– डॉ. सुहास कुलकर्णी

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात जगभरात मलेरियाने थैमान घातले होते. अशा परिस्थितीत रोनाल्ड रॉस यांनी डासांच्या माध्यमातून मलेरियाचा प्रसार कसा होतो, हे शोधून काढून मलेरियावरील उपचारांचा मार्ग मोकळा केला.

रोनाल्ड रॉस यांचा जन्म १३ मे १८५७ रोजी भारतात उत्तराखंडातील अल्मोरा येथे झाला. त्यांचे उच्च शिक्षण इंग्लंड येथील रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स येथे झाले. तिथे त्यांनी जिवाणूशास्त्र आणि सार्वजनिक आरोग्य या विषयातील पदवी संपादन केली. भारतात उटीजवळील सिंगूरघाट येथे वैद्याकीय सेवेत कार्यरत असताना त्यांना मलेरिया झाला व त्यांच्या संशोधनाला चालना मिळाली.

मलेरियाच्या संशोधनासाठी लागणारे डास पकडण्यासाठी त्यांना किशोरी मोहन बंडोपाध्याय या भारतीय शास्त्रज्ञाची मदत झाली. रोनाल्ड रॉस यांना असे आढळून आले की, करड्या रंगाच्या डासांनी चावल्यामुळे कबुतर, चिमणी अशा पक्ष्यांना मलेरिया होतो, तर तपकिरी रंगाच्या ठिपकेदार पंख असलेल्या डासांमुळे माणसामध्ये मलेरिया होतो, मात्र पक्ष्यांना होत नाही. त्यांनी काही निरोगी चिमण्या एका मच्छरदाणीच्या जाळीत ठेवल्या. या चिमण्यांना डास न चावल्यामुळे मलेरियाची लागण झाली नाही. जुलै १८९८मध्ये त्यांनी डासांचे डोके, प्रामुख्याने मानेचा भाग सूक्ष्मदर्शकाखाली बारकाईने बघितला आणि त्यांना तेथे धाग्यासारखे अनेक परजीवी दिसले. याचेच पुढे स्पोरोझोइटस असे नामकरण केले गेले. मानेच्या वरच्या भागात एका लाळेच्या ग्रंथीत ते सामावलेले होते.

८ जुलै १८९८ रोजी त्यांनी असा सिद्धांत मांडला की, मलेरियाचे परजीवी जंतू हे डासाने पक्ष्याला चावा घेतल्यावर सोंडेतून लाळेवाटे त्या पक्ष्याच्या रक्तात प्रवेश करतात. मलेरियाच्या परजीवी जंतूचे दुहेरी जीवनचक्र (अर्धे डासाच्या रक्तात आणि अर्धे पक्षी/मानवाच्या रक्तात) त्यांनी सर्वप्रथम विशद केले. तेव्हापासून मच्छरदाणीचा वापर सुरू झाला.

१६ ऑगस्ट १८९८ रोजी हुसेन खान या मलेरिया झालेल्या रुग्णाचे रक्त त्यांनी डासांना शोषू दिले. २४ तासांनंतर त्यातील एका डासाच्या शरीर विच्छेदनात काहीच आढळून आले नाही. परंतु पुढे तीन दिवसांनी डासाच्या पोटात १२ मायक्रॉन व्यासाच्या गोलाकार पेशी त्यांना आढळल्या. त्या पेशींचे त्यांनी निरीक्षण केले. त्यांना पुढे ‘उसाइट्स’ असे संबोधले गेले.

रोनाल्ड रॉस यांनी ‘प्रिव्हेन्शन ऑफ मलेरिया’ हा ग्रंथ लिहून जनजागृती केली. यांच्या मलेरियावरील महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल त्यांना १९०२ सालचे शरीरशास्त्र व वैद्याक या विभागातले नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. १९११ साली त्यांना ‘सर’ या किताबाने गौरविण्यात आले. १६ सप्टेंबर १९३२ रोजी त्यांचे निधन झाले.

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org