‘त्या’ महान वक्तव्याबद्दल सुरेश वाडकरांचा जाहीर सत्कार व्हायलाच हवा. तोही दिल्लीत. आणि विश्वगुरूंच्या उपस्थितीत.असे दिव्य ज्ञान प्रसवायला (पाजळायला किंवा बरळायला नाही) तशीच दिव्यदृष्टी लागते. ती वाडकरांमध्ये दिसली त्याबद्दल त्यांचे त्रिवार अभिनंदन! आता ते खरे व अस्सल भारतीय कलावंत शोभतात. नाही तर ते अमेरिकेतील कलावंत. ऊठसूट राष्ट्रप्रमुखावर टीका करत असतात. अडचणीचे प्रश्न नाहक विचारत बसतात. कलावंतांनी कलेच्या माध्यमातून रसिकांना रिझवावे. ते करता करता पदरात काही पाडून घ्यायचे असेल तर जमेल तशी व तेव्हा नेत्यांची (म्हणजे केवळ आणि केवळ विश्वगुरूंची) तारीफ करावी. हीच खरी भारतीय परंपरा. तीही २०१४ नंतर अधिकच वेगात रुजलेली. वाडकर त्याच परंपरेला जागले. त्यामुळे आता त्यांचा पद्माश्रेणीतला वरचा पुरस्कार अगदी पक्का.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : वित्तीय नियोजन कोलमडले

शिर्डीच्या साईनेच विश्वगुरूंना जनकल्याणासाठी पाठवले हा साक्षात्कार नाहीच तर ती महान(?) गायकाची अमृतवाणी आहे. या वाणीला संदर्भही तसा जुना. खूप वर्षापूर्वी याच वाडकरांनी ‘ओंकार स्वरूपा’ गाताना ‘तुज नमो’ म्हटले होते. अनेकांना वाटले ही तर शिव-गणेशाची आळवणी. राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनाही असेच वाटले व त्यांनी खूश होत वांद्र्याचा कोट्यवधीचा भूखंड देऊन टाकला. वाडकरांना या दोन अक्षरांमागचे भवितव्य दिसले असावे तरीही ते ‘कसलेल्या’ कलावंताप्रमाणे तेव्हा शांत बसले. उमद्या व्यक्तिमत्त्वाच्या विलासरावांनी या शांततेचा अर्थ शालीनता असा घेतला व ते वाडकरांना पद्माश्री द्यायला निघाले होते… दैव देणार होते ते कर्मामुळे मिळाले नाही. त्याच वेळी नाशिकच्या जमीन खरेदी प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल असल्याने ते या सन्मानास मुकले. तरीही त्यांनी ‘तुज नमो’ची आराधना सुरूच ठेवली.

हेही वाचा >>> संविधानभान : देशाचा प्राणवायू!

नमन करता करता ते विश्वगुरूपर्यंत केव्हा पोहोचले हे कळायला मार्ग नाही पण आता त्यांचे सुगीचे दिवस सुरू झाले हे मात्र निश्चित. विविध सरकारी सोयीसवलतींमुळे काँग्रेसच्या काळात त्यांच्या गायकीला बहर आला पण अलीकडच्या काळात त्यांनी ‘बेकेट’, ‘बेइमान’ हे नाटक किंवा ‘नमक हराम’ हा चित्रपट बघितल्यामुळे ते १८० अंशाच्या कोनात बदलले असा अर्थ कुणी काढण्याची गरज नाही. रोज ‘अभंग’ म्हणून म्हणून ते देवाच्या समीप गेल्यामुळेच त्यांच्या वाणीतून अमृतोद्गार बाहेर पडले हाच तर्क खरा! जनतेचे विश्वगुरूंवर अपार प्रेम आहे व यापोटी ते त्यांना निवडून देतात हे वास्तव अमान्य करण्याच्या त्यांच्या या वक्तव्याला याच तर्काचा आधार. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून निवडणुका घेण्याची गरज नाही. दिल्लीतील सत्कारानंतर वाडकरांचे देशभरात सत्कार करून हा देवाचा निरोप जनतेपर्यंत पोहोचवला तरी पुरे! त्यासाठी ‘ओंकार स्वरूपा’ वेगवेेगळ्या भाषांमध्ये गायला वाडकर तयार असतीलच. पुरस्कारासाठी मेहनत घेण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. तेव्हा विश्वगुरूप्रेमींनी सत्वर कामाला लागावे व समस्त जनतेला वाडकरांच्या दिव्यत्वाची प्रचीती द्यावी.