मराठी वाङ्मय परिषद, बडोदे येथील सन १९५३चे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे भाषण आपण यापूर्वीच्या भागात सारांश रूपात समजून घेतले व त्यानिमित्ताने साहित्य संमेलनांची इतिकर्तव्यता कशात पाहिली पाहिजे, हे आपल्या लक्षात आले असेलच. असे असले तरी तर्कतीर्थांच्या या भाषणाची मूळ संहिता अनेक अंगांनी विचार करण्यायोग्य ठरते.

हे संमेलन ज्या बडोदानगरीत भरले होते, त्या शहराचे वर्णन तर्कतीर्थ महाराष्ट्र-गुजरात प्रांतांमधील जिव्हाळ्याच्या नात्याचे प्रतीक असे करतात. इतकेच नव्हे तर या दोन्ही प्रांतांचे बडोदा हे एकात्म हृदय असल्याचे समजावतात, तेव्हा उभय प्रांतांच्या संस्कृतीचा मधुर मिलाफ करणारा तो आविष्कार बनून आपल्यापुढे येतो. शहरांकडे पाहण्याची ही तर्कतीर्थदृष्टी उदारमतवादी, तितकीच राष्ट्रीय भावनेने ओथंबली असल्याचे लक्षात येते.

बडोदा हे तसे गुजरातमधील संस्थान. तेथील राजा श्रीमंत सयाजीराव गायकवाड हे महाराष्ट्राचे मूलनिवासी. त्यांच्यावरील संस्कार प्रभाव अर्थातच महाराष्ट्रीय संस्कृतीचा. हे संस्थान भारतातील समृद्ध संस्थानांपैकी एक; पण महाराजा सयाजीराव गायकवाड हे भारतातील एकमेव सार्वभौम राजे होते, अन्य मांडलिक. हे अलीकडे त्यांचे अभ्यासक बाबा भांड यांनी आपल्या लक्षात आणून दिले आहे. त्यांचा राजमहाल आहे ‘लक्ष्मी-विलास’, तो महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीविषयक अनेक उपक्रमांनी ‘सरस्वती-विलास’ बनविला, हे तर्कतीर्थ आपल्या या भाषणातून लक्षात आणून देतात.

महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या बडोदे संस्थानात सक्तीचे प्राथमिक शिक्षण, अस्पृश्यता निवारण कार्य, ग्रंथालय कायदा आणि ग्रंथालय स्थापना, वेदोक्त चळवळ, प्राच्यविद्या प्रसार इत्यादी स्वरूपात जे सांस्कृतिक कार्य केले, तर्कतीर्थ त्याचे वर्णन ‘सुराज्याचे प्रयोग’ असे करतात, तेव्हा लक्षात येते की, विधायक सुधारणा हा केवळ संस्थान वा राज्य सुधारणेचा उपक्रम नसतो, तर तो एक सुराज्य निर्मितीचा रचनात्मक प्रयोगच असतो.

तर्कतीर्थांचे हे भाषण साहित्याच्या कलात्मक श्रेष्ठतेचे अनेक निकष अधोरेखित करीत राहते. तर्कतीर्थांनी या भाषणात वाङ्मय, शास्त्र, कला, तत्त्वज्ञान, कल्पना, सत्य, तर्क, सर्जनशीलता, टीका इत्यादी घटकांचा जो विश्लेषण शैलीने ऊहापोह केला आहे, त्यातून साहित्य हे मानवी जीवनावर प्रभाव टाकणारे किती गंभीर अंग आहे, याची जाणीव झाल्याने वाचक अंतर्मुख होऊन विचार करू लागतो. या भाषणात तर्कतीर्थ साहित्याचे नोबेल पारितोषिक रोमा रोलाँ, रवींद्रनाथ टागोर, आंद्रे जिद, फ्रँको मोर्याक इत्यादी ललित लेखकांना मिळाले ते ठीक; पण बर्ट्रांड रसेलला का मिळाले, असा औचित्याचा प्रश्न उपस्थित करतात, तेव्हा तो एका अर्थाने साहित्याचे मूलभूत स्वरूप काय असते याचीच ती तपासणी असते. या आधारे तर्कतीर्थ या सबंध भाषणात वाङ्मयीन स्वरूपाचे जे विवेचन करतात, ते वाङ्मय, तत्त्वज्ञान, तर्क, विज्ञान आणि इतिहास यांच्या स्वरूप चर्चा व सीमारेषांबरोबर परस्परपूरक तत्त्वांचे ते मानवहितलक्ष्यी विवेचन ठरते.

ही चर्चा व्हायचे आणखी एक कारण होते. हे भाषण झाले, त्या वर्षीच (१९५३) साहित्याचे नोबेल विन्स्टन चर्चिल यांना जाहीर झाले होते, तेव्हा त्यांचे दुसऱ्या महायुद्धातील वक्तृत्व हे मानवी मूल्य रक्षणार्थ प्रभावी ठरल्याची नोंद घेऊन देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. वक्तृत्व हेही श्रेष्ठ वाङ्मयच असते! पुढील वर्षीच (१९५४) तर्कतीर्थ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. त्यावेळीही प्रश्न विचारला गेला की, तर्कतीर्थांनी कुठे ललित लिहिले आहे? तेव्हा ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ (१९५१) भाषणसंग्रह मराठी साहित्यातील अभिजात ग्रंथ म्हणून चर्चिला गेला होता. योगायोगाने लगेचच १९५५ ला या ग्रंथास मराठी साहित्य अकादमीचे पहिले पारितोषिक लाभले आणि वक्तृत्व वाङ्मय श्रेष्ठ ठरू शकते, हा विचार साहित्य जगतात रूढ होऊन गेला.

वाङ्मयाच्या कलात्मक श्रेष्ठतेविषयीच्या मापदंडांची चर्चा करणारे हे भाषण आजही साहित्य विश्वात दीपस्तंभ समजले जाते, ते वाङ्मयविषयक मूलभूत चिंतन करणारा मार्गदर्शक विश्लेषणाचा वस्तुपाठ म्हणून! या भाषणात तर्कतीर्थांची तार्किक प्रज्ञा प्रत्ययास येते आणि लक्षात येते की, तर्काशिवाय युक्तिवाद बिनतोड होणे केवळ अशक्य असते.