जगाचा इतिहास युद्धांचा आहे तसा निरपराध माणसांच्या नाहक मृत्यूंचाही आहे. अश्रू आणि रक्तासह निरपराध माणसांच्या वेदनांना संवेदनशील कलावंतांनी आपल्या कलाकृतींतून व्यक्त केले आहे. क्रूरतेविरुद्धचा कलावंतांचा हा विद्रोह होय. सभ्यता आणि संस्कृतीसह माणसांच्या रक्त, अश्रू, वेदनांचा इतिहास कलावंतांनी आपापल्या कलाविष्कारांतून जिवंत ठेवला आहे.
स्पॅनिश लोकांनी २ मे १८०८ रोजी स्वातंत्र्यासाठी फ्रेंच सत्तेविरुद्ध उठाव केला. त्यानंतर दुसरे दिवशी स्पॅनिश स्वातंत्र्यसैनिकांना एकत्र करून फ्रेंच सैनिकांनी अगदी जवळून बंदुकीच्या गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. या हत्याकांडात शेकडो लोक मारले गेले. स्पेनमधील माद्रिद गावातील रस्त्यावरून अक्षरश: रक्ताचे पाट वाहिले. या अमानुष घटनेने संवेदनशील कलावंत फ्रान्सिस्को होसे द गोया ( १७४७-१८२८) पार हादरून गेला. अस्वस्थ मन:स्थितीत त्याने ३ मे १८०८ हे चित्र काढले. भीषण नरसंहाराचे हे चित्र जगातल्या प्रसिद्ध चित्रांपैकी एक होय. हे चित्र म्हणजे एका संवेदनशील कलावंताने युद्ध आणि हिंसाचाराचा कुंचल्याने केलेला निषेध होय. या चित्रात हाती शस्त्र नसलेली पण स्वातंत्र्यासाठी जीव कुर्बान करणारी निर्भय माणसे आहेत. काही क्षणातच आपला मृत्यू होणार आहे हे माहीत असणाऱ्या नि:शस्त्र माणसांच्या शौर्यापुढे बंदुकधारी माणसांची क्रूरता तुच्छ वाटू लागली आहे. क्रूर राजसत्ता आणि धर्मसत्ता यांना कलावंतांनी आपापल्या कलाविष्कारांतून उत्तर दिलेले आहेच. पाब्लो पिकासो यांचे भीषण नरसंहाराविरुद्ध प्रतिक्रिया असणारे गेर्निका हे चित्र, नाझींच्या छळछावणीतल्या हत्याकांडाविषयीचे ‘चार्नल हाऊस’ हे चित्र म्हणजे संवेदनशील कलावंताने क्रूर अमानवीय हिंसाचाराला दिलेले निर्भय उत्तर होय. ‘‘मानवाच्या पाशवी वृत्तीविरुद्ध लढण्याचे कला हे एक शस्त्र आहे’’ या पाब्लो पिकासोच्या विधानाची प्रचीती फ्रान्सिस्को गोयाचे ‘३ मे १८०८’ हे चित्र देते.
चित्रकार पॉल क्ली याला आपल्या दोन चित्रकार मित्रांसह पहिल्या महायुद्धात सक्तीने जर्मन सैन्यात भरती व्हावे लागले. या भीषण युद्धात चित्रकार ऑगुस्ट माख आणि फ्रांझ मार्क हे त्याचे दोन्ही मित्र मारले गेले. युद्धभूमीवरून परतल्यावर अत्यंत दु:खी मन:स्थितीत पॉल क्ली याने ‘डेथ फॉर द आयडिया’ या चित्रासह युद्धाविषयीची बरीच चित्रं काढली.
चित्रकार व शिल्पकार हेन्री स्पेन्सर मूर (३० जुलै १८९८ – ३१ ऑगस्ट १९८६) पहिल्या महायुद्धाच्या काळात सैन्यात सामील झाला होता. युद्धभूमीवरील हिंसा, क्रूरता, रक्तपात, वेदनांनी विव्हळत मरणारी माणसे या साऱ्या गोष्टींनी संवेदनशील मनाचा हेनरी मूर विलक्षण अस्वस्थ झाला. युद्धात विषारी वायूमुळे आजारी पडल्यामुळे तो ब्रिटनमध्ये परत आला पण त्याच्या मन आणि मेंदूवर युद्धातील हिंसेचा फार परिणाम झाला. पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात फॅसिस्ट आणि नाझी प्रवृत्तींचा जर विजय झाला तर युरोपमधून सर्व कला आणि विचार नष्ट होतील अशी भीती त्याला वाटत असे.
जून १९४० मध्ये युद्धभूमीवरून अस्वस्थ मनाने हेनरी मूर लंडनला परतला.त्यावेळी जर्मनीच्या बॉम्बहल्ल्यांमुळे लंडनमध्ये भयग्रस्त वातावरण होते. एका रात्री लंडनच्या मध्यभागी अंडरग्राऊंड रेल्वस्थानकात भयग्रस्त लोक जमिनीवर आडवे पडून होते. गर्दीतले स्त्री पुरुष बॉम्बच्या भीतीने जिवंतपणी मरण अनुभवत होते. हे दृश्य पाहून हेन्री मूर फार अस्वस्थ झाला. युद्धाच्या वातावरणातील सर्वसामान्य माणसांची ससेहोलपट, त्यांच्या चेहऱ्यावर आणि एकूणच देहबोलीतून दिसणारी भीती, माणसांच्या मनातील मृत्यूचे शब्दातीत भय, दहशतीच्या छायेखाली वावरणारी निरपराध माणसे हे आणि असे वास्तव हेन्री मूर यांनी ‘शेल्टर ड्रॉईंग्ज’ या चित्रांमधून साकारले.
हेन्री मूर यांची ‘शेल्टर ड्रॉईंग्ज’ आणि इतरही युद्ध चित्रे म्हणजे युद्धाच्या भीषण छायेतील माणसांच्या अव्यक्त वेदना आणि भीतीचा कॅनव्हासवर रेखाटलेला इतिहास होय. हेन्री मूरची अनेक शिल्पे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामुळे प्रभावीत आणि भयभीत झालेल्या मानवी जीवनाचे दुभंगलेल्या मनांचे प्रतीकात्मक दर्शन घडवणारी आहेत.
हेन्री मूर यांनी युद्धकाळात तयार केलेली माता आणि मुलांची चित्रं व शिल्पं जगातील सर्वसामान्य माणसांची मने अस्वस्थ आणि विचारप्रवृत्त करीत असतात. हेन्री मूर यांनी युद्धकाळात नरसंहार सुरू असताना भयग्रस्त आणि दिशाहीन स्थितीतील स्त्री पुरुषांसह माता आणि मुलांची अनेक चित्रे काढली आहेत. ही चित्रं म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील इंग्लंडमधील सामान्य माणसांच्या दु:ख, वेदना, भूक, लाचारी, अस्वस्थता, चिंता, उदासी, दिशाहीनता यांचा शोकमग्न इतिहास होय. हेन्री मूर यांच्या चित्रांत आणि शिल्पांमध्ये बॉम्ब आणि इतर हिंसाचाराने धास्तावलेल्या स्त्रिया आणि मुले यांच्या चेहऱ्यांवरचे भीतीचे आणि चिंतेचे भाव दिसतात. काही शिल्पांमध्ये बॉम्बस्फोट आणि हिंसाचाराचे बळी ठरलेल्या स्त्री पुरुषांच्या देहांचे तुकडे, शरीराचे तुटलेले अवयव त्यांच्या चित्रांमध्ये, शिल्पांमध्ये साकारलेले आहेत. युद्धकालीन हिंसाचार आणि भयग्रस्तता यांचे चित्रण म्हणजे हेन्री मूर यांचा विद्रोह होय. युद्धकालातील सर्वसामान्य निरपराध माणसांच्या वेदनांच्या, अश्रूंच्या नोंदी म्हणजे हेन्री मूर यांच्या कलाकृती होय. मूल मांडीवर ठेवून दिशाहीन स्थितीत शून्यात पाहणाऱ्या उदास, भयभीत मातांची चित्रे म्हणजे युद्धकाळातील सर्वसामान्य माणसांच्या उद्ध्वस्त मन:स्थितीचे चित्रण होय. युद्ध आणि हिंसाचार सामान्य माणसांचे वर्तमान आणि भविष्य उद्ध्वस्त करीत असते. युद्धकाळातील मुलांसह भयग्रस्त मातांची शिल्पं आणि चित्रं यांच्या माध्यमातून हेन्री मूर यांनी हिंसाचारामुळे उद्ध्वस्त होणारे वर्तमान आणि भविष्य याविषयीची चिंता आणि उद्विग्नता दर्शवून आपल्या विद्रोहाची मुद्रा संवेदनशील मनांवर उमटविली आहे. युद्धातील हिंसाचारानंतरचे कारुण्य आणि वेदना हेन्री मूर यांनी चित्र आणि शिल्पांतून साकारत मानवी मनांतील संवेदनशीलतेला साद घातली आहे.
युद्धकाळात भयग्रस्त समाजाचे अश्रू पाब्लो पिकासो (१८८२-१९७३) यांच्यासारखा प्रतिभावंत चित्रकार जेव्हा ओंजळीत घेतो तेव्हा गेर्निका ( Guernica ) हे जगप्रसिद्ध चित्र तयार होत असते. निरपराध माणसांच्या वेदना आणि विद्रोहाचे भाष्य म्हणजे पाब्लो पिकासो यांचे गेर्निका हे चित्र होय. अमानुष युद्धांना संवेदनशील मानवाने दर्शविलेला निर्भय विरोध म्हणजे पाब्लो पिकासो यांचे गेर्निका हे चित्र होय.
२६ एप्रिल १९३७ रोजी जर्मनीने स्पेनमधील गेर्निका या सात हजार लोकवस्तीच्या गावावर क्रूर हवाई हल्ला केला. एक सुंदर गाव बेचिराख झाले. एक हजार ६५४ निरपराध स्त्री पुरुष नाहक मारले गेले. सुमारे ९०० लोक जखमी झाले. जगाच्या इतिहासातील ही एक अमानुष घटना होय. या घटनेमुळे जग हादरले. पाब्लो पिकासो यांच्यासारखे प्रतिभावंत प्रचंड अस्वस्थ झाले. लोकांची वेदना, निरपराध माणसांचे अश्रू, कलावंत मनाची अस्वस्थता, स्वप्नांसह माणसांचे सुंदर आणि भावस्पर्शी जीवन उद्ध्वस्त करणारे क्रौर्य हे आणि असे शब्दांत न सांगता येणारे वास्तव पाब्लो पिकासो यांनी गेर्निका या चित्रातून निर्भयपणे सांगितले आहे. गेर्निका या चित्राचे काम सुरू असताना पाब्लो पिकासो म्हणतात, ‘‘स्पेनचं युद्ध हा प्रतिगामी शक्तींनी जनतेशी, स्वातंत्र्याशी मांडलेला लढा आहे. माझ्या चित्राचं नाव मी ‘गेर्निका’ ठेवणार आहे. अलीकडच्या काळातल्या माझ्या इतर चित्रांप्रमाणे त्यातही लष्कर या घटकाविषयी मला वाटणारी किळस मी व्यक्त करणार आहे. या घटकानंच स्पेनला वेदना आणि मृत्यूच्या समुद्रात बुडवलं आहे.’’ क्रूर हिंसाचाराला कलावंताच्या निर्भय कुंचल्याने दिलेले हे उत्तर आहे. गेर्निका हे चित्र काळ्यापांढऱ्या रंगांच्या विविध छटा वापरून काढले आहे. काळापांढरा रंग तत्कालीन जनसंपर्क माध्यमांचा म्हणजे वृत्तपत्रांचा होता. गेर्निकातील शब्दातीत क्रौर्याच्या रक्तरंजित हिंसाचाराच्या बातम्या कृष्णधवल शब्द आणि छायाचित्रांच्या माध्यमातून वृत्तपत्रांनी जगभर पोहोचवल्या होत्या. तत्कालीन जनसंपर्क माध्यमांचा कृष्णधवल रंग वापरून युद्धात नाहक मारल्या जाणाऱ्या निरपराध माणसांच्या वेदना आणि विचारशील विवेकशील कलावंतांचा विद्रोह पिकासो यांनी गेर्निका या चित्रातून साकारला आहे. दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक असणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या कृष्णधवल रंगांची सूचकता गेर्निका या चित्रात वापरून पाब्लो पिकासो यांनी जगभरातील मानवी समूहाशी निर्भय संवाद साधला आहे. गेर्निका हे पिकासोचे युद्धविरोधी भाष्य होय. पाब्लो पिकासो यांनी अनेक चित्रांमधून प्रतीकात्मक रीतीने युद्ध, अमानुष छळ व क्रूर हिंसाचाराला विरोध करणारे भाष्य केले आहे. नाझींच्या छळ छावण्यांमध्ये मरणाऱ्या माणसांच्या वेदना आणि अव्यक्त विद्रोह यांविषयी भाष्य करणारे ‘चार्नल हाऊस’ हे चित्र, कोरियातील हत्याकांडावरचे ‘मॅसॅकर इन कोरिया’ हे चित्र या आणि अशा काही कलाकृतींच्या माध्यमातून पाब्लो पिकासो यांनी अव्यक्त वेदनांसह विद्रोह अभिव्यक्त केला आहे. पाब्लो पिकासो यांचे एक वाक्य फार मौलिक आहे. ‘‘…चित्रकला ही केवळ घर सजवण्याची गोष्ट नाही, तर वेळ आलीच तर शत्रूविरुद्ध वापरण्याचे आक्रमणाचे आणि बचावाचे हत्यारही आहे.’’ हे अगदी खरे आहे. पिकासोने वेदना आणि विद्रोहाचे विचार चित्रांतून निर्भयपणे मांडले. सभोवतीच्या क्रूर अत्याचारांमुळे, हिंसाचारामुळे भयभित पण विचारशील असणाऱ्या सभ्य आणि नीतिमान माणसांना पिकासोची चित्रे आवडली कारण या चित्रांतील सभ्यता, संस्कृती, मानवता आणि अहिंसेचा विचार लोकांना समजला. सभोवती कितीही पाशवी हिंसाचार असला तरी माणसांना नीतिमत्ता, सदाचार, अहिंसा, सत्य, मानवता, प्रेम, स्वातंत्र्य, बंधुता या तत्त्वांची आस असते. जग हिंसेच्या नव्हे मानवतेच्या मूल्यांचा स्वीकार करीत असते. पाब्लो पिकासोने गेर्निकासारखे चित्र काढून मानवांच्या अव्यक्त वेदना आणि विद्रोहाला निर्भयपणे व्यक्त केले आहे. आजही पाब्लो पिकासो आपल्या चित्रांतून आपल्याशी निर्भय संवाद साधत आहेत आपण ही वेदनेची चित्रभाषा समजून घेतली पाहिजे.
चित्रकार अमृता शेरगील यांच्या चित्रांमध्ये सांस्कृतिक वास्तवाचे उत्कट चित्रण केले गेले आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात डॉ. व्हिक्टर एगॉन यांच्यासोबत हंगेरीमधील बुडापेस्ट शहरापासून दूर असलेल्या ब्रखल (Breughel) या लहानशा गावात राहणाऱ्या चित्रकार अमृता शेरगील यांनी ‘हंगेरियन मार्केट सीन’ हे चित्र नोव्हेंबर १९३८ मध्ये काढले. किस्कुनहालास चर्च परिसरातील संध्याकाळच्या बाजाराचे हे चित्र असावे. चर्चच्या उंच टॉवरवर प्रकाश आहे पण बाजारात अंधुक प्रकाश आहे. बाजारातील व्यवहार शांतपणे सुरू आहेत. बाजारात चैतन्य नाही. उलट वातावरण उदास आहे असे वाटते. युद्धाचे सावट आहे. माणसे उदास आहेत. भीती आणि उदासीच्या छायेत वावरणाऱ्या माणसांच्या संथ, मंद हालचाली या चित्रात आहेत. हे चित्र दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील माणसांच्या मनातील भयग्रस्त उदासीनता आणि हताशपण व्यक्त करणारे आहे. याच काळात अमृता शेरगील यांनी द मेरी सिमेट्री हे दफनभूमीचे चित्र काढले. आनंददायी दफनभूमी हे चित्र काढताना अमृता शेरगील यांच्या मनात मृत्यूचे विचार होते का? युद्धाची परिस्थिती आणि नवरा डॉ. व्हिक्टर एगॉन लष्करात डॉक्टर होता. या स्थितीचा परिणाम चित्रावर झाला असेल का ? युद्धकाळातील लोकमानसातील भयग्रस्त उदासीनतेचा परिणाम आनंददायी दफनभूमीचे चित्र काढण्यावर झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लेखक समीक्षक आहेत
ajayjdeshpande23@gmail.com