डॉ. श्रीरंजन आवटे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनुच्छेद ५१ (क) मध्ये देशाच्या एकात्मतेसाठी कार्य करणे हे नागरिकाचे कर्तव्य आहे, असे सांगण्याची आवश्यकता भासली नव्हती, कारण…

भारत नावाचे राष्ट्र ही एक दंतकथा आहे, असे विन्स्टन चर्चिल म्हणाले होते. हा देशच नाही. ही केवळ भौगोलिक अभिव्यक्ती आहे, असे म्हटले जात होते. युरोपमध्ये ज्या अर्थाने राष्ट्राची मांडणी केली जात होती, त्या अर्थाने भारत हे राष्ट्र नाही, हे खरेच आहे. एक वंश- एक राष्ट्र या प्रकारे राष्ट्राची पाश्चात्त्य कल्पना मांडली जात असे. भारतात धर्म, वंश, भाषा, जाती या सर्वच अर्थाने मोठ्या प्रमाणावर विविधता आहे. ही विविधता देशाच्या एकतेमधला अडथळा आहे, असे म्हटले गेले. या विविधतेमुळेच भारताचे विघटन होईल, अशी शक्यता राजकीय पंडित व्यक्त करत होते. अगदी बाबासाहेब आंबेडकरांनाही भारतात लोकशाही रुजू शकेल, यावर विश्वास नव्हता. विसाव्या शतकाच्या मध्यावर अनेक देश स्वतंत्र झाले. त्यापैकी अनेक ठिकाणी लष्करशाही निर्माण झाली. एकाधिकारशाही आली. काही देशांची पुन्हा फाळणी झाली. भारतामध्ये या साऱ्या शक्यता होत्या; मात्र तरीही हा देश टिकून राहिला. भारताची एकता आणि एकात्मता टिकून राहिली. विविधतेचा अडसर झाला नाही तर ती देशाला जोडणारा दुवा ठरली.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : लोकसेवक की स्वयंसेवक?

हे कसे घडले? स्वातंत्र्य आंदोलनाने विविधतेला अनुकूल अशी मूल्ये पेरली होती. सामाजिक आंदोलनाने त्याला पूरक अशी भूमी निर्माण केली होती. संविधानाचा भक्कम आधार होता. स्वातंत्र्यपूर्व भारतात ९ वर्षे तुरुंगात काढणारा नेहरूंसारखा माणूस स्वतंत्र भारताचा १७ वर्षे पंतप्रधान असल्याने या वारशाला सलगता प्राप्त झाली. त्यामुळेच संविधानाच्या अनुच्छेद ५१ (क) मध्ये देशाच्या एकतेसाठी, एकात्मतेसाठी कार्य करणे हे नागरिकाचे कर्तव्य आहे, असे वेगळे सांगण्याची आवश्यकता भासली नव्हती. याच अनुच्छेदामध्ये म्हटले आहे की, देशाचे सार्वभौमत्व टिकावे यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. एवढेच नव्हे तर देशाचे संरक्षण करणे आणि आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे हेदेखील नागरिकांचे कर्तव्य आहे. यासाठी संमिश्र वारशाचे भान असणे महत्त्वाचे आहे. भारतातली विविधता ही अवघ्या युरोपीय महासंघाहूनही जास्त आहे. त्यामुळेच हे वेगळेपण आपले सौंदर्य आहे. तो भेद नाही. त्यामुळेच संमिश्र संस्कृतीचा वारसा जतन करणे, हेसुद्धा आपले कर्तव्य आहे.

हा संमिश्र वारसा जपायचा असेल तर जात, धर्म, वंश या भिंती ओलांडायला हव्यात. या अनुच्छेदामध्ये म्हटले आहे धार्मिक, प्रादेशिक, जातीय आणि वर्गीय भेद बाजूला ठेवून समाजात सामंजस्य आणि बंधुभाव निर्माण होईल, यासाठी प्रयत्न करणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यासोबतच स्त्रियांना कमीपणा आणेल, अशा सर्व प्रथांचा त्याग करणे हेसुद्धा भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. अनेकदा धार्मिक अस्मितांमुळे समाजामध्ये तेढ निर्माण होते. काही वेळा प्रादेशिक अस्मिता वरचढ होतात. जातीय ध्रुवीकरणामुळे ताण निर्माण होतो. या सर्व बाबींपासून दूर राहणे किंबहुना हे घडू नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने कर्तव्यदक्ष असले पाहिजे. तसेच स्त्रीभ्रूणहत्येपासून ते हुंडा प्रथेपर्यंत अनेक प्रथांचे पालन आजही केले जाते. या साऱ्या प्रथा स्त्रीला माणूस म्हणून जगू देत नाहीत. तिचे माणूसपण हिरावून घेतात. अशा सर्व प्रथांचा त्याग केला पाहिजे. थोडक्यात, देशाची एकता, एकात्मता अबाधित राहावी, यासाठी प्रयत्न करणे, देशाच्या संरक्षणासाठी आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे, समाजात बंधुभाव आणि सामंजस्य निर्माण होईल, यासाठी प्रयत्न करणे आणि संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करणे ही चार प्रमुख कर्तव्ये या अनुच्छेदात सांगितली आहेत. त्यांचे पालन करताना विविधतेचे सौंदर्य लक्षात घेतले पाहिजे. इंद्रधनुषी रंगांमुळेच आकाश सुंदर दिसते. आपला देशही अशा विविधतेमध्ये एकता आणि एकतेतील विविधता यातून आकाराला आला आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे.

poetshriranjan@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fundamental duties under article 51 c of the indian constitution zws