– मनोज सिन्हा, नायब राज्यपाल, जम्मू काश्मीर
दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री अमरनाथ यात्रा ३ जुलैपासून सुरू झाली. शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या बिकट वाटेवरून, आव्हानदायी हवामानाला तोंड देत १३ हजार फुटांवरील श्री अमरनाथजींचे दर्शन घेण्यासाठी सुमारे पाच लाख भाविक यंदा तयार आहेत. जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील शांतता, सौहार्द आणि या केंद्रशासित प्रदेशाची वाढती भरभराट यांत बिब्बा घालण्याचा कुटिल डाव रचून पाकिस्तानने २२ एप्रिलचे पहलगाम हत्याकांड घडवले, हे जम्मू-काश्मीरमधील रहिवाशांच्या वर्मी लागले असून हे सारे लोक आता अमरनाथ यात्रेकरूंचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत. कोणतीही अप्रिय घटना न घडता, अमरनाथ यात्रेकरूंना दैवी आशीर्वाद मिळवूनच घरोघरी परत जाता यावे, याची हमी देण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि सुरक्षा दले सज्ज आहेतच.
ही यात्रा हे एक आगळेच रसायन आहे, असे मला वाटते. पावले थकवणाऱ्या आणि शरीर गोठवणाऱ्या या यात्रेची मोहिनी अशी काही असते की, क्लान्त तनांनाही मिळणारे आध्यात्मिक समाधान इथे अधिक महत्त्वाचे ठरते. आधुनिक काळातल्या धकाधकीच्या जगण्यात मनुष्यजन्माबद्दल ज्या गोष्टी सहजी उमगत नाहीत, ती गुह्ये जाणून घेण्याची संधी या यात्रेमधून मिळते. सखोल श्रद्धा-विश्वास आणि अपरंपार आत्मिक समाधानाने भारलेली हृदये यांचा हा सोहळा असतो. मी कोण आहे- ‘को हं’ या प्रश्नाला सामोरे जाण्याचा हा सोहळा असतो. या पूज्य गुहेकडे पावले चालत असतात तेव्हा लौकिकातल्या अवडंबराची बोळवण करणाऱ्या या सोहळ्यात उरते ती केवळ विशुद्ध जाणीव- आपल्या आयुुष्याचा नियंता आणि मार्ग-दर्शक अलौकिक, अपरिमेय असा आहे!
आपल्या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये अमरनाथ गुहेचे वर्णन ब्रह्मरहस्याचे पवित्र स्थान म्हणून केले आहे. भगवान शिव यांनी विश्वाच्या निर्मितीची कहाणी सांगितली आणि पर्वतांमध्ये राहताना देवी पार्वतीला अमरत्वाचे दिव्य रहस्य सांगितले असे मानले जाते. शिवसूत्रात भगवान शिव म्हणतात, ‘प्राण समाचरे समदर्शनम्’,‘शिव तुल्यो जायते’ (दैवी ऊर्जा फुलत आहे. माझ्यासारखे होण्यासाठी तुम्हाला ती अनुभवण्याची आवश्यकता आहे). हा मानवजातीसाठी एक गहन संदेश आहे.
या वर्षीची अमरनाथ यात्रा हा दहशतवादाविरुद्धचा उद्गार आहे. पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांना त्यांच्या धर्माची ओळख पटवून मारल्याने जम्मू-काश्मीरचा आत्मा जखमी झाला. संपूर्ण देश हादरला. जम्मू-काश्मीरने राष्ट्रीय संतापाचे नेतृत्व करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दहशतवादाविरुद्ध मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. महिलांनीही घराबाहेर पडून आपला आवाज दबलेला नाही हे सिद्ध केले. अचानक उसळलेल्या या जनभावना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०१९ नंतरच्या ‘दहशतवादाविरुद्ध शून्य-सहिष्णुता धोरणा’शी आणि त्यामुळे लोकांसाठी मिळालेल्या परिणामांशी सुसंगत अशाच होत्या. पंतप्रधान मोदी यांच्या या धोरणामुळेच जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील लोकांच्या जीवनात लक्षणीय बदल झाला आणि त्यांना दहशतवादाच्या तावडीतून बाहेर काढण्यात आले.
प्रशासनाने प्रथमपासूनच द्विसूत्री धोरण अवलंबले होते – निरपराध नागरिकांचे संरक्षण करणे हे पहिले सूत्र, परंतु त्याच वेळी दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना निर्दयीपणे लक्ष्य करणे हे दुसरे सूत्र. आम्ही आर्थिक विकासाला, पायाभूत सुविधांच्या विकासाला, तरुण आणि महिलांच्या सक्षमीकरणाला, एकंदरीत जम्मू आणि काश्मीरला स्थिरता आणि समृद्धीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक कल्याणाला आणि सामाजिक न्यायाला प्रोत्साहन दिले. दहशतीच्या सततच्या सावटामुळे या प्रदेशाला लोकशाहीच्या लाभांपर्यंत पोहोचणे दुस्तर झालेले होते. परंतु २०१९ नंतर आम्ही सुशासन आणि प्रकल्पांच्या जलद अंमलबजावणीला प्रोत्साहन देणारी पारदर्शक प्रशासकीय व्यवस्था स्थापित करण्यासाठी कठोर परिश्रम घेतलेले आहेत. यामुळेच आज संसाधने आणि आकांक्षा यांच्यातील दरी मोठ्या प्रमाणात कमी झालेली दिसते. हे शक्य झाले कारण धर्म कोणताही असो, प्रदेश कुठलाही असो, नागरिक हेच आमच्या धोरणात्मक उपक्रमांचा आधार बनले आहेत. कदाचित याच कारणास्तव, गेल्या पाच वर्षांत जम्मू आणि काश्मीर वेगवेगळ्या सामाजिक-आर्थिक विकास निर्देशांकांमध्ये स्थान मिळवू लागले. विशेषत: तरुणांनी – अलीकडेच आयआयटी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तीन मुलींनी – स्वत:हून सांगितले की जम्मू आणि काश्मीरचा केंद्रशासित प्रदेश आता आपल्या क्षमतेची जाणीव करून देत आहे. चिनाब नदीवरील सर्वात उंच रेल्वे पूल लोकांसाठी खुला होणे हेही, जागतिक स्तरावर अव्वल ठरण्यात सामील होण्याची केंद्रशासित प्रदेशाची तयारी दर्शवणारे पाऊल आहे.
या प्रदेशातील एकूण परिवर्तनाचा एक आरसा म्हणजे २०२२ पासून अमरनाथ यात्रेचे होणारे चोख नियोजन. कोविडनंतर यात्रेला पुनश्च सुरुवात झाली, तेव्हापासून अमरनाथ यात्रेच्या आयोजनात अधिकाधिक काटेकोरपणा येऊ लागला आहे. यंदाच्या वर्षी सुरक्षेच्या कारणास्तव हेलिकॉप्टर सेवा बंद करण्यात आल्या आहेत. सर्व यात्रेकरूंना, खासगी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांनाही, जम्मूपासून ते यात्रा बेस कॅम्पपर्यंत फक्त काफिल्यासोबत प्रवास करण्याचे आवाहन मी यंदा करतो आहे. गेल्या वर्षी पाच लाखांहून अधिक भाविकांनी पवित्र गुहेचे दर्शन घेतले. गेल्या १२ वर्षातील ती सर्वाधिक भाविकसंख्या ठरली.
अमरनाथ यात्रेच्या दोन्ही मार्गांवर २०२२ पासून लक्षणीय सुधारणा करण्यात आल्या आहेत. दोन्ही मार्गांवर १२ फुटांपर्यंत रुंद ट्रॅक बनवण्यात आले आहेत. आम्ही सर्व नोंदणीकृत यात्रेकरू आणि नोंदणीकृत सेवा प्रदात्यांवर ‘रिअल-टाइम’ देखरेख ठेवण्यासाठी, यात्रामार्गांवर कुणाचाही अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी ‘आरएफआयडी टॅग’-आधारित ट्रॅकिंग सिस्टीम कार्यरत ठेवल्या आहेत. या अहोरात्र देखरेखीच्या लाइव्ह फीडद्वारे यात्रेकरूंची सुरक्षितता सुनिश्चित झाली आहे. बालताल आणि चंदनवाडी येथील दोन्ही बेस कॅम्पवर शंभर खाटांची रुग्णालये कार्यान्वित करण्यात आली आहेत. यापूर्वी यात्रा मार्गांवर वीजपुरवठा नव्हता. आम्ही दोन्ही मार्गांवर आणि पवित्र गुहेतसुद्धा ग्रिडद्वारे वीजपुरवठा सुनिश्चित केला आहे. अखंड टेलि-कनेक्टिव्हिटीसाठी अख्ख्या यात्रा-मार्गांवर भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यात आली आहे.
असा विकास हा एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. चडफडणारा पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरला अस्थिर करण्यासाठी दहशतवादाचा आधार घेतो आहेच. परंतु आम्ही पाकिस्तान आणि त्यांच्या दहशतवादी गटांना यशस्वी होऊ देणार नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’ने केवळ पहलगामचा बदला घेतला नाही तर त्याने सीमापार दहशतवादाविरुद्ध एक नवीन संकेत स्थापित केला आहे : ‘भविष्यात कोणत्याही दहशतवादी हल्ल्यांना आम्ही योग्य उत्तर देऊ. त्याच गतीने, आम्ही विकास प्रक्रियादेखील पुढे नेऊ!’
यशस्वी अमरनाथ यात्रेमुळे ‘विकसित जम्मू-काश्मीर’ आणि ‘विकसित भारत’ निर्माण करण्याचा आपला संकल्प अधिक बळकट होणार आहे. विकासाच्या ध्यासाने २०१९ मध्ये सुरू झालेला काफिला आता थांबणार नाही. जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची प्रगती ही या देशातील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. गेल्या पाच वर्षांत येथे पर्यटक मोठ्या संख्येने आले, यातून राष्ट्राचा संकल्प दिस्ून येतो. जम्मू-काश्मीर आता एका पिढीच्या बदलासाठी स्पर्धा करत आहे आणि या महायज्ञात सहभागी होणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.
म्हणूनच मी भगवान शिवजींच्या साऱ्या भक्तांना अमरनाथ यात्रेत सामील होण्याचे आवाहन करतो. तुमची यात्रा २२ एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या जम्मू आणि काश्मीरला आध्यात्मिकरीत्या बरे करेल. महादेव आपल्याला आशीर्वाद देवो.