निसर्गाच्या सान्निध्यात वाढलेल्या माणसांना त्यांच्या कोणत्याही समस्या सोडवण्याचे मार्ग निसर्गच शोधून देत असेल का? पद्माश्री सालुमरदा थिमक्कांचा प्रवास पाहताना हा विचार डोकावतो. थिमक्कांचे नुकतेच ११४ व्या वर्षी निधन झाले. शाळेची पायरीही न चढलेल्या या ‘वृक्षमाते’ने सहज लावलेल्या झाडांनी वाटसरूंना सावली तर दिलीच, पण अनेकांसाठी त्या प्रेरणाही ठरल्या आहेत.
कर्नाटकातील गुब्बी तालुक्यात सहा भावंडे आणि घरची गरिबी अशा वातावरणात थिमक्का वाढल्या. शिक्षण वगैरे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. शेतातले तण काढणे, जे काही पिकेल ते बाजारात नेऊन विकणे, शेळ्या राखणे अशी कामे करावी लागत. १५-१६ वर्षांच्या असताना रामनगर जिल्ह्यातील हुलिकल गावात राहणाऱ्या बिक्कल चिक्कय्यांशी त्यांचा विवाह झाला. ठिकाण बदलले, पण कामे तीच. पुढे आयुष्यात एकच बदल झाला, तो म्हणजे एरवी केवळ गरिबीशी सामना करावा लागत होता, आता अपत्य होत नाही म्हणून तुच्छतादर्शक नजराही झेलणे भाग पडू लागले. विवाहाला २० वर्षे झाली तरी मूल काही झाले नाही.
पुढे कधी तरी हुलिकल ते कुदुरदरम्यान चार किमी रस्त्याचे बांधकाम सुरू झाले. आपल्या व्यथेचा विसर पडावा म्हणून हे दाम्पत्य या रस्त्यालगत वडाची रोपटी लावू लागले. १९९१ मध्ये बिक्कल चिक्कय्यांचे निधन झाले आणि थिमक्का एकट्या पडल्या. मात्र वृक्षारोपणात खंड पडू दिला नाही. कित्येक वर्षे त्यांच्या या कामाकडे कोणाचेही लक्ष गेले नव्हते. पुढे कोणी लोकप्रतिनिधी हुलिकलमधून जात असताना अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याने वाटेत आपला ताफा थांबवला आणि गाडीबाहेर पडला. रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या वटवृक्षांची सावली पाहून त्याला हे काम कोणी केले असावे, याविषयी कुतूहल वाटले. थिमक्कांविषयी कळताच त्याने त्यांची भेट घेतली. थिमक्कांचे काम प्रकाशात आले ते अशा योगायोगातून.
थिमक्कांना १९९७ मध्ये ‘इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. पुढे कर्नाटक राज्य सरकार आणि देशविदेशांतील विविध संस्थांनी थिमक्कांच्या कार्याचा गौरव केला. २०१६ साली ‘बीबीसी’च्या प्रभावशाली आणि प्रेरणादायी १०० महिलांच्या यादीत थिमक्कांच्या नावाचा समावेश करण्यात आला. २०१९ साली त्यांना पद्माश्रीने सन्मानित करण्यात आले.
साधारण २०१९च्या सुमारास बागेपल्ली- हालागुरू मार्गाच्या रुंदीकरणात थिमक्कांनी वाढवलेल्या वडांवर कुऱ्हाड चालवली जाण्याची शक्यता निर्माण झाली होती, मात्र त्यांनी झटपट पावले उचलली. तत्कालीन मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामींना या प्रकल्पाचा फेरविचार करण्याची विनंती केली. कर्नाटक सरकारनेही ७० वर्षे वाढवलेली झाडे राखण्याच्या दृष्टकोनातून पर्यायी मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला. या प्रवासात थिमक्कांची भेट त्यांच्यासारख्याच पण शाळकरी वयाच्या मुलाशी- उमेश वनसरीशी झाली. पुढे उमेशने थिमक्कांची स्वत:च्या आईप्रमाणे काळजी घेतली. त्यानेही आजवर हजार वृक्षांची लागवड केली असून तो ‘पृथ्वी बचाओ अभियान’ही राबवतो.
औपचारिक शिक्षण न घेतलेल्या सालुमरदा थिमक्का (वृक्षांच्या रांगेला कन्नडमध्ये सालुमरदा म्हटले जाते) अनेकांना पर्यावरणाचे धडे देऊन गेल्या. त्या गेल्या असल्या, तरी त्यांनी वाढवलेल्या वडांच्या रूपाने त्यांची सावली कायम राहील आणि तिचे कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.
