राजेश बोबडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘मानव समाजात घनघोर अज्ञान पसरले असल्यामुळे कोणत्याही मौलिक गोष्टीची सहजपणे विकृती होत गेली आहे. त्याचप्रमाणे अज्ञानमूलक समजुती व कल्पनाही रूढ झाल्या आहेत. मोठी माणसे व देवादिकांच्या व्याख्याही तशाच लोकांनी अगदीच विचित्र करून ठेवल्या आहेत. जो नाश करेल किंवा फारच भयंकर स्वरूपाचा असेल अशा प्राण्याला किंवा वस्तूला देव मानून त्याची पूजा-अर्चा सुरू करण्यात आली. सर्प फण्यानी डंख मारतो म्हणून देव, वाघोबा आपल्या भयंकर ताकतीने व नखांनी फाडून खातो म्हणून देव, विंचू टोला मारतो म्हणून देव, म्हसोबाचे स्वरूप भयंकर भीतिदायक असते म्हणून देव.’’

‘‘देवाची व्याख्या जशी अपूर्ण व विद्रूप आहे तशीच मोठय़ा माणसांची व्याख्याही अपूर्ण आहे. जो दबाव टाकून काम करवून घेऊ शकतो, गुंडगिरी, चालबाजी, चहाडय़ा करून, पैसे लुबाडतो, लाच देऊन अधिकाऱ्यांना हाताशी बाळगतो व इमानदार माणसाला कधीच पुढे येऊ देत नाही,  मुंगीला साखर, आंधळय़ाला भाकर, आपले वजन कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो त्यालाच लोक मोठा माणूस म्हणतात. या विकृतीमुळे समाज उन्नत करण्याच्या मार्गात फार मोठा अडथळा निर्माण झाला आहे.’’

‘‘वास्तविक मोठेपणाच्या मागे एक कसोटी असावी लागते. त्यागाची व्यापक भावना, जनकल्याणाची कळकळ व न्याय मिळवून देण्याकरिता लागणारी निर्भयता या कसोटीवर मोठेपणा तपासला गेला पाहिजे. ज्यांनी आपल्या गावातील लोक मोठे केले आहेत, कलाउद्योग निर्माण करून त्यांची घरे, शाळा, रस्ते, शेती, विहिरी इ. अत्यंत सुंदर बनवून त्यांचे जीवन उन्नत व लायक केले आहे व जाती-पातीचे भेद मिटवून लोकांत एकता व चैतन्य निर्माण केले आहे, त्या व्यक्ती खऱ्या अर्थाने थोर आहेत. ज्यांनी ग्रामकुटुंब निर्माण केले आहे, स्वत:ला ग्रामाहून वेगळे लेखले नाही-विषमता ठेवली नाही, ज्यांचे मन ग्रामाबद्दल आपल्या शरीरा एवढेच निकटचे आहे व त्याकरिता शुद्ध साधनाने प्रयत्न करून ज्यांनी देह राबवला आहे, ज्याचे जीवन अत्यंत उज्ज्वल, चारित्र्यवान, लोक-संग्रही आहे, अन्याय करणाऱ्यावर ज्यांची सतत करडी नजर आहे, अशाच व्यक्ती महान म्हणविण्यास लायक असतात. अशाच व्यक्तींना मोठेपणा दिल्याने ग्राम-सुधार होऊ शकेल. नाहीतर उगीच लोक शंकाखोर, भित्रे, आळशी व निंदक बनतील. त्यांच्यातील सद्गुणांचा विकास होणार नाही, ही गोष्ट निश्चित व अटल आहे. परंतु गावात ही एकता व चैतन्य कोण निर्माण करणार?’’ असा प्रश्न महाराज विचारतात. ओढूनताणून मोठेपणा मिळविण्याच्या माणसाच्या अंगात मुरलेल्या विकृतीबद्दल ग्रामगीतेत महाराज म्हणतात-

आपणा सर्वत्र मान मिळावा।

धनाचाहि संग्रह व्हावा।

आणि जरा ताणहि न लागावा।

ऐसा व्यापार हवा त्यांसि॥

त्यांपासोनि ग्राम वाचवावे।

खरे सात्त्विकपण गावी भरावे।

सरळपणासाठीच प्रयत्न करावे।

सुधारकांनी॥ 

rajesh772@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashtrasant tukdoji maharaj information rashtrasant tukdoji maharaj thoughts zws