हॉलीवूडच्या देखण्या अभिनेत्यांच्या यादीत रॉबर्ट रेडफोर्ड हे नाव बरेच वरचे. क्लार्क गेबल, फ्रँक सिनात्रा, ग्रेगरी पेक, शॉन कॉनरी, मार्लन ब्रँडो, पॉल न्यूमन, टॉम क्रूझ, ब्रॅड पिट, लिओनार्डो डिकॅप्रियो, जॉनी डेप, जॉन हॉलंड अशी नावे चटकन समोर येतात. यांतील मोजक्यांनीच दिग्दर्शनाची वाट चोखाळली आणि त्यांतीलही थोडके वेगळे काही करण्याची इच्छा बाळगणारे आणि तसे करून दाखवणारे ठरले. या बहुपैलू निकषांवर रॉबर्ट रेडफोर्डची बरोबरी कोणाशीच होऊ शकत नाही. तो मुख्य प्रवाहात वावरला नि यशस्वी झाला. पण रमला नाही. ‘वेगळे’ काही करून दाखवण्याची गरजच भासू नये इतकी प्रसिद्धी आणि संपत्ती त्याच्या नावे जमा झाली. तरीदेखील त्याच्या पलीकडे पाहण्याची ‘दृष्टी’ रॉबर्टकडे होती म्हणून तो वेगळा ठरला. सिनेमाच नव्हे, तर उत्तरायुष्यात त्याने पर्यावरण संवर्धनासारख्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. ते कार्य आफ्रिकेतल्या गरीब मुलांच्या उत्कर्षासाठी संयुक्त राष्ट्रांचे सदिच्छादूत म्हणून मिरवण्याइतके कृत्रिम अजिबातच नव्हते. मोठाल्या स्टुडिओंच्या मक्तेदारी आणि परिघाबाहेरील स्वतंत्र चित्रपटनिर्मितीला वाहिलेली ‘इंडि’ चळवळ रेडफोर्डसारख्या मुख्य प्रवाहातील अभिनेत्यांनीही जिवंत ठेवली.
रॉबर्टचे अनेक चित्रपट गाजले. रोमँटिक आणि अॅक्शन अशा दोन्ही प्रकारांमध्ये तो सहजपणे वावरला. ‘बेअरफूट इन द पार्क’, ‘द वे वुई वेअर’, ‘आउट ऑफ आफ्रिका’ अशा चित्रपटांमध्ये त्याचे देखणेपण जेन फोंडा, बार्ब्रा स्ट्रायसँड आणि मेरिल स्ट्रीप अशा वेगवेगळ्या पिढ्यांतील अभिनेत्रींसमोर उठून दिसले. ‘द स्टिंग’, ‘बुच कॅसिडी अँड द सनडान्स किड’, ‘ऑल द प्रेसिडेंट्स मेन’ अशा चित्रपटांमध्ये पॉल न्यूमन, डस्टिन हॉफमन अशा मातब्बरांसमोर त्याच्या अभिनयाची खोलीही दिसून आली. तो रूढार्थाने यशस्वी म्हणण्यापेक्षाही भरवशाचा अधिक होता. त्याला केवळ एक ऑस्कर नामांकन (‘द स्टिंग’) मिळाले आणि तेही त्याच्या कारकीर्दीच्या बऱ्याच आधी १९७३मध्ये. पण केवळ मुख्य प्रवाहातील अस्तित्वावर समाधान न मानता तो दिग्दर्शनाकडे वळला. त्याने नऊ चित्रपट दिग्दर्शित केले, त्यांतील ‘ऑर्डिनरी पीपल’साठी दिग्दर्शनाचे ऑस्करही त्याने जिंकले. त्याचे कोणतेच चित्रपट तिकीटबारीवर गाजले नाहीत, तरी समीक्षकांच्या आणि चोखंदळ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.
रेडफोर्ड निराळा ठरला कारण चित्रपटापलीकडेही त्याने पर्यावरण संवर्धनासारख्या सत्तर-ऐंशी-नव्वदच्या दशकात पूर्णत: बाल्यावस्थेत असलेल्या क्षेत्रामध्ये झोकून दिले. युटा या राज्यामध्ये त्याने जमीन विकत घेतली आणि तेथे त्याने संवर्धनासाठी लढे दिले. युटामधील कोळसाचलित वीजनिर्मिती केंद्राला त्याचा विरोध होता. हॉलीवूडमध्ये विशेषत: बड्या स्टुडिओंच्या मनमानीचा त्याला तिटकारा होता. यातूनच त्याने सनडान्स फिल्म इस्टिट्यूटची स्थापना केला. तेथे स्वतंत्र प्रतिभेच्या पण स्वबळावर चित्रपटनिर्मिती करणाऱ्यांसाठी सनडान्स चित्रपट महोत्सव सुरू केला. क्वेंटिन टॅरेंटिनो, स्टीव्हन सॉडरबर्ग, गाय रिची यांसारखे आजचे यशस्वी दिग्दर्शक याच महोत्सवाच्या माध्यमातून नावारूपाला आले.
देखणे व्यक्तिमत्त्व, सहजसुंदर अभिनय या भांडवलावर रेडफोर्डला तो होता त्यापेक्षाही अधिक यशस्वी होता आले असते. त्याला ‘आयकॉन’ बनवण्याची हॉलीवूडची तयारी होती, पण रॉबर्टने मनापासून तो मुख्य प्रवाह कधीही फारसा स्वीकारला नाही. चित्रपट कारकीर्द बहरात येण्याआधी त्याची सनडान्स इस्टिट्यूट उभी राहिली. तेलदांडग्या अमेरिकी वर्चस्ववादाच्या संस्कृतीत त्याने पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष दिले. त्याची लोकप्रियता तुफान होती. त्यालाही याची कल्पना होती. पण म्हातारा होत असतानाही तारुण्याची पुटे चेहऱ्यावर चढवून आहे त्यापेक्षा २० वर्षांनी तरुण दिसण्याचा खटाटोप रॉबर्ट रेडफोर्डने कधी केला नाही. नुकताच वयाच्या ८९व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला, तो ‘देखणा अभिनेता’ या बिरुदापेक्षा अधिक काही कमावूनच!