सौरभ सद्योजात

सुखाचं तत्त्वज्ञान मांडणाऱ्या प्राचीन भारतीय काव्याचा अनुभव इंग्रजीतही तितकाच रसरशीतपणे देणाऱ्या पुस्तकाबद्दल…

He was embarrassed

as I laughed

and drew him close

when he fumbled

for the hook

and found it already undone

चोळी सैल करू पाहणारा आणि लज्जेने गोंधळून जाणारा प्रियकर आणि प्रणयाच्या तप्त क्षणात आकंठ बुडालेली प्रेयसी यांचं हे वर्णन सुमारे एकोणीसशे वर्षं जुनं आहे. अनेकांना ते खरं वाटणार नाही. आश्चर्य म्हणून नव्हे पण संस्कृतीची स्वीकृती अशा अर्थानं! संस्कृत, महाराष्ट्री प्राकृत, अपभ्रंश आणि इतर प्राचीन भाषांनी बहुरंगी पण सात्त्विक प्रणयाचे नीतिमान शिकवणाऱ्या कथा, कादंबऱ्या आणि कविता आपल्याला बहाल केल्या. भाषा ही संस्कृतीचा प्रवाह खळाळत ठेवत, प्रसंगी आकुंचन आणि प्रसरण पावणाऱ्या नदीसारखी असते. तिच्या आकुंचन आणि प्रसरणाच्या मर्यादा सामाजिक, आर्थिक आणि भौगोलिक घटकांवर अवलंबून असतातच. पण तिचं जाणीवपूर्वक हस्तांतरण करणाऱ्या, तिचा मुक्त वापर करणाऱ्या सजग समाजावर त्या अधिक अवलंबून असतात. एखाद्या विशिष्ट हेतूचा, विशेषत: धर्माचा विळखा भाषेभवताल पडला तर ती सीमित होते. साहित्य, तत्त्वज्ञान, आयुर्वेद, गणित, संस्कृती आणि इतर अनेक विषयांतून समाज समृद्ध केलेली भाषा म्हणून संस्कृतची ख्याती असली, तरी आजघडीला ती केवळ धार्मिक विषयांच्या हवाली झाल्याचं दिसून येतं. ‘डेड लँग्वेज’ अशी तिची हेटाळणी होते. मुळात, ‘देवभाषा’ असल्याचा ठसठशीत शिक्का मारल्याने तिच्या ठायी असणारे शृंगाराचे, सामान्य आयुष्यातल्या लालित्याचे संदर्भ धूसर होत गेले. पण या भाषेतल्या शृंगारिक साहित्याचा, वैषयिक प्रेमाच्या परंपरेचा वेध घेणारा ‘हाऊ टू लव्ह इन संस्कृत’सारखा ग्रंथ तिच्याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन देतो. अनुषा राव आणि सुहास महेश यांनी संस्कृत साहित्यातल्या प्रेमविषयक रचनांचा इंग्रजी अनुवाद आणि संपादन या ग्रंथात केलं आहे.

गुप्त राजवटीच्या काळात भरभराटीच्या शिखरावर पोहोचलेली संस्कृत आणि त्यातली साहित्य-संपदा ही मोठ्या प्रतिभेचं दर्शन घडवणारी आहे. अनुषा आणि सुहास या जोडगोळीने सुमारे दहा हजार लहान-मोठ्या कवितांमधून २१८ रचनांची निवड करून त्यांचं सहज, सोपं तरी सौंदर्यपूर्ण आणि कालसुसंगत भाषांतर केलं आहे. विशेष म्हणजे या रचनांची शीर्षकं त्यांच्या भाषांतरासारखीच आजच्या काळाला साजेशी आहेत. त्यातली कल्पकता आणि (काही प्रसंगी) विनोदबुद्धी मजेशीर आहे. कुमारसंभव, अमरूशटकम्, कामसूत्र, अथर्ववेद, महाभारत, मालती-माधव आणि इतर अनेक महत्त्वाच्या पण सामान्यत: ज्ञात नसलेल्या उत्तमोत्तम ग्रंथांमधून या रचना घेतल्या आहेत. यासह महत्त्वाचं हे की महाराष्ट्री प्राकृत भाषेतल्या, हाल सातवाहनाच्या ‘गाथा सप्तशती’मधल्या अनेक रचनाही यात समाविष्ट आहेत.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : प्रचार विरुद्ध संचार!

अर्थात या कविता, तत्कालीन साहित्य हे सगळ्याच ऐतिहासिक प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही. परंतु लेखनामागे वास्तवाचं आकलन आणि कल्पनाविचार असे दोन महत्त्वाचे मूलाधार असतात. त्या अर्थानं या रचना तत्कालीन शृंगाराबाबत, अनुरागापासून ते शरीरसुखाबाबत स्पष्टपणे व्यक्त झालेल्या दिसतात. या लहानशा आणि मर्यादित खिडकीतून त्यावेळच्या समाजातली सौंदर्यपूर्ण दृष्टी, लोकव्यवहारातील मर्यादा, देखण्या चालीरीती आणि शारीर पातळ्यांवरचं खुलेपण समजून घेण्याचा अवसर मिळतो.

अनुवादाव्यतिरिक्त या पुस्तकाचं विशेष कौतुक हे यातल्या विचारपूर्वक वर्गीकरणासाठी केलं पाहिजे. ‘हाऊ टू’ (फ्लर्ट / कीप अ सिक्रेट/ डे ड्रीम / मेक लव्ह…) च्या प्रश्नांनी या कवितांचं वर्गीकरण केलं आहे. तरुणाईच्या जवळ जाणारी भाषा अनुवादकांनी अनेक ठिकाणी कल्पकतेनं वापरली आहे. यामुळे अनेक तरुण-तरुणी याकडे आकृष्ट होतील.

काव्यसंग्रहाच्या सुरुवातीला अनुषा आणि सुहास यांनी अनुवादाच्या प्रक्रियेबाबत लिहिलेली मीमांसा महत्त्वाची ठरते. कालसुसंगत अनुवादाची गरज, प्राकृत कवितांच्या समावेशाची निकड, परदेशी विद्वानांच्या अनुवादांतले गोंधळ आणि इतर बाबतींतली भूमिका समजून घेणं उचित ठरतं. त्यामुळे या ग्रंथाची जडणघडण वाचकांना अधिक कळू शकेल. इ. स. पहिलं ते एकविसावं शतक असा मोठा कालखंड आणि दख्खन, बंगाल, मिथिला, द्रविड, माळवा आणि काश्मीर असा एकूण विस्तीर्ण पट यात दिसून येतो. कालिदास, व्यास, वाल्मीकी, दंडी, श्यामिलक असे महाकवी तर भोज परमार, राजा हर्ष, हाल सातवाहन आणि अमरू यांसारख्या राजपुरुषांच्या काव्यातून संपादकांनी रचनांचं वैविध्य राखलं आहे. जीवनोपभोगापासून दूर आयुष्य कंठणाऱ्या सोमप्रभा सुरी आणि धर्मकीर्ती या संन्यासी साधुपुरुषांनाही प्रीतफुलांचा मोह पडल्याचं दिसून येतं. यातून प्रेमाची आणि त्याबाबतच्या दृष्टिकोनाची व्याप्ती, त्या भावनेचा सहज स्वीकार दिसून येतो. विवाहबाह्य संबंध, तरुणाईच्या भाषेतली ‘फ्लिंग’, आक्रमक कामक्रीडा आणि अगदी कडकडीत भांडून ‘ब्रेकअप्स’ – असे अगदी आजचे विषय शेकडो वर्षांपूर्वी रचलेल्या या काव्यांत आढळतात. प्रेयसीच्या स्तनाग्रांना पर्वताच्या शिखरांची उपमा देणारा कालिदासाचा यक्ष, अश्रूंचा बांध फुटल्याने तिची रेखाटलेली चित्रं धूसर दिसत असल्याचं सांगून खिन्न होतो. सांगण्याचा मुद्दा हा की, ‘प्रेम’ नावाची संख्यारेखा तिच्या दोन्ही टोकांना ‘इन्फिनिटीज’ घेऊन येत असते. तिचा मर्यादित पण देखणा अनुभव देण्याचं काम हा ग्रंथ करतो. महत्त्वाचं म्हणजे या कवितांच्या आकलनासाठी संस्कृत भाषेच्या प्रगाढ ज्ञानाची अजिबात आवश्यकता नाही.

मुळात भारतीय संस्कृती ज्या पुरुषार्थांचा उल्लेख करते त्यात ‘काम’देखील आहे. आणि त्या काळी हा कामनेचा स्वर आळवणाऱ्या ग्रंथांची हत्तीवरून मिरवणूक काढली जात असल्याचं म्हटलं जातं. पण आजघडीला पुढारल्याची, आधुनिक मूल्यांची आणि स्वीकृतीची भाषा बोलणाऱ्या नव्या पिढीच्या पदरातही केवळ हलकल्लोळाचा श्राप पडतो आहे. परंपरेचं अर्धवट ज्ञान आणि तिच्या अनावश्यक अवडंबरानं होणारं नुकसान मोठं असतं. संस्कृत आणि इतर भाषांतलं या प्रकारचं संचित यांवर उ:शाप ठरू शकेल. यामुळे श्लील- अश्लीलाबाबतच्या भ्रामक कल्पना पुसट होतील. यातून स्वीकृतीची कवाडं अधिक व्यापकतेनं खुली होण्याचा संभव वाढीस लागेल. आणि हे सगळं केवळ वैचारिक व्यापकतेच्या अर्थानं असू नये. रसरशीत जीवनानुभव आणि सुखाचं तत्त्वज्ञान मांडणाऱ्या काव्याचा मनसोक्त आनंद घेणं, असे दुहेरी उद्देश त्यामागे असावेत. त्यासाठी ‘हाऊ टू लव्ह इन संस्कृत’सारखा सुखावह ग्रंथ आपल्या हाताशी असणं कधीही उत्तम!

हाऊ टु लव्ह इन संस्कृत (पोएम्स)

संपादक व अनुवादक : अनुषा राव, सुहास महेश

प्रकाशक : हार्पर कॉलिन्स इंडिया

पृष्ठे : ३२८; किंमत : ५९९ रु.

iamsaurabh09@gmail.com

हेही वाचा

ॲलिस मन्रो यांच्या लेखामध्ये चर्चा झालेली १९७७ सालातील अॅलिस मन्रो यांची रॉयल बीटिंग ही कथा. मधल्या काळात ‘पेवॉल’मध्ये कुलूपबंद असलेली ही कथा मन्रो यांच्या निधनानंतर काही काळापुरती मुक्त वाचनासाठी ठेवण्यात आलेली आहे.

https://shorturl.at/xaSlF

ॲलिस मन्रो यांनी कादंबरीलेखन टाळले, तसे ‘नोबेल-व्याख्यान’देखील टाळले… मग त्याऐवजी त्यांची व्हिडीओ-मुलाखत ७ डिसेंबर २०१३ रोजी स्वीडिश अकादमीत दाखवण्यात आली. ती शब्दश: वाचण्यासह पाहताही येईल, ती इथे :

t.ly/8aLJW

मिरांडा जुलै ही अभिनेत्री, चित्रकार, चित्रपट दिग्दर्शक आणि कथालेखिकाही. लेखिका म्हणजे सिनेमांमुळे सेलिब्रेटीपद मिळाल्यानंतरच्या हौसेतून येणारी नाही. तिच्या कथा न्यू यॉर्कर या साप्ताहिकात प्रकाशित होऊन गाजलेल्या वगैरे आहेत इतक्या शुद्ध साहित्यिक. या आठवड्यात प्रकाशित झालेल्या नव्या कादंबरीमुळे चर्चेचे सारे केंद्र सध्या तिच्यावर आहे. न्यू यॉर्करने तिच्यावर नऊ पानांचा प्रदीर्घ व्यक्तिवेध छापला आहे. त्याहून हे अंमळ कमी आकाराचे पण मौलिक वाचन.

https://shorturl.at/XoNYX

जॉनी डायमंड हा ‘लिट हब’ या साहित्यप्रेमी संकेतस्थळाचा प्रमुख संपादक. ॲलिस मन्रो यांच्या मृत्यूनंतर जगभरातील माध्यमांनी आपापल्या ज्ञानवकुबानुसार मृत्युलेख लिहिले. या संपादकाने मात्र मन्रो यांच्या कथांबरोबर जगणाऱ्या आपल्या आईचे शब्दचित्र मांडले आहे. लेख मन्रो यांचे कथागारूड अमेरिकेत-कॅनडातील घरांत कितपत झिरपले हे सांगणारा. https://shorturl.at/kwWfA