अरे! हसण्यावारी काय नेता? बाबुलाल खराडी योग्य तेच बोलले. आता तुम्ही म्हणाल कोण हे खराडी? तेच, ज्यांना दोन बायका व नऊ मुले असून राजस्थानच्या मंत्रिमंडळात आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री आहेत. तर ते म्हणाले हे की जास्तीत जास्त मुले जन्माला घाला. देशाचे नेतृत्व मोदींकडे असल्याने ते कुणालाही उपाशी मरू देणार नाहीत व प्रत्येकाला घर बांधून देतील. हा सल्ला देशातल्या प्रत्येकाने प्रमाण मानला तर होणाऱ्या लोकसंख्येच्या विस्फोटाचे काय? मोदींनी लाल किल्ल्यावरून याच विस्फोटावर वाहिलेल्या चिंतेचे काय? हे सारे प्रश्नच गैरलागू हो! देशात आज गॅरंटी कुणाची चालते, मोदींचीच ना! तेव्हा सत्वर कामाला लागणेच उत्तम. जगण्यासाठी आणखी काय हवे? डोक्यावर छप्पर व पोटाला अन्न. त्याची हमी एक जबाबदार (?) मंत्रीच देत असेल तर खुसपटे कशाला काढायची? रोजगाराचे काय असे तरी कशाला विचारायचे? नाहीच मिळाला तो तर आहे की प्रशस्त असा भक्तिमार्ग. हे खराडी संघाची पार्श्वभूमी असलेले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> संविधानभान : पर्यायी जगाचे संकल्पचित्र

हिंदूंची संख्या वाढावी म्हणून जास्त मुले जन्माला घाला या सुदर्शनवादी संस्कारात वाढलेले. योग्य वेळ येताच आपला अजेंडा पुढे रेटायचा या शिकवणीला जागणारे. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनाची सरमिसळ करण्याची आवश्यकताच नाही. मुळात ते शिक्षकी पेशातून आलेले. त्यामुळे समाजाला सल्ले देण्याचा त्यांचा अधिकार साऱ्यांनी मान्य करायला हवा. गेला तो काळ, जेव्हा खायला अन्न नव्हते, राहायला घर नव्हते, सर्वत्र गरिबीच होती. आता रामराज्य अवतरले आहे. देश प्रगतिपथाकडे झेपावत आहे, गरिबी दिसेनाशी झाली आहे. हे सारे घडले ते मोदींमुळे. अशा अनुकूल काळात अधिकची पैदास केली तर त्यात वाईट काय?  म्हणूनच तर त्यांच्या शेजारी असलेले मुख्यमंत्री भजनलाल शर्मा छानसे हसले. अचानक लोकसंख्या वाढल्यावर साऱ्यांना घर देणे शक्य आहे का? सध्या मंद असलेला घरकुल उभारणीचा वेग वाढून वाढून किती वाढणार? यासाठी लागणारा प्रचंड पैसा कुठून आणणार? इतकी मुले जन्माला घातल्यामुळे स्त्रियांचे आरोग्य बिघडेल त्याचे काय? हे सारे प्रश्न फिजूल हो! याची उत्तरे नेतृत्वाच्या गॅरंटीत दडलेली. ते विश्वगुरू आहेत, विष्णूचे अवतार आहेत. त्यामुळे या अतिरिक्त पैदाशीचा कुणालाही त्रास होणार नाही याची खात्री खराडींना आहे. म्हणूनच त्यांचे वक्तव्य गांभीर्यपूर्वक घ्यावे. त्यांचे खाते जरी आदिवासींच्या कल्याणाचे असले तरी ते केवळ एका जमातीचा नाही तर सर्व समाजघटकांचा विचार करतात हेच यातून दिसलेले. त्यामुळे फार विचार न करता स्वीकारा ‘खराडी बायपास’ व न्या देशाची लोकसंख्या १४० हून २८० कोटीवर! यातच तुम्हा आम्हा सर्वांचे भले आहे. शेवटी काय तर ‘मोदी है तो मुमकीन है’ हेच खरे!

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta satire article on rajasthan minister babulal kharadi statement on child birth zws