राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘सांप्रदायिक बुवांच्या निष्क्रिय ज्ञानाबद्दल जर कुणी एखाद्या बुवास प्रश्न केला तर ते म्हणतात ‘बेटा! आता कलियुग आहे. देवाच्या मनातच असे करावयाचे आहे. आमचे काय? जेव्हा तशी बुद्धी देव आम्हाला देईल तेव्हा आम्हीही आपापले धर्मग्रंथ घेऊन समाजात कार्य करू. तोपर्यंत हे आमचेच आमच्याने सांभाळले जात नाही!’ मी म्हणतो, असेच जर लोकांनी म्हटले की, ‘आम्हालाही देव जेव्हा पाप सोडावयास सांगतील तेव्हाच आम्ही सोडू. एरवी त्याची आज्ञा म्हणूनच आम्हीही बुवालोकांची झाडाझडती घेणार व त्यांना धर्माचे सत्कार्य केल्याशिवाय भोजन देणार नाही, दक्षिणाही देणार नाही व गावातही राहू देणार नाही,’ तर बुवांच्या मखलाशीचा अर्थ त्यांचेवरच उलटेल.’’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराज म्हणतात, ‘‘देव का कुणाला असे सांगतो की, तुम्ही तुमची सत्कर्माची नोकरी सोडून द्या म्हणून. असा पुरावा कोठे आहे की ‘उचित कालातच साधुसंतांनी कामे केली आहेत व अनुचित काळात ते दडी मारून बसले होते!’ जेव्हा जेव्हा समाजाची पडती कमान पाहिली तेव्हा तेव्हा त्यांनी प्राणाचीही पर्वा न करता ‘जे खळांची व्यंकटी सांडो। तया सत्कर्मी रती वाढो।। भूतां परस्परे जडो। मैत्र जीवांचे।।’ या भावनेने प्रेरित होऊन सदैव मनुष्यधर्माच्या नात्याने उज्ज्वल कार्य करून दाखविलेच आहे ना? मग आजच्या या सर्व बुवालोकांना मग ते कोणत्याही धर्माचे का असेना, त्यांना हे ज्ञान का आठवू नये? यावर ते म्हणतील ‘तर मग काय हो! आम्ही काही करीतच नाही काय? स्वस्थच बसलो आहोत काय? होईल हळूहळू! एकदम तूप खाऊन रूप थोडंच दिसतं!’ मी म्हणेन, पहिलवानांच्या आखाडय़ातला नवखा पहिलवान कितीही गबाळ असला तरी एका महिन्यातच दंडबैठका मारून चमक दाखवू लागतो. तेव्हा ‘संतांच्या सत्य बोधाने दुर्बलही बलवान होतात, नामधारीही कामधारी व टाळकरीही वारकरी होतात’ या म्हणण्यास काही अर्थ असेल की नाही? आणि असे जर तुमच्यात काहीच वैशिष्टय़ नसेल, तर तुम्ही लोकांच्या डोक्यावर बसून आपला उदरनिर्वाह तरी का करावा? आणि लोकांनी तरी तुम्हाला मार्गदर्शक का म्हणावे?’’

महाराज म्हणतात, ‘‘माझे हे लहान तोंडी मोठा घास घेणे जरी मला दिसत असले, तरी आजच्या या धर्मधुरीण म्हणविणाऱ्या नि धर्माचा उपदेश करणाऱ्या लोकांकडे पाहिल्यावर मला त्यांच्या शापाची व त्यांच्या तापाची मुळीच पर्वा वाटत नाही. मी एक साधू-सेवक आहे, नव्हे साधूंच्या सेवकांचा सेवक आहे. माझा असा विश्वास आहे की, हे सर्व बुवालोक अजूनही बुवावृत्तीच्या सत्यतत्त्वाप्रमाणे एक होऊन जर थोडा काळ समाजाकडे कूर्मदृष्टीने पाहतील, तर त्याला उज्ज्वल करतील. नव्हे त्याचा इतिहास दिव्य होऊन लोकांना त्यांच्या सर्व सुखाचे धनी करतील. पण दुर्भाग्याने जर त्यांच्यातीलच मतभेदाचा आणि संप्रदायाच्या अभिमानी वृत्तीचा नाश होत नसेल, तर समाजाचे सुख पाहण्याची संधी त्यांना मिळणार तरी कशी?’’

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashtrasant tukdoji maharaj says about the passive knowledge of scriptures sectarianism amy