‘या देशातले तरुण विरोधी पक्षनेत्यांच्या देशविरोधी कारवाया, परिवारवाद, भ्रष्टाचार, खंडणीखोरी व संपत्तीसंचयाला वैतागले आहेत. एक दिवस ते नक्की याविरोधात रस्त्यावर उतरतील’ असे ‘महत्त्वपूर्ण’ विधान करून एका रात्रीत देशभरात प्रसिद्धी पावलेले अतुल भातखळकर जाम खुशीत होते. तेवढ्यात त्यांना पक्षाच्या मुख्यालयातून ‘ताबडतोब या’ असा निरोप मिळाला. आता नक्की काहीतरी चांगले घडेल या आशेने ते तातडीने दिल्लीत दाखल झाले तेव्हा चाणक्य मंडळातील सारेच त्यांची वाट बघत होते. ‘आधी श्रीलंका, मग बांगलादेश व आता नेपाळमध्ये झालेला उद्रेक इथे झाला तर काय, या चिंतेने आम्ही सारेच ग्रस्त होतो. अतुलजी तुम्ही आम्हाला दिशा दाखवली. आता तुमचा मुक्काम इथेच. तुम्ही सुचवलेला उद्रेक जर सफल झाला तर तुमचे मंत्रीपद पक्के’ हे ऐकताच ते आनंदले.

मग बैठक सुरू झाली. ‘सत्ताविरोधी उद्रेकाच्या भीतीच्या सावटाखाली जगण्यापेक्षा आपणच विरोधकांविरुद्ध उद्रेक होईल असे वातावरण येत्या १५ दिवसांत तयार करायचे. या देशाच्या प्रगतीत अडथळे आहेत ते केवळ विरोधकांचे यावरून रान उठवायचे. त्यासाठी सामदामदंडभेद नीतीचा वापर करायचा. देशातले तरुण अस्वस्थ आहेतच फक्त त्यांचे आपल्याकडे असलेले तोंड विरोधकांकडे वळवायचे. प्रचार, प्रसारात आपण अग्रेसर आहोतच. माध्यमेही अंकित आहेत. तेव्हा आता हा उद्रेकाचा धुरळा उठवून द्यायचा. त्यात किती विरोधक नष्ट होतील ते बघू पण अस्वस्थ तरुणांतील असंतोषाची वाफ बाहेर निघेल व पुढची ५० वर्षे या देशात काही होणार नाही.’ प्रमुखांचे हे विचार ऐकताच सर्वांनी टाळ्या वाजवल्या.

जबाबदारीचे वाटप सुरू झाले. त्या राहुलच्या पाठीशी जॉर्ज सोरोस आहे. आपल्या तरुणांच्या पाठीशी अदानी, लोढा उभे राहतील. देशीवाद हे त्याचे सूत्र असेल. विरोधकांच्या परिवारवादाविरुद्ध युवकांना चिथवण्यासाठी पीयूष गोयल, अनुराग ठाकूर, आदिती तटकरे, पंकज सिंग मदत करतील. विरोधकांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध तरुणांना चेतवण्यासाठी अजितदादा, अशोक चव्हाण देशभर फिरतील. यात महाराष्ट्रातील नावे यासाठी की या राज्याने नेहमीच देशाला नवी दिशा (?) देण्याचे काम केले आहे. तेवढ्यात मंडळातील एक ज्येष्ठ म्हणाले. ‘दक्षिणेचे काय? तिकडे आपण कमकुवत व विरोधक शक्तिशाली आहेत.’ यावर बैठकीत शांतता पसरली. मग धाडस करत अतुलजी म्हणाले. ‘आपल्याकडे उत्तरेत तरुणांची मोठी फौज आहे. विशेष गाड्या करून ती दक्षिणेत सोडायची.’ यावर साऱ्यांचे एकमत झाले. ‘हा उद्रेक उत्स्फूर्त आहे, असे चित्र निर्माण करायचे. आपली फूस त्यामागे हे दिसता कामा नये,’ या सूचनेनंतर बैठक संपली.

ठरल्याप्रमाणे सर्वांना निरोप गेले व सर्व जण देशभर फिरू लागले. विरोधकांवर जोरदार हल्ला चढवणारी चिथावणीखोर भाषणे ऐकून तरुण संतप्त होताहेत असे अहवाल मुख्यालयात येऊ लागले तसे चाणक्य मंडळ सुखावले. या संतापाचे उद्रेकात योग्य पद्धतीने रूपांतर व्हावे यासाठी पक्षाचे लाखो कार्यकर्ते साध्या वेशात त्यात घुसवा असा निरोप मिळताच वातावरण तापले. ठरल्याप्रमाणे पहिली निदर्शने वायनाड व अमेठीत झाली. नंतर त्याचे लोण देशभर पसरले. तिसऱ्या दिवशी उद्रेकाचा विरोधकांकडे असलेला रोख अचानक सत्ताधाऱ्यांकडे वळला आणि बघता बघता सत्तास्थळे, सत्ताधाऱ्यांची घरे, नेते तरुणांकडून लक्ष्य होऊ लागली तसे मुख्यालय हादरले. चाणक्य मंडळातले आखणीकार परागंदा झाले. अतुलजी वेशांतर करून कसेबसे मुंबईत पोहोचले. अवघ्या २४ तासांत देशातील परिस्थिती हाताबाहेर गेली. तेव्हाच देशभर एकच नारा घुमला. ‘तरुणांना मूर्ख समजण्याची चूक करू नका.’