आंतरराष्ट्रीय संगीतजगताचे पारंपरिक वृत्त ‘टेलर स्विफ्ट’वर एकाग्र झालेले असताना एखादे पठडीबाहेरचे नाव जेव्हा समाजमाध्यमांतून उगवून येते, तेव्हा त्याचे कौतुक अधिक वाटू लागते. गेले काही दिवस हे कौतुक डच गायिका एमा हिस्टर्स हिच्या नावावर आहे. ताजे कारण- दोन वर्षांपूर्वी भारतीय घराघरांत वाजल्या जाणाऱ्या ‘श्रीवल्ली’ गाण्याचे तेलुगू रुपडे. २८ वर्षांच्या या गायिकेचे गाणे २० वर्षांहून अधिक काळ सुरू असले, तरी गेली आठेक वर्षे ती ‘कव्हर्स’द्वारे म्हणजेच इतरांच्या गाण्यांना नव्या अंदाजात गाऊन आपला चाहतावर्ग वाढवत आहे. तो किती, तर यूटय़ूबसारख्या परिचित माध्यमांत ५० ते ६० लाख इतका. एखाद्या मुख्य धारेतील कलाकारांनाही भोवळ आणणारी तिची ही लोकप्रियता. नेदरलॅण्ड्समधील झीलॅण्ड प्रांतात १९९६ साली जन्मलेल्या एमाने लहान वयातच आपल्या गाण्यातील कौशल्याला पैलू पाडण्यास सुरुवात केली.

हेही वाचा >>> चिप-चरित्र : चिप उद्योगाचे ‘पूर्व’रंग

A policeman assaulted a PMP driver along with a carrier Pune
पोलीस कर्मचाऱ्याची मुजोरी; पीएमपी चालकासह वाहकाला मारहाण
Rajasthan Youtuber Arrested For Threatening To Kill Salman Khan Gets Bail
सलमान खानला जीवे मारण्याची धमकी; राजस्थानस्थित युट्युबरला जामीन
Anant Radhika Wedding
अंबानींच्या लग्नात बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी दिल्याप्रकरणी अभियंत्याला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई
franklin india fund analysis
फंड विश्लेषण: फ्रँकलिन इंडिया प्रायमा फंड
Trainee pratiksha bhosle police officer commits suicide due to lover betrayal Nagpur
प्रियकराने दगा दिल्यामुळे प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या
Rahul Gandhi Comments On Udaipur Tailor Killing Incident
“ती लहान मुलं..”, म्हणत राहुल गांधींचे कन्हैय्या लालची भरदिवसा हत्या करणाऱ्यांना समर्थन? खऱ्या Video तील वाक्य ऐका
Social Process, post-violence,
‘समाजप्रक्रिया’ हिंसेनंतरची आणि पूर्वीचीही
Mumbai, Human Finger in Ice Cream DNA Links it to Pune Factory Worker, Doctor from malad Finds Human Finger in Ice Cream, Human Finger in Ice Cream, Mumbai news, malad news
मुंबई : आईस्क्रीममधील बोटाचा तुकडा कामगाराचा

स्थानिक कार्यक्रमांत आठव्या वर्षी गाण्याचे पुरस्कार पटकावत तिने टीव्हीवर स्थान पक्के केले. मग लोकप्रिय इंग्रजी गाण्यांना आपल्या शैलीत सादर करीत तिचे शालेय आणि महाविद्यालीयन जीवन पुढे सरकले. २०१३ साली पदवी मिळाल्यानंतर तिने संगीताला अधिक गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली. इंग्रजी गाण्यांवरच न थांबता, हिंदी, पंजाबी, उर्दू, अरेबिक, इंडोनेशियन गाण्यांतील शब्दांचे मिश्रण करून नवे व्हर्जन तयार करण्याकडे तिचा कल होता. आपल्या यूटय़ूब चॅनलद्वारे तिने अल्पावधीत माध्यमांवर धुमाकूळ घातला. प्रत्येक गाणे यूटय़ूबवर किमान पाच-दहा लाख प्रेक्षकांची तजवीज करणारे ठरले. भारत- अमेरिका आणि युरोपीय देशांमधील तरुणाईने एमा हिस्टर्सची गाणी व्हायरल करण्यात मोठी भूमिका बजावली. तिच्या कव्हर्सवर कान आणि नजर टाकली तर ‘मरून फाईव्ह बॅण्ड’चे ‘गर्ल्स लाईक यू’, एड शीरनचे ‘शेप ऑफ यू’, जस्टिन बिबरचे ‘लेट मी लव्ह यू’ या गाण्यांवर तिची स्वत:ची छाप सापडेल.

गेल्या दोन-तीन वर्षांत तिचे आक्रमण पंजाबी गाण्यांवर सर्वाधिक झालेले दिसते. हार्डी संधूचे ‘बिजली, बिजली’ म्हणजेच ‘ओ सिण्ड्रेला’ हे गाणे एमा हिस्टरच्या आवाजात मूळ गाण्याइतकेच उत्साहउधाण तयार करू शकते. पाकिस्तानी गायक अली सेठी याच्या ‘पसूरी’ गाण्याने दोन वर्षांपूर्वी सीमा ओलांडत दोन्ही देशांतील श्रोत्यांना पछाडले होते. हे गाणेही एमाने नव्या अदाकारीत पेश केले आहे. ‘तेरे वास्ते फलक से मैं’, ‘शोन्ना मेरे शोन्ना शोन्ना’, अरजित सिंगच्या ‘शायद’ गाण्याचा इंग्रजी अवतार, ‘पुष्पा’मधील ‘उ अण्टवामामा’ ही गाणी ऐकली, तर तिच्या लोकप्रियतेचे गमक कळेल. केवळ माध्यमांवरील अल्पायुषी हौशी वीरांच्या कुळातील नसलेली ही गायिका लवकरच मुख्य धारेतील झाली तर ते आश्चर्य नसेल. ते तिच्या मेहनत आणि गुणांचे फळ असेल.