भारतीय हॉकी स्वप्नांना पंख देणारे आणि केरळचे पहिले ऑलिम्पिक पदकविजेते हॉकीपटू मॅन्युएल फ्रेडरिक यांची खरी ओळख. हॉकीच्या मैदानावरील हा धाडसी खेळाडू मैदानावर कधी डगमगला नाही. आयुष्यात कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशीदेखील त्याने धैर्याने लढा दिला. गोलरक्षक म्हणून त्यांनी स्वत:ची नुसती ओळख निर्माण केली नाही, तर ती भूमिका ते अक्षरश: जगले. मैदानावर कधीही हेल्मेट न घालणारे, कधीही न डगमगणारे आणि प्रतिस्पर्ध्यांच्या आक्रमणांसमोर कधीही न झुकणारे फ्रेडरिक १९७२ मध्ये म्युनिक ऑलिम्पिक स्पर्धेत भक्कम तटबंदीसारखे उभे राहिले आणि भारताला कांस्यपदक मिळवून देण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यांची ही कामगिरी केरळसाठी विशेष ठरली. फ्रेडरिक केरळचे पहिले ऑलिम्पिक पदकविजेते खेळाडू ठरले.

केरळमधील जन्मगावी धुळीच्या मैदानापासून जगातील सर्वांत भव्य मैदानांपर्यंत त्यांनी धैर्याने गोल वाचवून भारताच्या अभिमानाचे रक्षण केले. हॉकीपटू म्हणून त्यांना जरा उशिरानेच ओळख मिळाली. पण, मिळाली तेव्हा तिचा ठसा इतका ठसठशीत उमटला, की तो सहज पुसला जाणार नाही. अनेक पिढ्यांना त्यांनी घडवले व अशाच एका पिढीने पुन्हा केरळला ऑलिम्पिक पदक विजेता दिला. योगायोग म्हणजे तोदेखील गोलरक्षकच होता. पी. आर. श्रीजेश. हा केरळचा दुसरा सुपुत्र ज्याने फ्रेडरिक यांचा वारसा जपला.

कन्नूरमधील बार्नासोरी या जन्मगावी शालेय काळात फुटबॉलपासून मैदानावर सुरू झालेल्या फ्रेडरिक यांच्या प्रवासाने हॉकीपाशी येऊन नवे वळण घेतले. वयाच्या १२व्या वर्षी फ्रेडरिक हॉकीकडे वळले. त्यांच्या कारकीर्दीला आणि जीवनाला कलाटणी देणारा हा निर्णय होता. त्यांच्यातील हॉकीपटूला खरी चालना लष्करात मिळाली. वयाच्या पंधराव्या वर्षी फ्रेडरिक लष्करात दाखल झाले. तेथील सेवा शिबिरातील कठोर प्रशिक्षणातून त्यांच्यातील प्रतिभेला वाव मिळाला आणि वयाच्या २४व्या वर्षी फ्रेडरिक यांनी गोलरक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. संघातील एक विश्वासार्ह खेळाडू म्हणून त्यांनी लौकिक मिळविला.

पेनल्टी स्ट्रोकवरील गोलरक्षण म्हणजे फ्रेडरिक, असे समीकरण तयार झाले होते. पेनल्टी स्ट्रोक फ्रेडरिक यांच्याकडून हमखास अडवला जात असे. टायब्रेकमध्ये गेलेल्या सामन्यांत गोल वाचवून संघाला १६ राष्ट्रीय विजेतेपदे मिळवून देऊन त्यांनी ही ओळख दृढ केली होती. नेदरलॅण्ड्समध्ये १९७३ आणि अर्जेंटिनात १९७८ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.

दबावाखालीही शांत आणि संयमी राहणे हे त्यांचे वैशिष्ट्य. त्याच जोरावर त्यांनी चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. मात्र, शासनदरबारी ते दुर्लक्षितच राहिले. म्युनिक ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या संघातील अनेक खेळाडूंना अर्जुन, क्रीडा, तसेच पद्मासारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. पण, फ्रेडरिक कायम दुर्लक्षित राहिले. शासनाने मध्यंतरी त्यांना ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराने गौरवले. पण, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. जेव्हा मिळायला हवा तेव्हा त्यांना सन्मान मिळाला नाही. मैदानावरील कामगिरीने ‘टायगर’ हे टोपणनाव मिळविणारे फ्रेडरिक लढवय्ये होते. त्यांच्या कामगिरीमुळे म्युनिकचे कांस्यपदक अजूनही चमकते आहे. भारतीय हॉकी आणि गोलरक्षकाची कहाणी जेव्हा जेव्हा सांगितली जाईल, तेव्हा तेव्हा फ्रेडरिक यांचे नाव प्रतिध्वनित होत राहील.