साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. सुधीर रसाळ यांनी तत्कालीन औरंगाबाद आकाशवाणी केंद्रासाठी ३ फेब्रुवारी, १९८५ रोजी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची एक मुलाखत ध्वनिमुद्रित केली होती. अर्ध्या तासाची ही मुलाखत नंतर प्रक्षेपित झाली. या मुलाखतीचा पूर्वार्ध व्यक्तिकेंद्रित असून, उत्तरार्ध मात्र वैचारिक आहे. उत्तरार्धाचाच इथे विचार करण्यात येत आहे.
भारतीय तत्त्वज्ञान परंपरेचे नवे मूल्यमापन केले पाहिजे का? तत्त्वज्ञान हवे; पण बदलत्या यंत्र-तंत्र युगातील नवे प्रश्न केवळ आध्यात्मिकतेने सुटणार नाहीत, त्यास आधिभौतिकाची जोड नको का द्यायला? या प्रश्नांची उत्तरे देत तर्कतीर्थांनी विशद केले आहे की, मूल्यमापन करीत असताना याचा विचार व्हायला हवा की, प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये विचारस्वातंत्र्य पूर्वापर आढळून येते. ते मूल्य म्हणून विस्तारित संस्कृतीत यायला हवे. विचार स्वातंत्र्य व नैतिक समानता भारतीय संस्कृती व तत्त्वज्ञानातील मूळ गाभा आहे. तो जपला पाहिजे.
बदलते जग विज्ञानप्रणीत जीवनप्रणाली घेऊन विकसित होत आहे. प्राचीन भारतातील ज्ञान परंपरा आणि तत्त्वज्ञान यांचे पुनरुज्जीवन करायचे तर ही नवी क्षमता त्यात आहे का, हे पाहिले पाहिजे. जुने विचार कालबाधित असतात; परंतु त्यात काहीतरी अबाधित असते. याचा शोध घ्यायला हवा. सर्व धर्म, संस्कृती या अशा अबाधित तत्त्वांमुळे एकमेकांना प्रभावित करीत विकसित होत असतात. ‘बायबल’, ‘भगवद्गीता’, ‘शाकुंतल’ यांतून कालिदास, गटे यांना जो विस्मयानंद मिळाला तो संवाद परंपरेतून लाभला होता. मानवी इतिहासातील जी प्रगती आहे, ती नव्या प्रागतिक विचार स्वीकृतीतून निर्माण झाली आहे. मागील परंपरेतून माणसाने काही मिळविले आहे, म्हणून तो पुढे जात आहे. वरच्या पायरीवर जाण्यातून प्रगती होते. आज तंत्रज्ञान अनुकरणक्षम होत आहे.
आधिभौतिक संस्कृती आणि तंत्रज्ञानाची जी क्रांती झालेली आहे, त्यामुळे जग जवळ आले आहे. एका आधुनिक दळणवळण शास्त्रज्ञाने म्हटलेले आहे की, ‘ह्युमॅनिटी लिव्हज् इन अ ग्लोबल व्हिलेज.’ मानवजात एका जागतिक खेड्यात राहत आहे. ते जग जवळ आले आहे. आधिभौतिक संस्कृती आणि आध्यात्मिक संस्कृती यांच्यामधील जो अंतर्विरोध आहे, तो वस्तुस्थितीतूनच आलेला आहे आणि मनुष्य हा भौतिक पिंडाच्या पलीकडे जाऊन अशा अंतिम चैतन्याकडे जात आहे. हे जे चैतन्य आहे, त्याचे स्वरूप वाणी आणि मनाच्या पलीकडे आहे; पण त्याचा परिणाम मनुष्यावर होतो.
हा परिणाम पश्चिमी जगातील मनुष्यावरही होतो. कारण, तिथेही धर्मपरंपरा आहे. तिथे ख्रिाश्चन धर्माचा जो पगडा आहे, तो विलक्षण आहे. तो आजही दिसतो. ती जी तिथली परंपरा आहे, ती पाहिली की असे म्हणता येत नाही की, भारतीय आध्यात्मिक आहेत नि पाश्चात्त्य आधिभौतिक. आमचा भौतिकवाद आहे तो आहेच. कारण, आम्ही शेती करीत होतो. आमचे रहाटगाडगे होते. आमचा चरखा होता. आमच्याकडे काही आयुर्वेद, वास्तुशास्त्रासारख्या विद्या होत्या. म्हणजे त्या भौतिक विद्याच होत्या. या विद्या पुढे गेल्या आहेत. तंत्रज्ञानाशिवाय मनुष्य कुठेच जगू शकत नाही. मध्ययुगातही तंत्र होते. तंत्रज्ञान प्राचीन युगातही होते. लोखंडाशिवाय त्या काळी मनुष्यास जगता येत नव्हते. लोखंड वापरून माणसाने धाव बनविली. तंत्रज्ञानाशिवाय मनुष्य जगू शकत नाही. मग तो भारतीय असो वा अभारतीय. पाश्चिमात्य तंत्रज्ञान हे पुढे गेलेले आहे. तिथे आपण जात आहोत. कारण, प्रगतीची ओढ ही केवळ मनुष्यजातीतच आहे. नुसत्या भारतीयांत ती नाही. आध्यात्मिक दृष्टिकोन हा मानवी दृष्टिकोन आहे. एवढेच आहे की, त्यामध्ये ज्या विसंगती आहेत, त्या काढल्या पाहिजेत. मनुष्यजातीचे हे पृथ्वी नावाचे जे खेडे आहे, ते इतके लहान आहे की, इथे मनुष्यजातीला जगायचे झाल्यास अध्यात्माचा म्हणजे ‘सर्वभूती समानत्वा’चा एकात्म दृष्टिकोन सर्वाठायी आपल्या नैतिक जीवनात पाहिजे. तंत्रज्ञान त्याच्याशी विसंगत नाही. देह आहे, देहास तंत्रज्ञान पाहिजे. तर्कतीर्थांचे हे विचार त्यांना आधुनिक चिंतक बनवितात.
डॉ. सुनीलकुमार लवटे
drsklawate@gmail.com