‘हे बघा, मनात वाईट हेतू ठेवून प्रश्न विचारू नका. मीही एक सभ्य माणूस आहे. राज्याचा जबाबदार मंत्री आहे. मी जे काही केले ते तार्किकदृष्ट्या योग्य कसे हे ऐकून घ्यायचे असेल तर आता अजिबात प्रश्न नको व काय सांगतो ते निमूटपणे ऐका’ शिरसाटांचा हा रुद्रावतार बघून जमलेले बूमधारी एकदम गारठलेच. आता आली परिस्थिती आपल्या आटोक्यात, हे लक्षात आल्यावर मग ते म्हणाले- ‘शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून गेल्या आठ दिवसांपासून उपोषण करणाऱ्या तरुणाला मी घरी बोलावून सरबत पाजले यात काहीही गैर नाही.

माझ्या या कृतीचे संपूर्ण राज्यभरातून कौतुक होतेय. अनेक मंत्र्यांनी मला फोन करून नवा व चांगला पायंडा पाडला म्हणून धन्यवाद दिलेत. शेवटी आम्ही देणारे आहोत. आंदोलनकर्ते कायम मागणारे असतात. मग तुम्हीच सांगा, कुणी कुणाच्या दारात जायचे? मागणाऱ्यानेच देणाऱ्याच्या ना! हाच सृष्टीचा नियम. अलीकडे कुणीही उपोषणाला बसतो व मंत्र्यांनीच यावे असा हट्ट धरतो. आम्ही हीच कामे करत बसलो तर राज्य कोण चालवणार? मंत्री म्हणून किती व्याप असतात आमच्यामागे याची कल्पना जनतेला सोडा पण तुम्हाला तरी आहे का? (सर्वत्र शांतता) त्या महात्म्यापासून सुरू झालेली ही परंपरा कधी तरी थांबवायला हवी की नाही? त्यामुळेच माझे अभिनंदन करणाऱ्यांत काही उजवेही होते. आता काही जण म्हणतात त्याला तहसीलदार व पोलिसांनी उचलून आणले. हे पूर्णपणे असत्य. अहो, आठ दिवस उपाशी असल्याने त्याच्या अंगात उठण्याचेही बळ नव्हते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याचे बखोटे (सॉरी खांदा) धरले. हे वास्तव असूनही माझ्यावर टीका का करता? हो, आहे मला उचलण्याची सवय पण गोरगरीब जनतेला नाही तर आमदारांना उचलण्याची. मित्रांनो, आम्ही राज्यच असे चालवतो की कुणावर उपाशी राहण्याची वेळच येत नाही.

इतके अस्मानी संकट येऊनही राज्यातली जनता आनंदी आहे. सर्वांनी कशी झोकात दिवाळी साजरी केली ते बघा जरा! अशा वेळी ऐन सणाच्या काळात कुणी मंडप टाकून उपाशी बसला असेल तर ते मंत्री म्हणून मी कसा सहन करणार? व्यग्र कार्यक्रमामुळे त्याच्या मंडपात जायला मला आणखी दोन दिवस लागले असते. तेवढा काळ त्याला पुन्हा उपाशी ठेवायचे? म्हणून मी त्याला उचलून (सॉरी बोलावून) घेतले. मंत्र्यांच्या घरी, थंडगार हवेत उपोषण सोडायला मिळाले म्हणून तो कर्ताही धन्य झाला असेल. त्याकडे लक्ष न देता मंडपात का गेलो नाही म्हणून तुम्ही माझ्यावरच टीका करता. तेव्हा मन फार व्यथित होते. आम्हालाही भावना असतात याचा विचार तुम्ही करणार तरी कधी? मला सांगा, खरी गरज कुणाला असते? उपोषणकर्त्यालाच ना! मग गरजवंताने लहानपण घेत एक पाऊल मागे घेतले तर बिघडले कुठे? आता तुम्ही म्हणाल की ज्यांच्यामागे हजारो लोक असतात, समाज असतो त्यांच्या उपोषण मंडपात तुम्ही कसे जाता? तुमचा प्रश्न रास्त, पण वेळ व काळ बघून निर्णय घ्यावे लागतात. आता मी ही सुरुवात केलेली तेव्हा पुढे बघा राज्यभर असाच पायंडा पडेल. तोही लवकरच. आता प्रश्न नको. दिवाळीचा फराळ घ्या व निवांत निघा.’ जशी कूस बदलली तशी संजयरावांना जाग आली. भानावर आल्यावर त्यांना पडलेले स्वप्न जसेच्या तसे आठवले. सकाळ होताच त्यांनी साहाय्यकांमार्फत माध्यमांना संदेश पाठवला. ‘महत्त्वाची पत्रकार परिषद आहे. लगेच या’!