एखाद्याच्या निधनानंतर चित्रवाणी वृत्तवाहिन्या, समाजमाध्यमे, इंटरनेट-आधारित वृत्तलेख वा मल्लिनाथी-सेवा, हे सारे मिळून आताशा असा काही हलकल्लोळ करतात की, गेलेली व्यक्ती हीच जणू तिच्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ असावी, असा संभ्रम बाकीच्यांचा होतो. त्यातच राजकीय उच्चपदस्थांच्या आदरांजलीत ओलावा असो/नसो पण आकर्षक शब्दरचना हमखास. त्याने तर हा संभ्रम वाढतोच. अधिकृत ‘तेलंगणा गीत’ रचणारे अंदे श्री यांचे रविवारी (९ नोव्हेंबर) रात्री हृदयविकाराने निधन झाल्यानंतर, त्यांच्याखेरीज कुणी कविश्रेष्ठ तेलंगणाच्या भूमीवर निपजलाच नसल्यासारखे वार्तांकन होऊ लागले. त्याला भेदून या – किंवा खरे तर कुणाही- कवीकडे पाहिले तर अधिक चांगले!
‘जय जयहे तेलंगणा जननी जयकेतनम् ’ हे त्यांनी रचलेले गाणे तेलंगण राज्याने अधिकृत राज्य-गीत घोषित केले. मग त्यांच्याकडे राज्याचेच नव्हे तर एकंदर ‘मीडिया’चेही लक्ष वेधले गेले. पण या गीताची अशी ‘हवा’ होत असतानाही अंदे श्री ऊर्फ अंदे येल्लण्णा हे जमिनीवरच होते. ‘गाणे मी लिहिले… ते लोकांच्या ओठांवर आले, त्याच क्षणी ते लोकांचे झाले. आता माझे काय कौतुक करता?’ अशी या कवीची प्रतिक्रिया; मराठीतले ‘बाई मी धरण बांधते’ या गाण्याला ‘लोकगीत’ म्हणण्यात येते म्हणून सुखावणारे त्या गीताचे कर्ते- दिवंगत साहित्यिक दया पवार- यांनी जपलेल्या साधेपणाची आठवण देणारी ठरते.
साधेपणाचे हे मूल्य अंदे श्री यांनाही महत्त्वाचे वाटण्याची लौकिकार्थाने प्रमुख कारणे दोन. एकतर, लहानपणीच त्यांना आलेले अनाथपण आणि मग कुणा-कुणाकडे झालेला त्यांचा सांभाळ, शिक्षणाची आबाळ असूनही शब्दांचे-अर्थांचे आणि भाषेचे त्यांना असलेले प्रेम आणि स्वत्व जपण्यासाठी शब्दांशिवाय कोणतेही साधनच आपल्याकडे नसल्याची जाणीव! दुसरे त्याहीपेक्षा ठाशीव कारण म्हणजे तेलंगणा चळवळीतला त्यांचा प्रत्यक्ष सहभाग. या चळवळीची आदली पिढी कालोजी नारायण राव यांनी घडवली ( तेलंगण राज्यनिर्मितीनंतर लगेच स्थापन झालेल्या आरोग्य विद्यापीठाला कालोजी नारायण राव या कवीचे नाव देण्यात आले आहे. महाराष्ट्रातही असे विद्यापीठ आहे आणि तेही कुसुमाग्रजांच्या नाशकात; पण कालिदासाखेरीज कोणत्याही कवीचे नाव महाराष्ट्रातल्या विद्यापीठास नाही). या कालोजींच्या पुढल्या पिढीची दोन प्रमुख पाती- एक लोककवी गदर यांची जहाल; तर अंदे श्री किंवा आता तेलंगणात आमदार असलेले गोरेटी व्यंकण्णा यांच्यासारखे मवाळ. या मवाळ पातीत चित्रपट दिग्दर्शकही होते आणि चळवळीतले कवी चित्रपटांसाठीही गाणी लिहू लागले होते. त्यापैकी अंदे श्री हे पोटापाण्यासाठी बांधकामांवर मजुरीही करावी लागलेले, थेट लोकांमधून घडलेले कवी. साध्यासुध्या माणसांना त्यांची गाणी भिडली. उन्नत-उदात्त कल्पनांना त्यांनी लोकांच्या भाषेत आणले. चळवळीच्या अनेक गाण्यांपैकी ‘जयहे तेलंगणा’ गाजले. पण पहिले पुस्तक पन्नाशीनंतर निघाले.
तोवर एक कोटी रुपयांचा खास पुरस्कार तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिला होता, त्यातून ‘जगातल्या सर्व मोठ्या नद्या पाहायच्या’ या अंदे श्री यांच्या संकल्पाला बळच मिळाले. अमेरिकेतल्या तेलुगूभाषकांनी तिथे बोलावून त्यांना पुरस्कार दिला होता. नाईल, काँगो, अॅमेझॉनच्या काठी भटकंती करणाऱ्या या ६६ वर्षांच्या कवीने राष्ट्रीय पुरस्काराऐवजी लोकांचे प्रेम अधिक कमावले होते.
