क्रीडाविश्व आणि प्रेरणादायी कहाण्या हे जणू एक समीकरणच आहे. विविध आव्हानांवर मात करत स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे खेळाडू दुनियेसाठी आदर्श ठरतात. अपंग तिरंदाज शीतल देवीची कहाणी अशीच वेगळी आणि अवाक करणारी. ‘आपण अपंग आहोत म्हणून दु:खी होण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आयुष्य जगले पाहिजे. स्वत:मधील गुण ओळखून त्यांना न्याय देणे महत्त्वाचे,’ या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी सांगितलेल्या मूल्यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शीतल देवी.
जानेवारी २००७ मध्ये जम्मू-काश्मीरच्या किश्तवार जिल्ह्यातील लोईधर गावात जन्मलेल्या शीतलला ‘फोकोमेलिया’ नावाचा दुर्मीळ आजार झाला होता, ज्यामुळे तिला जन्मत:च खांद्यापासून हात नाहीत. साहजिकच अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले. मात्र, तिने कधीही नैराश्याला जवळ केले नाही. भारतीय सैन्यदलामुळे शीतलच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. सैन्यदलाने २०२१ साली किश्तवारमध्ये एका स्पर्धेचे आयोजन केले होते. तिथेच खेळाडू म्हणून शीतलमधील गुण सैन्यदलाच्या प्रशिक्षकांनी हेरले. मात्र, तिला जागतिक दर्जाची तिरंदाज बनविणे सोपे नव्हते. सुरुवातीला कृत्रिम हातांचा वापर करून शीतलला तिरंदाजी शिकवण्याचा प्रयत्न फसला. मात्र, शीतलने आणि प्रशिक्षकांनीही हार मानली नाही. अधिक संशोधन केल्यावर त्यांना मॅट स्टुझमान यांच्याविषयी माहिती मिळाली. शीतलप्रमाणेच स्टुझमानलाही हात नाहीत. तो पायाने तिरंदाजी करतो आणि २०१२च्या लंडन पॅरालिम्पिक स्पर्धेत त्याने रौप्यपदकाची कमाई केली होती, अशी माहिती त्यांना मिळाली. इथूनच तिचा पुढील प्रवास सुरू झाला.
माजी तिरंदाज कुलदीप वेदवान यांच्या अकादमीत ती दाखल झाली. तिथेच ती पायाने तिरंदाजी करण्यास शिकली. खुर्चीवर बसून डावा पाय जमिनीवर घट्ट ठेवून मग उजव्या पायाने धनुष्य पकडायचा आणि तोंडात बाण धरून नंतर अचूक लक्ष्यवेध करायचा हे तंत्र तिने वेदवान यांच्या मार्गदर्शनाखालीच विकसित केले.
शीतल मार्च-एप्रिल २०२२ मध्ये राष्ट्रीय पॅरा-तिरंदाजी स्पर्धेत सहभागी झाली. पुढे ती कनिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेतही खेळली. अन्य सामान्य तिरंदाजांच्या गर्दीत शीतलला पदक मिळाले नाही, पण तिच्यातील अ-सामान्य जिद्द आणि तिच्या कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधले. त्यामुळे तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळाली, मग तिने मागे वळून पाहिले नाही. २०२३ मध्ये जागतिक स्पर्धेत रौप्यपदक, आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धांत दोन सुवर्ण आणि रौप्यपदके मिळवत शीतल पॅरा-कम्पाऊंड तिरंदाजीच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी पोहोचली. त्याच वर्षी तिला देशाच्या क्रीडा क्षेत्रातील दुसऱ्या सर्वोच्च ‘अर्जुन’ पुरस्काराने गौरविण्यात आले. पुढच्या वर्षी शीतलने पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतील पात्रता फेरीत विश्वविक्रमाची नोंद केली. पुढे हा विक्रम तुर्कीच्या ओझनुरने मोडला. वैयक्तिक गटात शीतलला उपउपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला, पण मिश्र गटात राकेश कुमारच्या साथीने ती कांस्यपदकाची मानकरी ठरली. तिची ही घोडदौड कायम असून नुकत्याच झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिने ‘सुवर्ण’वेध घेतला. हात नसतानाही जगज्जेती ठरणारी ती पहिली महिला तिरंदाज आहे. तिने अंतिम फेरीत पॅरालिम्पिक विजेत्या आणि तीन वेळच्या जगज्जेत्या ओझनुरलाच पराभूत केले, हे विशेष. तिने या स्पर्धेत महिला सांघिक गट आणि मिश्र गटातही अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक मिळवले. शीतलमधील जिद्द, चिकाटी आणि हार न मानण्याच्या वृत्तीमुळेच ती यापुढेही असेच यश मिळवत राहणार हे निश्चित. शीतल समाजमाध्यमांवर सक्रिय असते. आता ती उत्तम प्रभावक ठरू लागली आहे.