दक्षिणेतील अनेक क्रिकेटपटूंप्रमाणेच रविचंद्रन अश्विन हा खेळाकडे वळला नसता, तर अभियंता बनला असता! सरळमार्गाचे संस्कार आणि अभ्यासू वृत्ती या गुणद्वयीचा एक दुष्परिणामही असतो. अशा मंडळींमधून प्रतिस्पर्ध्याला ‘भिडणारे’ क्रिकेटपटू अभावानेच निर्माण होतात, असे बोलले जाते. मात्र अश्विन हा अभ्यासू क्रिकेटपटू, उत्तम फिरकीपटू असला, तरी त्याच्या वृत्तीत वेगवान गोलंदाजाचा आक्रमकपणा ठासून भरलेला आहे. ‘भिडण्या’च्या बाबतीत बोलायचे, तर त्याने एका दौऱ्यात साक्षात ऑस्ट्रेलियनांना त्यांचेच पाणी पाजून दाखवले होते. समाजमाध्यमांवरून प्रकट होणाऱ्या मोजक्या(च) विचारी क्रिकेटपटूंमध्ये त्याचे स्थान वरचे. स्वत:वर अनेकदा झालेल्या अन्यायाकडे दयाबुद्धी आणि विनोदबुद्धीच्या नजरेतून पाहणाऱ्या परिपक्व खेळाडूंमध्ये त्याचे स्थान बहुधा सर्वांत वरचे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> संविधानभान : देशाचा प्राणवायू!

अश्विनने नुकताच कसोटी क्रिकेटमध्ये ५०० बळींचा टप्पा ओलांडला. असा पराक्रम करणारा तो जगात नववा आणि दुसराच भारतीय गोलंदाज. भारताला उत्तम फिरकी गोलंदाजांची परंपरा आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संघात स्थान मिळवणे, ते टिकवणे अधिकच आव्हानात्मक ठरते. ऑफस्पिनर अश्विनने या प्रत्येक टप्प्यावर हुन्नर दाखवले. पारंपरिक ऑफस्पिनच्या जोडीला अनेक प्रयोग करण्याची हिंमत दाखवली. त्याबद्दल त्याच्यावर अनेकदा टीकाही झाली. परंतु अभ्यासू अश्विनने या टीकेचा फार विचार केला नाही. त्याचा ५००वा बळी परवा राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध नोंदवला गेला. आता रांचीमध्ये सामना जिंकून भारतीय संघाने मायदेशात सलग १७वा कसोटी मालिका विजय नोंदवला. ही विजय मालिका २०१२नंतर अव्याहत सुरू आहे. अश्विनने २०११मध्ये कसोटी पदार्पण केले. त्यामुळे या विजयगाथेचा अश्विन केवळ साक्षीदार नव्हे, तर शिल्पकारही ठरतो. कसोटी पदार्पणापूर्वीच अश्विनने आयपीएलमध्ये चमक दाखविली होती. चेन्नई सुपरकिंग्जकडे त्यावेळी मुथय्या मुरलीधरनसारखा निष्णात गोलंदाज होता. तो नवा चेंडू वापरण्याविषयी उत्सुक नव्हता. त्यामुळे ती जबाबदारी युवा अश्विनवर सोपवण्यात आली. त्या संधीचे अश्विनने सोने केले. तो काळ अनिल कुंबळेच्या निवृत्तीचा आणि हरभजन सिंगच्या उतरणीचा होता. या दोहोंपश्चात भारतीय फिरकी गोलंदाजीची धुरा बराच काळ अश्विनने सांभाळली. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चमक दाखवणारा अश्विन पुढे कसोटी क्रिकेटमध्ये रुळला. निव्वळ गोलंदाजी न करता, बऱ्यापैकी उपयुक्त फलंदाजी करणारा अश्विन ५०० बळी आणि ५ कसोटी शतके नोंदवणाऱ्या दुर्मिळातील दुर्मीळ क्रिकेटपटूंपैकी एक. अनेकदा संघाबाहेर राहूनही अश्विन खचला नाही आणि फिरकी चिंतनालाही त्याने कधी अंतर दिले नाही. त्याच्या यशस्वी आणि प्रदीर्घ कारकीर्दीचे हेही एक कारण.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravichandran ashwin profile ravichandran ashwin personality zws