काँग्रेसने भूतकाळात मुस्लिमांचे लांगूलचालन केले आणि भविष्यकाळात सत्तेवर आल्यासही हा पक्ष तेच करेल असे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रचारामधून सांगत असताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलिगड मुस्लीम विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नईमा खातून यांची नियुक्ती केली आहे.  १९२० मध्ये बेगम सुलतान जहाँ या अलिगड मुस्लीम विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू झाल्या होत्या. त्यांच्यानंतर तब्बल १०४ वर्षांनी ही नियुक्ती झाल्यामुळे ती ऐतिहासिक तर आहेच शिवाय देशात असलेल्या मुस्लिमांच्या संदर्भातील वातावरणावर भाष्य करणारीही आहे. देशात सध्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्यामुळे आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे कोणत्याही नियुक्तीसाठी निवडणूक आयोगाची परवानगी बंधनकारक असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : एमा हिस्टर्स

नईमा खातून यांच्या नियुक्तीसाठीही आयोगाकडून परवानगी घेतली गेली आणि ती देताना आयोगाने या नियुक्तीमधून कोणताही राजकीय फायदा घेतला जाऊ नये असे म्हटले आहे. असे असले तरी लोकसभा निवडणुकीचा जेमतेम पहिला टप्पा पार पडलेला असताना नईमा खातून यांची कुलगुरुपदी नियुक्ती ही भाजपच्या मुस्लीम महिलांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पाहिले जात आहे. याआधीही मोदी सरकारने आपल्या राजकारणाचा भाग म्हणून मुस्लिमांमधील तिहेरी तलाकची प्रथा कायद्याने बंद केली होती आणि तिचे मुस्लीम स्त्रियांनी स्वागतच केले होते. अलिगड मुस्लीम विद्यापीठाला भारतात आणि भारताबाहेर महत्त्वाचे स्थान आहे. या विद्यापीठाची स्थापना सर सय्यद अहमद खान यांनी १८७५ मध्ये केली होती. नईमा खातून यांचे पती प्राध्यापक मोहम्मद गुलरेझ याआधी जवळपास वर्षभर अलिगड मुस्लीम विद्यापीठाच्या कुलगुरुपदी होते. नईमा खातून यांनी त्यांच्याकडून कुलगुरुपदाचा पदभार स्वीकारला.

प्रा. नईमा खातून यांना तीन दशकांपेक्षा जास्त काळ शिक्षणक्षेत्राचा अनुभव आहे. कुलगुरू होण्याआधी त्या अलिगड मुस्लीम विद्यापीठाच्या महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी अलिगड मुस्लीम विद्यापीठामधूनच राजकीय मानसशास्त्र या विषयात पीएच.डी. केली आणि त्यानंतर १९८८ मध्ये त्या विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागात प्रपाठक झाल्या. २००६ मध्ये त्या मानसशास्त्राच्या प्राध्यापक झाल्या. २०१४ मध्ये त्यांची महिला महाविद्यालयाच्या प्राचार्यापदी नियुक्ती झाली. मध्य आफ्रिकेतील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ रवांडा येथेही त्यांनी एक वर्ष अध्यापन केले आहे. त्या ऑक्टोबर २०१५ पासून अलिगड मुस्लीम विद्यापीठातच कौशल्य विकास आणि करिअर नियोजन केंद्राच्या संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भाग घेतला आहे आणि जगभरातील वेगवेगळया संस्थांमध्ये मानसशास्त्र या विषयावर व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या नावावर मानसशास्त्राची सहा पुस्तकेही आहेत.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information about naima khatoon who becomes first woman vice chancellor of amu zws
Show comments