भरतशेठ गोगावले – माझी नक्कल करता काय? आता दाखवतोच यांना रुमालाची ताकद! ‘एक रुमाल तटकरे बेहाल’ अशी अवस्था नाही करून ठेवली तर नावाचा भरतशेठ नाही. सतत सत्तेत राहण्यासाठी धडपडणाऱ्यांना व त्यासाठी पक्ष फोडणाऱ्यांना सामान्यांचे अश्रू व घाम टिपणाऱ्या रुमालाचे महत्त्व काय कळणार? आता अलिबागेत हाफकिनच्या धर्तीवर ‘नॅपकिन इन्स्टिट्यूट’ची स्थापनाच करतो. हजारो लोकांना त्यात रोजगार देतो. तसेही रोजगार देणारे खाते आपल्याकडे आहेच. यातून इतके उत्पादन करीन की साऱ्या जिल्हाभर प्रत्येकाच्या खांद्यावर रुमालच दिसतील. वैतागलेच पाहिजेत हे कथित नेते. आता कोकण नाही पण निदान रायगडची ओळख तरी हापूसऐवजी रुमालवाला जिल्हा अशीच निर्माण करायची. यापुढे प्रत्येक कार्यक्रमात पक्षाच्या झेंड्यावर खर्च कमी व रुमालावर जास्त हेच धोरण.

हे साधे कापडी फडके नाही तर येथील दमट वातावरणात अपार कष्ट करून पोट भरणाऱ्या कष्टकऱ्यांच्या समाधानाचे प्रतीक आहे. त्याचाच अपमान केला यांनी. आता धडा शिकवायचाच. शिवसैनिकांना सांगून यांच्या घरापुढे रुमालाचे तोरणच बांधायला लावतो. तिथेच एका मोठ्या फलकावर ‘कितीही करू दे शत्रुत्व, नाही काही वांधा. त्यांच्या घराभोवती रुमालाचे तोरण बांधा’ असा मजकूर मोठ्या अक्षरांत लिहायला सांगतो. इतके अस्वस्थ व्हायला हवेत की खिशात रुमाल ठेवण्याची भीती वाटली पाहिजे. हाडाच्या शिवसैनिकाला अंगावर घेणे किती महागात पडू शकते याची जाणीव आठ दिवसांत नाही करून दिली, तर नावाचा भरत नाही. रुमाल हा विजय साजरा करण्याचे, आनंद व्यक्त करण्याचे प्रतीक हेही यांना ठाऊक नाही व चालले नक्कल करायला…

सुनील तटकरे – स्वत:ला शेठ म्हणवून घेणाऱ्यांना मिरची झोंबलेली दिसते. आता तर फक्त नक्कल केली. रुमालाचे तोटे सांगितलेच नाहीत अजून. गोष्टी कष्टकऱ्यांच्या करतात व त्याच फडक्याचा आधार घेऊन ‘रुमाल ट्रेडिंग’ करतात. यांनी कुठे कुठे असा डल्ला मारला त्याची माहिती आहेच आपल्याजवळ. पुढच्या सभेत तीच जाहीर करायची. रुमालाच्या आडून होणारे व्यवहार जनतेपर्यंत पोहोचवायचेच. म्हणे, फॅक्ट्री टाकणार, तोरण बांधणार. अरे करा काहीही! मीही तेच रुमाल विकत घेऊन त्यावर चाळीस खोक्यांची छायाचित्रे उमटवून जिल्हाभर वाटेन. आजवर त्याच रुमालाने तोंड लपवत फिरत होते. हातापाया पडून मंत्रीपद मिळवले तर तोच रुमाल खांद्यावर घेऊन मिरवता काय? म्हणे, गरिबांचे अश्रू पुसणारा रुमाल! कधी कोणत्या शेठने गरिबांचे अश्रू पुसलेत का? तुमच्याही घरासमोर फलक लागतील- ‘कितीही राखली रुमालाची चाड, तरीही पालकमंत्री पदावरून दिला धोबीपछाड’ आणि ‘कितीही घेतला रुमालाचा आधार, तरी त्याच्या आडून करतात काळे व्यवहार’. मंत्रीपद म्हणजे यांना एसटीतली सीट वाटली काय? टाकला रुमाल व केली आरक्षित. पद मिळवण्यासाठी बुद्धी लागते. ती नसताना डोक्यावर रुमाल ठेवून काही उपयोग नाही. आता पुढच्या सभेत थेट आव्हानच देतो. ‘कितीही घ्या त्यांच्याकडून रुमाल, राजकारणात चालेल आमचीच धमाल’. आता बघा, येत्या १५ दिवसांत नाही बुरखा फाडला तर नावाचा तटकरे नाही. असे किती तरी शेठ आले व गेले. तटकरे ब्रँड आहे. त्याची जागा वीतभर रुमाल घेऊ शकत नाही. आता अस्सल कोकणी कोण याचा फैसला करायचा म्हणजे करायचा!