत करता येईल, परंतु सत्तेबरोबरच किंबहुना त्याहूनही अधिक प्रमाणात ‘सेवा’ परिणामकारक होऊ शकेल! सत्तेने समाजाची घडी बदलता येईल आणि प्रचाराने समाजाची मनेच पालटून टाकता येतील. धार्मिक भावनेने भारल्या गेलेल्या खेडय़ात कायद्याच्या बडग्यापेक्षा सेवाभावनेचा प्रेमळ प्रचारच सखोल कार्य करू शकेल. हे काम आज प्रत्येक जाणत्या माणसाने केले पाहिजे.  भारतातून अशिक्षितपणा अजूनही हद्दपार झाला नाही; अडाण्यांची संख्याही कमी नाही! माणसाचे हक्क, त्यांची कर्तव्ये, जीवनाचा हेतू, वागणुकीचे शास्त्र व आपली सुप्त शक्ती, यांची त्यांना कल्पना देखील नाही. त्यांच्यापैकी जे कोणी शिकून विद्वान होतात ते लागलीच एखाद्या  नोकरीच्या किंवा अधिकाराच्या शोधात लागतात. मोठमोठे विद्वान आपल्या बुद्धिमत्तेने एखाद्या विशिष्ट तुकडीचे नेतृत्व स्वीकारुन पुढारी होतात व अशा स्थितीत त्यांनी शेकडो व्याख्याने दिली किंवा वाङ्मय निर्माण केले तरी त्यात निर्भेळ समाजहित क्वचितच साधले जाते. कारण समाजहितापेक्षा स्वत:चा सन्मान, सत्ता किंवा अन्य स्वार्थ त्यांच्या बुद्धीस मोहित करीत असते. शिक्षण हे इतरास ज्ञानदान करून सुधारणा घडवण्यासाठी आहे असे समजण्याऐवजी, ते इतरास तुच्छ किंवा भक्ष्य समजण्यासाठी आहे असेच समजणारे ‘सुशिक्षीत’ लोक समाजात प्रकर्षांने आढळून येतात.

क्षीरसागराने स्वत:चे जीवन आटवून चंद्रास उन्नतिपथावर आणावे व स्वत: क्षार बनावे! परंतु चंद्राने आकाशात झेप घेताच तारकांच्या नंदनवनात व हिऱ्यामोत्यांच्या राशीत गुंग होऊन त्याच्या धडपडत्या लाटांकडे तुच्छतेचा कटाक्ष फेकावा, अशीच स्थिती आजच्या बहुतांशी सुशिक्षितांची दिसून येते! जनतेला जागवणारे काही विद्वान बसल्या ठिकाणावरुन उच्च भाषेत कळकळीने काही लिहीत असले तरी त्यांच्या विचारांचा शिरकाव खालच्या थरात होणे दुरापास्त होते व ते स्वत: समाजाशी समरस होऊन त्यांना सुधारू शकत नाहीत. मग खेडय़ाखेडय़ातून पसरलेले स्वार्थी उपदेशक त्याचा भरपूर फायदा घेतच राहतात. भारताची ही परिस्थिती जर सुधारली नाही तर स्वराज्य मिळाले तरी गुलामगिरी कायमच आहे असे म्हणणे भाग आहे. सिंहासनावरील व्यक्तींच्या बदलाबरोबरच हृदयसिंहासनावर अधिष्ठित असलेल्यांच्या भावनांतही परिवर्तन होणे अत्यंत आवश्यक आहे. समाजाच्या अंतरंगात जर पालट घडून न आला तर देशोन्नतीचे सुखस्वप्न फोल ठरेल!

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chintandhara a truly educated person will improve the society ysh