कर्तृत्व आणि व्यक्तित्व या दोन्ही बाबतींत बी. व्ही. (बाळकृष्ण) दोशी मोठेच होते.. केवळ ‘वास्तुरचनाकार’ नव्हे, तर स्वातंत्र्योत्तर काळातील आधुनिक भारताचे एक शिल्पकार होते. त्यांना ‘वास्तुकलेतील नोबेल’ मानले जाणारे प्रिट्झकर पारितोषिक मिळाले तेव्हा (१० मार्च २०१८) आणि मग इंग्लंडचे ‘रॉयल गोल्ड मेडल’ हा वास्तुकलेतील सर्वोच्च सन्मान मिळाला तेव्हा (१६ डिसेंबर २०२१) अशा दोन नोंदी याच स्तंभात त्यांच्याविषयी करून झाल्यानंतरही त्यांच्याबद्दल सांगण्यासारखे काही उरणारच.. पण हा स्तंभ आज दोशी यांच्या निधनानंतर लिहिला जातो आहे. त्यांच्याविषयी पुन्हा कधी ‘व्यक्तिवेध’ होणार नाही, ही जाणीव दु:खदच.
सन १९५२ पासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर वास्तुरचना करत होते. मुंबई सोडून लंडनमध्ये शिकण्यास गेलेल्या दोशी यांना १९५१ मध्ये माहिती मिळाली की, ल कॉर्बुझिए हे भारतातील चंडीगड शहराची रचना करणार असून त्यांना योग्य माणसे हवी आहेत.. ‘पण आठ महिने कोणत्याही पगाराविना काम करावे लागेल’ अशी अटही होती, ती नुकतीच आर्किटेक्चरची अंतिम परीक्षा दिलेल्या दोशी यांनी पाळली! चंडीगडच्या उच्च न्यायालय इमारतीचे काम दोशींवर सोपवले गेले. अहमदाबादमध्येही चार इमारतींची कामे ल कॉर्वुझिए यांनी केली, त्यापैकी ‘मिल ओनर्स असोसिएशन बिल्डिंग’च्या रचनेची (दर्शनी भागात बाहेर आलेला जिना) प्रेरणा दोशी यांच्या ‘अरण्य हाऊसिंग- इंदूर’ आणि ‘एलआयसी हाऊसिंग- अहमदाबाद’ या नगररचना प्रकल्पांतही दिसते. यापैकी इंदूरचा प्रकल्प अल्प उत्पन्न गटासाठी होता, पण अहमदाबादच्या प्रकल्पात एकाच इमारतीत उच्च ते अल्प उत्पन्न गटांतील कुटुंबे राहावीत, अशी रचना दोशी यांनी करणे हे त्यांच्या आधुनिकतावादी वैचारिकतेचेही लक्षण ठरले. अहमदाबादच्या प्रकल्पांमुळे थेट विक्रम साराभाई यांच्याशी दोशी यांचा संवाद होई. परंतु साराभाईंच्या कल्पनेतील ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट- अहमदाबाद’चे काम स्वत:ला न मिळवता जागतिक ख्यातीचे लुई कान यांच्याकडे ते जावे, यासाठी दोशी मध्ये पडले! अहमदाबादेतील ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन’ या संस्थेची संकल्पना करण्यात त्यांचा सहभाग होता. परंतु वयाच्या पस्तिशीत त्यांनी ‘सेप्ट’ची (सेंटर फॉर एन्व्हायर्न्मेंटल प्लॅनिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी) स्थापन केली, ते आज विद्यापीठ झाले आहे. अहमदाबादमध्ये दंगलीपूर्वी ‘हुसेन दोशी गुफा’ म्हणून ओळखले जाणारे आणि पुन्हा उभी राहून ‘अमदावाद नी गुफा’ झालेले जमिनीखालील कलादालन, हीदेखील त्यांची संस्था-उभारणी.
पुण्याची यशदा वा सवाई गंधर्व स्मारक, मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘भारत डायमंड बोर्स’, हैदराबादची ‘ईसीआय टाऊनशिप’, वाराणसीच्या ‘ज्ञानप्रवाह’ संस्थेचे ‘प्रतीची’ संकुल, कोलकात्याचे ‘उद्यान- काँडोव्हिले’ अशा दोशी यांच्या वास्तु-खुणा शहरोशहरी दिसतात, त्यांपैकी रहिवासी इमारती वा संकुलांमागचा त्यांचा मानवी भवतालाचा विचार महत्त्वाचा आहे. यावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, ३० हून अधिक देशांतील प्रतिष्ठित संस्थांमध्ये व्याख्याने दिली. ‘राहती जागा आणि जीवनशैली यांच्या मिलाफामुळेच जगणे सुंदर होते’ यासारखे त्यांचे विचार यापुढेही मार्गदर्शक ठरतील!